...अशा बॉलवर कुणीही षटकार ठोकणारच; सुशांत प्रकरणात आणखी कोणाकोणाची बिंगे फुटणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 09:18 AM2020-09-04T09:18:39+5:302020-09-04T09:19:40+5:30
सुशांत मृत्यू प्रकरणाला आणखी एक कंगोराही आहे. मुंबई पोलिसांची अकार्यक्षमता! स्कॉटलंड यार्डनंतर जगातील सर्वात उत्तम तपास यंत्रणा म्हणजे हा दावा खरा की खोटा, हा संशोधनाचा विषय असला, तरी मुंबईचे पोलिस तपासाच्या कामात भारतातील इतर अनेक पोलिस यंत्रणांपेक्षा अधिक वाकबगार आहेत, हे खरेच.
भारतकुमार राऊत । पत्रकार, माजी संसद सदस्य
देशात एका बाजूला कोरोनाचा कहर चालू असताना दुसऱ्या बाजूला सुशांतसिंग राजपूत या उगवत्या चित्रपट कलावंताच्या गूढ मृत्यूचे प्रकरण गाजते आहे. त्यात अनेक चित्रपट कलावंत, निर्माते यांच्याबरोबरच एका उगवत्या तरुण राजकीय नेत्याचे नाव जोडले जाऊ लागले आणि आता त्यात आंतरराष्ट्रीय ड्रग माफियाचाही हात असल्याचा संशय व्यक्त होऊ लागला आहे.
सुशांत हा बिहारमधील मध्यमवर्गीय पण सुखवस्तू घरातून करियर करण्यासाठी काही वर्षांपूर्वी मुंबईत आलेला तिशीतला एक तरुण. नशिबाने व अंगिभूत गुणवत्तेने साथ दिल्याने अल्पावधीत तो नावारुपाला आला. या वयातल्या देखण्या तरुणांना असतात, तसे त्याचेही ‘छंद' होतेच. त्यामुळेच तो नवनवीन सुंदर तरुणींच्या मायापाशात अलगद अडकत गेला. अशाच एका मोहजालाने त्याचा घात केला, असे आता बोलले जात आहे. या प्रकरणात आणखी एका ‘मध्यवर्ती' भूमिकेत असणारी तरुण अभिनेत्री व मॉडेल रिया चक्रवर्ती हिची सीबीआयकडून चौकशी चालू आहे.
सुशांतचा मृत्यू नक्की कशामुळे झाला? ती खरेच आत्महत्या की कौशल्याने केलेली हत्या? चंदेरी दुनियेतील नातेवाईकबाजीचा यात किती संबंध? रिया ही सुशांतची केवळ गर्लफ्रेंड की आणखी काही? या प्रकरणाचा राजकारण व राजकारण्यांशी नक्की किती व कसा संबंध? असे अनेक एकमेकांत गुंतलेले प्रश्न व त्यांची न समजणारी उत्तरे या प्रकरणात आहेत. सीबीआयचा तपास पूर्ण होऊन (व झाला तर) त्याचा अंतीम अहवाल येईल, तेव्हाच या प्रकरणाचा सविस्तर उलगडा होईल.
सुशांत मृत्यू प्रकरणाला आणखी एक कंगोराही आहे. मुंबई पोलिसांची अकार्यक्षमता! स्कॉटलंड यार्डनंतर जगातील सर्वात उत्तम तपास यंत्रणा म्हणजे हा दावा खरा की खोटा, हा संशोधनाचा विषय असला, तरी मुंबईचे पोलिस तपासाच्या कामात भारतातील इतर अनेक पोलिस यंत्रणांपेक्षा अधिक वाकबगार आहेत, हे खरेच. मुंबई घडलेल्या या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबई पोलिसांची शोध यंत्रणा कामालाही लागली, असे पोलिस म्हणतात. पण तरीही दोन महिने उलटत आले, तरी या घटनेचा साधा ‘एफआयआर' नोंदवला गेला नव्हता, हेही सत्यच आहे. ही केवळ चूकभूल की कुणाला तरी वाचवण्याचा पोलिसी प्रयत्न? की तपासासाठीच पोलिसांनी एफआयआर नोंदवण्याची घाई केली नाही? पण याचा परिणाम असा झाला की, पोलिस यंत्रणेच्या प्रामाणिकपणावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले. त्यामुळे रिया चक्रवर्तींच्या वडिलांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडे तक्रार केली. नितीश कुमारांनी बिहार न्यायालयाकडे दाद मागितली. त्यावेळी मुंबईत शिवसेनेच्या शीर्षस्थ नेत्यांनी तातडीने अशा चौकशीला जोरदार विरोध केला. हा महाराष्ट्राचा ‘अपमान’ आहे, असा तिरकस व तोकडा युिक्तवाद या मंडळींनी जाहीरपणे सुरू केला. याच विवादात शिवसेनेच्याच एका वकिल मंत्र्याने थेट आदित्य ठाकरे यांचेच नाव घेऊन त्यांना व पर्यायाने शिवसेनेला बदनाम करण्याचा हा कट आहे, अशा अर्थाचे विधान करून विरोधी बाकांवर असलेल्या भाजपला फूलटॉसच दिला. अशा बॉलवर कुणीही षटकार ठोकणारच. तसेच झाले आणि आदित्य व उद्धवजी अडचणीत आले, असे दिसते.
आता सीबीआय चौकशी चालू आहे. केवळ तपासाच्या प्रक्रियेत उलटसुलट बातम्या पसरवून आदित्य ठाकरेंसारख्या युवा नेत्यांची कारकीर्दच बरबाद करण्याचा डाव कुणी खेळत असेल, तर तपासात व न्यायालयात त्याला योग्य उत्तर मिळेलच. पण सध्या प्रश्न हा आहे की, सुशांतचा मृत्यू खरेच त्याने स्वत:ला गळफास लावल्याने झाला की कुणी त्याला ठार मारून नंतर फासावर लटकवले? या प्रकरणात रियाचा हात आहे का? हा केवळ आर्थिक मामला की आंंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेटच्या कारनाम्यांतील एक चाल? येत्या अडीच महिन्यांत बिहार विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यात नितीश कुमार विरुद्ध काँग्रेस व लालू प्रसाद यांचा सामना आहे. या निवडणुकीच्या प्रचाराचा भाग म्हणून सुशांत मृत्यू प्रकरणाला राजकीय हवा देण्याच्या कटाचा हा भाग आहे, असेही म्हटले जाते. पाच वर्षांपूर्वी बिहार विधानसभा निवडणुकांच्या पूर्वसंध्येलाच ‘पुरस्कार वापसी' प्रकरण माध्यमांनी गाजवले होते. निवडणुका झाल्या व तातडीने ‘पुरस्कार वापसी'सुद्धा थांबली.
सुशांतच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचेही बिहार निवडणुकीत तसेच ‘भांडवल’ होणार का? त्याचा फायदा कुणाला होणार हे कायद्याच्या पुस्तकात नसलेले प्रश्नही आता ऐरणीवर आले आहेत. मुख्य प्रश्न महाराष्ट्रातील गृहमंत्री अनिल देशमुख व त्यांच्या आज्ञेतील मुंबईचे पोलिस आयुक्त परमवीर सिंह यांच्या भवितव्याचा आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे त्यांचे तोंड तर फुटलेच. आता सीबीआय तपासात आणखी काही बिंगे बाहेर आली, तर ही मंडळी काय करणार?