सरकार टिकणं.. सरकार कोसळणं.. सब मोहमाया है !

By सचिन जवळकोटे | Published: December 11, 2020 12:59 AM2020-12-11T00:59:45+5:302020-12-11T06:53:50+5:30

Political News : हे ट्रिपल सरकार टिकलं तरी कुणामुळं, याची शहानिशा करा.. तसंच पडलं तर कुणामुळं पडेल, याचाही शोध घ्या.. इंद्रांनी नारदाला आदेश दिला.

To sustain the government .. to overthrow the government .. all is illusion! | सरकार टिकणं.. सरकार कोसळणं.. सब मोहमाया है !

सरकार टिकणं.. सरकार कोसळणं.. सब मोहमाया है !

Next

- सचिन जवळकोटे
(निवासी संपादक, लोकमत, सोलापूर) 

इंद्र महाराजांनी नारदाला ‘झूम कॉल’ केला; तेव्हा तिकडून ‘पडलंऽऽ कोसळलंऽऽ... वाचलंऽऽ टिकलंऽऽ’ असले काहीतरी असंबद्ध शब्द कानावर पडू लागले. महाराज दचकले. तेव्हा गडबडून जात नारद उत्तरले, ‘मी मंत्रालयाजवळून बोलतोय. गेल्या एक वर्षापासून असेच संवाद महाराष्ट्रात ऐकू येताहेत. उजव्या कानात पडलं असं ऐकू येतं, तर डाव्या कानात टिकलं असं.’ 

‘मग हे ट्रिपल सरकार टिकलं तरी कुणामुळं, याची शहानिशा करा.. तसंच पडलं तर नेमकं कुणामुळं पडेल, याचाही शोध घ्या. वाटल्यास हातात बूम घेऊन चॅनलवाले पत्रकार बना.  माईकचे स्वामी बना.’ हे ऐकताच चेहरा कसाबसा करत मुनी म्हणाले, ‘स्वामी नको अन्‌ गोस्वामीही. ‘आत’ बसायची सवय नाही मला. मी असाच फिरतो.’

...मग नारद  ‘रौतां’ना भेटायला गेले. ‘संजयराव आहेत काय ? हे सरकार कुणामुळं टिकलं हे विचारायचंय मला,’ ..पेनमध्ये शाई भरत त्यांचा शिपाई ठसक्यात उत्तरला, ‘माझ्यामुळंच टिकलं की. मी दिलेल्या पेनमधून ते जे लिहीत गेले, त्यामुळं आमच्या साहेबांच्या साहेबांना ताकद मिळाली. त्यामुळंच सरकार टिकलं.’

आता याच्या ‘साहेबांचे साहेब’ म्हणजे उद्धो की थोरले काका, यावर डोकं खाजवत नारद मुनी गायकवाडांच्या ‘वर्षा’ताईंकडे गेले.  ‘मी आठ-नऊ महिने शाळेची घंटा वाजू दिली नाही म्हणून सरकारच्या धोक्याची घंटा वाजली नाही. माझ्यामुळंच सरकार वाचलं’, हे ताईंचं गणित काही मुनींना पटलं नाही. शेजारीच उभारलेल्या ‘बच्चूभाऊं’नाही आवडलं नाही. आजकाल ‘ताईं’चे अनेक निर्णय ‘भाऊं’ना आवडत नाहीत हा भाग वेगळा. 
मुनी तिथून ‘अजितदादां’कडं गेले. ‘साठीनंतरची राजकीय प्रगल्भता अन्‌ सार्वजनिक भाषणातली सभ्यता’ हे पुस्तक मन लावून वाचण्यात ‘दादा’ दंग होते. त्यांना विचारलं, तरीही ते गप्पच राहिले. खूप काही बोलायचं होतं, तरीही ते तोंड मिटून चूप राहिले. 

वर्षभरातल्या त्यांच्या  ‘मौना’तच मुनींना सरकार टिकण्याचं उत्तर सापडलं. ते मग ‘मातोश्री’वर गेले. तिथं ‘लाईव्ह’ची तयारी सुरू होती. सिंहासनासमोर कायमस्वरूपी लावलेल्या कॅमेऱ्याची साफसफाई करत फोटोग्राफर राजेश पुटपुटला, ‘मी रोज इथं व्यवस्थित लाईव्ह करतोय म्हणूनच सरकार टिकलंय.’
मग नारद ‘देवेंद्रपंतां’कडं गेले. तिथं एक टेलर जाकिटांच्या बिलाची लिस्ट घेऊन उभा होता. ‘गेल्या वर्षभरापासून दर महिन्याला माझ्याकडून नवीन शपथविधीचे जाकीट शिवून घेतले गेलेत.  बिनकामाचा ताप.’ टेलरचा सात्विक  संताप पाहून नारदांनी मग तिथून काढता पाय घेतला. 
‘चंदूदादा कोथरूडकरां’ची भेट घेतली. ते मोबाईलवर ‘कोल्हापूरचे मुश्रीफभाई आज आपल्याबद्दल अजून नवीन काय-काय बोलले,’ याची विचारणा करत होते. ‘सरकार कधी पडणार?’ या मुनींच्या प्रश्नावर त्रासून दादा म्हणाले, ‘अगोदर विधानपरिषदेला आमची माणसं का पडली, याचा शोध घेऊ द्या.. मग नंतर बघूऽऽ’

नारदांना वाटेत ‘रामदास’ भेटले. दाढी खाजवताना नेहमीप्रमाणं त्यांना कवितेचे चार शब्द  आठवले, ‘सरकार पाडने के वास्ते मुंबै में जंत्री.. दिल्ली में बैठकू, मै खाता निवांत संत्री!’ अखेर कंटाळून मुनी बारामतीला पोहोचले. बंगल्याबाहेर  ‘थोरले काकां’चा पीए उभारला होता. मुनींच्या आगमनाचा हेतू अगोदरच त्याला समजला होता. त्यानं त्याचा अंदाज घेतला. छाती पुढं काढून हळूच सांगितलं, ‘हे सरकार पडलं तर माझ्यामुळंच पडणार. मी जर रोजच्या रोज साहेबांचा मोबाईल चार्जिंग करून ठेवला नाही तर तो बंद पडणार. मग रौतांचा संपर्क तुटणार. 
कोणत्या फायलीवर कशा सह्या करायच्या हे सीएमना नाही कळणार. सगळा गोंधळ उडणार... अशी सगळी परिस्थिती होणार अन्‌ सरकार धपाऽऽकदिशी पडणार.’  

या अचाट गोष्टीवर अवाक्‌ होत मुनींनी थेट इंद्रांना झूम कॉल केला, ‘महाराऽऽज, हे सरकार ज्यांनी अस्तित्वात आणलं ते थोरले काकाच... अन्‌ हे सरकार पाडूही शकतील तेही केवळ थोरले काकाच. हेच या सृष्टीतील अंतिम सत्य. बाकी सब मोहमाया. 
नारायणऽऽ नारायणऽऽ’   

Web Title: To sustain the government .. to overthrow the government .. all is illusion!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.