शरणागती...
By admin | Published: December 8, 2014 12:27 AM2014-12-08T00:27:02+5:302014-12-08T00:27:02+5:30
त्यासाठी अनेकदा तक्रारी झाल्या आणि त्यांची उघड चर्चाही झाली. आता तर सेना वाकलीच आहे आणि तिला तिचा कणा सापडायला भरपूर वेळ लागायचा आहे
अखेर मिळतील ती खाती घेऊन शिवसेनेने भाजपापुढे शरणागती पत्करली. तिच्या या सत्तारोहणाचा ना कुणाला आनंद आणि ना कुणाला तिचा खेद. जे व्हायचे होते, ते झाले, एवढेच. सेना सत्तेवाचून राहू शकत नाही, ही तिची अगतिकता ओळखलेल्या भाजपाच्या चतुर पुढाऱ्यांनी तिला हवे तेवढे वाकविले आणि तीही तशी वाकत राहिली. प्रतिस्पर्ध्याचे मानस एकदा असे कळले, की मग त्याचा खेळच करायचा तेवढा बाकी राहतो. उपमुख्यमंत्रिपद नाही, सभापतिपद नाही, गृह नाही, अर्थ नाही, फार काय वनसुद्धा नाही. मग मिळाले काय? उद्योग (या खात्याला फारसे कामकाज नाही, ही बाब मनोहर जोशींच्या केंद्रातील अवजड उद्योग मंत्रिपदाच्या काळातच बाळासाहेब ठाकऱ्यांच्या लक्षात आली होती आणि त्यांनी जोशींचा उल्लेख ‘रिकाम्या बॅगा घेऊन फिरणारा मंत्री’ असा तेव्हाच केला होता.), परिवहन (हे खाते नावाहून अधिक बदनामी आणणारे आहे आणि आताच्या टोल प्रकारामुळे त्याच्या मंत्र्याला जनतेच्या रोषाला तोंड देणेच अधिक भाग पडणार आहे.), आरोग्य आणि कुटुंबकल्याण (नुसतेच ओझे. त्यात नाव नाही आणि उपलब्धीही कोणती नाही), पर्यावरण (नुसतीच हवा. तीत सॉलिड असलेच, तर ते फार थोडे आहे) आणि सार्वजनिक बांधकाम व सार्वजनिक उपक्रम (हे खाते कधीचेच बदनाम आहे. भुजबळांकडे या खात्याचा कारभार असताना त्यांना पाटबंधारे विभागही देण्यात आला होता.) सेनेला राज्यमंत्र्याची पाच पदे मिळाली. हे राज्यमंत्री भाजपच्या कॅबिनेट मंत्र्यांच्या नियंत्रणात राहून काम करणार. आपल्या मंत्रिमंडळाच्या आजवरच्या कार्यपद्धतीचा अनुभव हा, की कॅबिनेट मंत्री राज्यमंत्र्यांना काही करूच देत नाहीत. त्यासाठी अनेकदा तक्रारी झाल्या आणि त्यांची उघड चर्चाही झाली. आता तर सेना वाकलीच आहे आणि तिला तिचा कणा सापडायला भरपूर वेळ लागायचा आहे. बाळासाहेबांचा ताठा विरला, उद्धव ठाकऱ्यांची मिजास उतरली, ६३ आमदारांचे बळ निष्प्रभ ठरले आणि सेनेच्या वाट्याला एखाद्या बांडगुळाची अवकळा आली. नेतृत्वाच्या कचखाऊपणाचा आणि सत्तेच्या ओढाताणीतील धरसोडीचा हा परिणाम आहे. जे साऱ्या महाराष्ट्राला दिसत व कळत होते, ते भाजपाच्या मुरब्बी पुढाऱ्यांनाही समजतच होते. तात्पर्य काय, वाका. ताणता काय, ताणा; पण तुमची तणातणी नाटकी आहे, हे न समजण्याएवढे अमित शहा खुळे नाहीत आणि देवेंद्र फडणवीसही राजकारणाला नवे नाहीत. आता भाजपा नेईल त्या दिशेने फरफटत जाणे, एवढेच काय ते सेनेला करायचे आहे. ती ना धड सत्तेत आहे, ना विरोधात आणि ना परिणामकारक. यापुढच्या काळात मुंबई महापालिकेची निवडणूकही तिला भाजपासोबत राहून लढवायची आहे. म्हणजे तिचे अंगणही भाजपाच्या ताब्यात द्यायचे आहे. सेनेतली काही माणसे भाजपाच्या एवढ्या जवळची, की ती खरी कोणत्या पक्षात आहेत, याचाच प्रश्न आपल्याला पडावा. त्यात मनोहर जोशी आहेत, सुभाष देसाई आहेत (एके काळी सुरेश प्रभू असे होते आणि अनंत गिते भाजपाच्या उंबरठ्यावर थांबलेलेच साऱ्यांनी पाहिले आहेत). सेनेला निवडणुकीत मतदारांनी साथ दिली; पण भाजपाच्या तुलनेत ती कमी पडली. मात्र, मतदारांची साथ असली, तरी सेनेचे नेतृत्व तिचे सोने करण्यात उणे पडले. विरोधात राहून सरकारला धारेवर धरण्याची भूमिका घेतली असती, तर तिला लाल दिव्याच्या गाड्याच तेवढ्या मिळाल्या नसत्या. मात्र, तिचे राज्यातले वजन सरकारहून अधिक राहिले असते. काँग्रेस पक्ष खचला आहे आणि राष्ट्रवादीच्या सर्कशीने जनतेची करमणूकच तेवढी चालविली आहे. या स्थितीत सेनेने कणखर भूमिका घेतली असती, तर जनतेला ती आवडली असती आणि बाळासाहेबांनीही तिला आशीर्वाद दिला असता. ती स्थिती आताच्या अगतिकतेहून अधिक आकर्षकही राहिली असती. आता सेनेत नवी भरती होणे नाही. पराभूत झालेल्या वा मनाने तशा बनलेल्या संघटनेत कोणी येत नाही. भाजपाची आताची सदस्यभरती पाहिली, तरी सेनेच्या कधीच्याच रोडावून संपलेल्या भरतीची कल्पना करता येईल. तात्पर्य, आहे ते घेऊन थांबणे, एवढेच आताचे सेनेचे प्राक्तन आहे. राजकारणात सातत्याने उर्ध्व दिशेने जायचे असते. आहे तेथे थांबायचे वा स्थिरावायचे नसते. ती स्थिती उतरणीचा आरंभ सांगणारी असते. वर जायचे वा खाली यायचे, याच राजकारणातल्या दोन खऱ्या अवस्था आहेत. उद्धव ठाकरे या उतरलेल्या सेनेला वरच्या स्थानावर नेऊ शकतील, याची शक्यता कमी आहे. तसे ते करू शकले, तर मात्र तो त्यांचा पराक्रम अचाट म्हणावा असा राहणार आहे. सेनेचे मंत्री निवडताना तिच्या आमदारांनी मातोश्रीकडे घेतलेली धाव आणि त्यांच्यापासून स्वत:चा बचाव करीत व त्यांना टाळत राहण्याची उद्धव ठाकऱ्यांनी घेतलेली भूमिका ज्यांना ठाऊक आहे, त्यांना त्यांच्याकडून एवढ्या अचाट कामगिरीची अपेक्षा मात्र फारशी उरलेली नाही.