सर्वे संतु निरामय:

By admin | Published: April 6, 2017 12:12 AM2017-04-06T00:12:05+5:302017-04-06T00:12:05+5:30

आजची परिस्थिती पाहता मनोशारीरिक पातळीवर सामाजिक स्वास्थ्य जपणे हे एक मोठे आव्हान आहे

Survey Satisfaction: | सर्वे संतु निरामय:

सर्वे संतु निरामय:

Next

आजची परिस्थिती पाहता मनोशारीरिक पातळीवर सामाजिक स्वास्थ्य जपणे हे एक मोठे आव्हान आहे. जागतिक आरोग्य दिन साजरा होत असताना तीच अपेक्षा आहे.
‘शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्’
‘अर्थात धर्म आचारण्याचे पहिले साधन म्हणजे शरीर...’ कवी कालिदासाचे हे वचन प्रख्यात आहे. ते कालसुसंगत आहे. आजच्या धकाधकीच्या आयुष्यात, वाढत्या स्पर्धेच्या युगात सर्वाधिक दुर्लक्ष होत असेल तर आरोग्याकडे. शरीर व मन सुदृढ आहे तर सारे आलबेल आहे, हा साधा जीवनमंत्र बऱ्याचदा लक्षात घेतला जात नाही. शरीराची हेळसांड होत राहते. शरीराबाबत बेपर्वाईही दिसते. भौतिक सुखांच्या मागे धावत असताना शरीराकडे अक्षम्य दुर्लक्ष होते.
जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) माध्यमातून प्रतिवर्षी ७ एप्रिल रोजी ‘जागतिक आरोग्य दिन’ साजरा केला जातो. एक मिशन घेऊन हा दिवस साजरा करतात. या वर्षीची संकल्पना आहे ‘डिप्रेशन’. सद्यस्थितीतला अत्यंत ज्वलंत असा प्रश्न. मनाशी आणि तितकाच पर्यायाने शरीराशी जोडला गेलेला. कारण सध्याचा काळ आहे, स्पर्धेचा, गतीचा आणि आव्हानांचा. करिअरच्या स्पर्धेत यशाच्या मागे माणसं धावत राहतात. त्यातून शारीरिक, मानसिक तक्रारी वाढतात. ताणतणाव, ईर्षा, अखंड दगदग, कामाचे ओझे, कौटुंबिक बेबनाव ही सारी विविध पातळ्यांवरची कसरत सांभाळत माणसं जगत राहतात. त्याच्या परिणामस्वरूप अपेक्षित काय असते तर निखळ समाधान. पण त्याचाच अभाव जाणवतो. मनावरील परिणाम थेट शरीरावर होतात.
सातत्याने वेगवेगळ्या रोगांच्या साथी येऊन धक्का देत असतातच. सार्स, स्वाइन फ्लू, डेंग्यू आदि रोगांनी तर जगभरात धुमाकूळ घातल्याचे आपण अनुभवले आहे. निदान आहार चांगला असावा म्हणावे तर सत्त्व हरवलेले अन्नपदार्थ, जंक फूडची वाढती क्रेझ यातून जेवणातला ‘रस’ संपताना दिसत आहे. दिवसागणिक वाढत असलेले आणि आपल्याला विळख्यात घेत असलेले विविध स्वरूपाचे प्रदूषण, तंत्रज्ञानाचे अतिक्रमण आणि दुरावणारे नातेसंबंध या साऱ्यांचा परिणाम अंतिमत: शरीराला आणि मनाला भोगावा लागतो. त्यातूनच येते ते नैराश्य. त्यामुळे मनाची प्रसन्नताच हरवून बसते. आणि म्हणूनच आजच्या धकाधकीच्या या जीवनात निरामय जीवनाचा शोध अत्यावश्यक ठरतो.
‘केवळ रोग वा व्याधी वा त्यांच्या लक्षणांचा अभाव म्हणजे आरोग्य नव्हे तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिकदृष्ट्याही संपूर्णत: सुदृढ स्थिती म्हणजे आरोग्य.’ ही व्यापकता लक्षात घेतली तर चांगल्या आरोग्याचे महत्त्व खचितच लक्षात येण्यासारखे आहे. त्यामुळे सुदृढ आरोग्याच्या मूलभूत गरजांविषयी जनजागृती करणे या उद्देशातून जागतिक आरोग्य संघटनाही औचित्य साधून समाजातील आरोग्यप्रश्नांना नेमकेपणाने हात घालत असते.
अनेकदा आपण आरोग्याला समानार्थी शब्द निरोगी वापरतो. पण निरोगी म्हणजे ‘निर्गत: रोग: यस्मात्’ म्हणजे ज्याच्या देहातून रोग नाहीसा झाला आहे तो. शरीराइतकीच मनाच्या आरोग्याची आणि समाजाच्या आरोग्याची मानवी जीवनात नितांत आवश्यकता असते. म्हणून शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्य जपणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
त्यासाठी सुरुवात करावी लागेल ती घरापासून. घर ही आरोग्याची गंगोत्री आहे. खरे आरोग्यमंदिर आहे. स्वास्थ्याचा उगम-प्रारंभ हा प्रत्येकाच्या घरातून होतो. घरामध्ये चांगले सकारात्मक वातावरण असावे. पूरक पोषक असावे. खेळीमेळीच्या आनंददायी वातावरणात अन्नपदार्थांचे सेवन व्हावे आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रसन्नता नांदावी. घरापासून सुरू होणारी ही प्रसन्नता समाजात परावर्तित व्हायला हवी. आजूबाजूच्या समाजाचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असेल तर प्रगतीचे व विकासाचे मार्ग सोपे होत जातात. आजची परिस्थिती पाहता सगळ्या बाजूला सामाजिक स्वास्थ्य जपणे हेच एक मोठे आव्हान आहे. लहान मुलांच्या पोषणाच्या, प्रतिकारशक्तीच्या समस्या आहेत. व्यसनाधिनतेच्या आहारी गेलेली तरुणाई आहे. कुटुंबव्यवस्था धोक्यात आहे. हे सारे चित्र एका दिवसात बदलणारे नाही. पण त्या दिशेने नेमके, सकारात्मक प्रयत्न मात्र करावेच लागतील. ‘सर्वे संतु निरामय:’ हे स्वप्न सत्यात आणण्यासाठी सामाजिक स्वास्थ्य हरप्रकारे कसे जपले जाईल हे पाहणे ही काळाची गरज आहे.
- विजय बाविस्कर

Web Title: Survey Satisfaction:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.