सुशीलकुमारांची सल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 12:50 AM2017-11-28T00:50:02+5:302017-11-28T00:50:26+5:30
सुशीलकुमार शिंदे हे काँग्रेसमधील अत्यंत सुसंस्कृत नेते आहेत. त्यांचे सर्वच राजकीय पक्षांत मित्र आहेत. ते कुणाला दुखवित नाहीत, कुणावर कुरघोडीही करीत नाहीत. त्यांच्या राजकीय डावपेचातही एक सांस्कृतिकपण असते.
सुशीलकुमार शिंदे हे काँग्रेसमधील अत्यंत सुसंस्कृत नेते आहेत. त्यांचे सर्वच राजकीय पक्षांत मित्र आहेत. ते कुणाला दुखवित नाहीत, कुणावर कुरघोडीही करीत नाहीत. त्यांच्या राजकीय डावपेचातही एक सांस्कृतिकपण असते. मैत्री तुटणार नाही, याची काळजी घेत राजकारण करीत असल्याने ते अजातशत्रू म्हणूनही ओळखले जातात. ‘कुणाशी वैर ना त्यांचे, असे ते मित्र सर्वांचे’ ही त्यांची राजकारणापलीकडची ओळख. पक्षांतर्गत राजकारणातही त्यांनी कुणाची तक्रार केल्याचे ऐकिवात नाही. काँग्रेसचे बहुतांश ज्येष्ठ नेते शरद पवारांवर टीका करीत असतानाच्या काळातही त्यांनी पवारांवर कधी टीका केली नाही, त्याबद्दलचे आपले प्रांजळ स्पष्टीकरण त्यांनी इंदिरा गांधींना दिले आणि इंदिराजीदेखील समाधानी झाल्या होत्या, हा इतिहास आहे. या त्यांच्या गुणवैशिष्ट्यामुळेच काँग्रेसने त्यांना भरभरून दिले. पक्षश्रेष्ठींशी एकनिष्ठ असलेल्या सुशीलकुमारांना मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, राज्यपाल अशी अनेक महत्त्वाची पदे मिळाली. ‘माझ्या आयुष्यात मला पक्षाने भरभरून दिले आणि यातच मी समाधानी आहे’, असे विधान सुशीलकुमार अनेक व्यासपीठावरून नेहमी करीतही असतात. पण त्यांच्या मनातील एक सल त्यांना सारखी बोचत असते. १३ वर्षांपासून त्यांच्या मनातील ही खदखद कायम आहे, परवा नागपुरात एका कार्यक्रमात त्यांनी ती व्यक्तही केली. ‘पक्षातील काही नेत्यांनी कुरापती करून २००४ मध्ये मुख्यमंत्रिपदावरून हटविले आणि राज्यपाल केले’, हीच ती सुशीलकुमारांच्या मनातील सल. राजकारणी माणसे आपल्या आयुष्यातील अनेक कटू प्रसंग विसरतात, पण राजकीय अपमान त्यांना आयुष्यभर अस्वस्थ करीत असतात. सुशीलकुमार शिंदेंसारखा सुसंस्कृत नेताही त्याला अपवाद नाही. शिंदे या कुरापतखोरांबद्दल बोलले खरे, पण त्यांच्यावरही त्यांनी संधी मिळताच कुरघोडी केली. हा इतिहास साºयांनाच ठाऊक आहे. आंध्र प्रदेशचे राज्यपाल झाल्यानंतर शिंदे आता राजकीय जीवनातून निवृत्त झाले असेच साºयांना आणि त्यातल्या त्यात त्या अज्ञात कुरापतखोरांना वाटत होते. पण राज्यपाल असलेले शिंदे मुंबईत असताना रात्री अचानक त्यांना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा फोन येतो आणि उद्या तुम्हाला केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घ्यायची आहे, असे त्या सांगतात. दुसºया दिवशी दुपारनंतर शिंदे केंद्रीय मंत्रीही झालेले असतात. त्या कुरापतखोरांना हसतमुख सुशीलकुमारांनी दिलेली ती चपराक असते. नंतर शिंदे या देशाचे गृहमंत्रीही झाले. परंतु अचानक मुख्यमंत्रिपदावरून बाजूला केल्याचे दु:ख अजूनही त्यांच्या मनात आहेच. काँग्रेसच काय तर सर्वच राजकीय पक्षांत अशा कुरापती सतत होत असतात. त्यामुळे कुरापतखोर आणि त्यांच्या कुरापती हा राजकारणातील न संपणारा विषय आहे.