सर्जिकल स्ट्राईक

By Admin | Published: October 7, 2016 02:32 AM2016-10-07T02:32:05+5:302016-10-07T02:32:05+5:30

चित्त एकाग्र करून लक्ष्यावर नेमका हल्ला करणे म्हणजे सर्जिकल स्ट्राईक. अलीकडे उदयाला आलेले हे एक आश्चर्यकारक तंत्र. पूर्वी आॅपरेशन करताना डॉक्टरांना बरीच कापाकापी करावी लागत असे

Surgical Strike | सर्जिकल स्ट्राईक

सर्जिकल स्ट्राईक

googlenewsNext

चित्त एकाग्र करून लक्ष्यावर नेमका हल्ला करणे म्हणजे सर्जिकल स्ट्राईक. अलीकडे उदयाला आलेले हे एक आश्चर्यकारक तंत्र. पूर्वी आॅपरेशन करताना डॉक्टरांना बरीच कापाकापी करावी लागत असे, रक्त खूप जाई, टाकेही खूप पडत. आता आवश्यक तेव्हढा भाग नेमका काढून लगेच मोकळे होता येते. आधुनिक वैद्यक व्यवसायातील हे तंत्र युद्धशास्त्रातही वापरले जाते हे या निमित्ताने सगळ्यांना समजले.
अर्जुनाला पोपटाचा फक्त डोळा दिसावा, हा वैदिक काळातील सर्जिकल स्ट्राईकच्या शिकवणुकीचा पहिला पुरावा म्हणता येईल. स्वयंवराच्या वेळी पाण्यातील प्रतिबिंब पाहून वरील फिरत्या माशाचा डोळा फोडणे हे तर अधिक अवघड आॅपरेशन, पण तेही अर्जुनाने यशस्वी करून दाखवले. एकलव्याने तर दुसरी कोणतीही इजा होऊ न देता त्या कुत्र्याच्या तोंडात अशा खुबीने बाण मारले की त्याचा फक्त आवाजच बंद झाला होता ! माणसाच्या प्रतिभेची आणि कर्तृत्वाची सर्जिकल स्ट्राईकशी संबंधित अशी अनेक उदाहरणे दाखवून देता येतील. सर्जिकल स्ट्राईकचे अनेक फायदे असतात. समस्या नेमकी लक्षात घेऊन तिचा सूक्ष्म अभ्यास करावा लागतो, त्यावरील अचूक उपाय शोधून काढावा लागतो, त्या उपायाची बिनचूक अंमलबजावणी करावी लागते, जेवढी शक्ती खर्च करावी लागणार आहे तेवढीच खर्च करणे शक्य होते आणि समस्येच्या मुळावर घाव घालून ती कायमची नाहिशी करता येते.
हे तंत्र माणसाला जसे समरांगणात वापरता येते तसेच दैनंदिन जीवनातही वापरता आले पाहिजे. एका अर्थी जीवनाची लढाई लढताना माणूस परिस्थिती नुसार वेगवेगळ्या शस्त्रांचा वापर करीत असतोच. कधी तो जिंकतो, कधी हरतो तर कधी त्याला तह करावा लागतो. पण जर त्याने जीवनातही जाणीवपूर्वक सर्जिकल स्ट्राईक तंत्राचा वापर करायचे ठरवले तर विजयश्री त्याच्या गळ्यात माळ घालणार ही अगदी काळ्या दगडावरची रेघ !
साधू-संतांनी म्हटल्याप्रमाणे कामक्रोधादि षड्रिपू दैनंदिन जीवनात घडोघडी माणसासमोर उभे ठाकलेले असतात. त्यांना या तंत्राचा वापर करून माणूस कायमचे नेस्तनाबूत करू शकतो. मनातील भीती नाहिशी करणे, वैफल्य दूर करणे, असाध्य आजारांशी सामना करणे, आयएएसच्या परीक्षेत उत्तीर्ण होणे किंवा आॅलिंपिकमधील मेडल मिळवणे यासारख्या, पुरुषार्थाला आव्हान देणाऱ्या कामी सर्जिकल स्ट्राईकसारखा मित्र सोबतीला घेणे यासारखी दुसरी स्ट्रॅटेजी असू शकत नाही. भारतीय लष्कराने या तंत्राचा वापर पितृपक्षात कुट्ट काळ्या रात्री करावा यासारखे, झापडबंद समाजाचे डोळे उघडणारे दुसरे उदाहरण सापडणार नाही.

Web Title: Surgical Strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.