जगण्याची सुरेल काव्यमैफल रंगवणारा आत्मरंगी कलावंत !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 12:31 AM2018-02-09T00:31:42+5:302018-02-09T00:31:47+5:30
शब्दप्रभू कवी-गीतकार-निवेदक सुधीर मोघे यांची ८० वी जयंती ८ फेबु्रवारीला झाली. मराठी, हिंदी चित्रपट, मालिका, रंगमंचीय आविष्कार, लघुपटनिर्मिती अशा विविध माध्यमांत त्यांनी नेहमीच दर्जेदार कलाविष्कार निर्माण केले.
- विजय बाविस्कर
शब्दप्रभू कवी-गीतकार-निवेदक सुधीर मोघे यांची ८० वी जयंती ८ फेब्रुवारीला झाली. मराठी, हिंदी चित्रपट, मालिका, रंगमंचीय आविष्कार, लघुपटनिर्मिती अशा विविध माध्यमांत त्यांनी नेहमीच दर्जेदार कलाविष्कार निर्माण केले. मूलत: कवी असलेल्या या कलाकाराने अखेरच्या काळात हातात कुंचलाही धरला. अशा या सर्जनशील कलाकाराविषयी...
‘हा उत्सव असे जगण्याचा, ही मैफल असे गाण्याची, स्वरांतून उमलून स्वरांतच विरून जाण्याची...’ असं म्हणत ज्यांनी आपलं अवघं जीवन सुरेल काव्यमैफल बनवली असे सुधीर मोघे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींची ‘स्मरणयात्रा’ मन:पटलावर सुरू होते. ग. दि. माडगुळकरांच्या परंपरेतली समर्थ गीतकार-कवी म्हणून त्यांनी अढळ स्थान निर्माण केलं. सदैव माणसांत रमणारा, हरहुन्नरी, बहुआयामी असा हा हळवा प्रतिभावंत होता. किर्लोस्करवाडीत जन्मलेल्या या व्यक्तिमत्त्वाची आत्मशोधपर कविता हीच खरी शक्ती होती. निवेदक, संगीतकार, चित्रकार, रंगमचीय आविष्कार, लघुपटनिर्मिती अशा विविध माध्यमांत त्यांनी मुशाफिरी केली असली तरी ‘माझं पहिलं प्रेम माझ्या कवितांवरच आहे,’ असं ते म्हणायचे. ‘आत्मरंग’, ‘गाण्याची वही’, ‘पक्ष्यांचे ठसे’, ‘लय’, ‘शब्दधून’ या त्यांच्या काव्यसंग्रहांतून याची साक्ष पटते. त्यांचं जगणं हीच जणू कविता होती. म्हणूनच कवी बा. भ. बोरकरांप्रमाणे तेही स्वत:च्या नावाआधी ‘पोएट’ हा शब्द आवर्जून वापरायचे. १९७२ मध्ये पुण्यातील ‘स्वरानंद’ संस्थेच्या ‘आपली आवड’ या मैफलीद्वारे त्यांनी निवेदन सुरू केले. त्यांचं हे निवेदन केवळ कवी, संगीतकार, चित्रपट प्रसंग यांची माहिती सांगणारं नव्हतं, तर दोन गाण्यांतील जागा ते स्वत:च्याच किंवा इतरांच्या आशयघन कवितांनी सजवत असत. स्वत:च्या काव्यरचनांचं सुयोग्य नेपथ्य, प्रकाशयोजनेचा वापर करून केलेला एकमेव रंगमंचीय प्रयोग म्हणून मोघेंच्या ‘कविता पानोपानी’ या कार्यक्रमाचा उल्लेख करावा लागेल. यात मोघे कागद हातात न घेता स्वत:च्या कविता, गीतं सादर करीत. स्वातंत्र्याला २५ वर्षं झाली, तेव्हा मोघेंंनी १८५७ ते १९४७ या कालखंडातील घडामोडी-व्यक्तींचं दर्शन घडवणाºया २५ रचनांचा ‘स्वतंत्रते भगवती’ हा आगळावेगळा कार्यक्रम केला. गदिमांच्या चित्रपटगीतांवर आधारित ‘मंतरलेल्या चैत्रबनात’ या मैफलीची कल्पना त्यांनी साकारली. जागतिक मराठी परिषदेच्या संमेलनानिमित्त मराठी चित्रपटसृष्टीतील गीतांचा प्रवास उलगडणाºया ‘स्मरणयात्रा’ या अभिनव कार्यक्रमाचं सादरीकरण त्यांनी केलं. यात मोघेंंनी केलेल्या दृक्-श्राव्य सादरीकरणातून अशा मैफलींचा नवा पायंडा पडला. पु. ल. देशपांडेंवरील ‘यासम हा’, गायिका ज्योत्स्ना भोळे, किर्लोस्कर उद्योगसमूहाच्या वाटचालीचा मागोवा घेणाºया लघुपटांचीही निर्मिती मोघेंचीच. ‘राजा शिवछत्रपती’ या चित्रपटापासून मोघे हे गीतकार झाले. त्या चित्रपटात त्यांनी एक भूमिकाही केली होती. चित्रपटातील प्रसंगाला अनुरूप अशी त्यांची गीतं असत. त्यासाठी ते पटकथाकार, दिग्दर्शक, संगीतकार यांच्यासमवेत प्रदीर्घ चर्चा करीत. यामुळेच त्यांच्या गाजलेल्या गीतांचं केवळ संगीतच नाही, तर शब्दही रसिकांच्या ओठांवर आहेत. ‘सखी मंद झाल्या तारका’, ‘फिटे अंधाराचे जाळे’, ‘गोमू संगतीनं’, ‘दिस जातील दिस येतील’, ‘दयाघना’, ‘मन मनास उमगत नाही’, ‘झुलतो बाई रासझुला’, ‘दिसलीस तू फुलले ऋतू’, ‘सांज ये गोकुळी सावळी सावळी’, ‘जरा विसावू या वळणावर’ अशी चपखल शब्दयोजना असलेली त्यांची अनेक गीतं अजरामर आहेत. अखेरच्या टप्प्यात त्यांनी साकारलेल्या शेकडो चित्रांद्वारे मोघेंच्या मनात फुललेली ही ‘रंगधून’ रसिकांनाही सुखावून गेली. त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर, ‘एकाच या जन्मी फिरूनी नव्या-नव्या रूपात जन्मलेला’ असा हा मनस्वी कलावंत. अवघ्या मराठी रसिकमनावर उमटलेले त्यांच्या काव्याचे ठसे चिरंतर राहणार आहेत.