..तर ‘स्वाभिमानी’ला विदर्भात ‘अच्छे दिन’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2017 12:35 AM2017-09-05T00:35:42+5:302017-09-05T00:36:08+5:30
विदर्भातील शेतकरी नेतृत्वविहीन झाले आहेत. दुष्काळी स्थिती, नापिकी, कर्जमाफीचा बोजवारा, वाढत्या आत्महत्या असे अनेक मुद्दे आहेत; पण ते हाती घ्यायला नेताच नाही! उत्तम बांधणी केल्यास ‘स्वाभिमानी’ विदर्भात प्रभाव निर्माण करू शकते.
विदर्भातील शेतकरी नेतृत्वविहीन झाले आहेत. दुष्काळी स्थिती, नापिकी, कर्जमाफीचा बोजवारा, वाढत्या आत्महत्या असे अनेक मुद्दे आहेत; पण ते हाती घ्यायला नेताच नाही! उत्तम बांधणी केल्यास ‘स्वाभिमानी’ विदर्भात प्रभाव निर्माण करू शकते.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा भारतीय जनता पक्षासोबतचा बहुप्रतीक्षित काडीमोड अखेर झालाच! ‘स्वाभिमानी’चे सर्वेसर्वा असलेल्या खासदार राजू शेट्टींनी केंद्रीय मंत्री पदाचा प्रस्ताव नाकारून, विरोधकाची भूमिका बजावण्याचा जो निर्णय घेतला आहे, तो खरोखरच धाडसी म्हणायला हवा. आपापल्या राज्यात मजबूत असलेले जनता दल (युनायटेड) आणि अण्णाद्रमुकसारखे पक्षही भाजपाच्या वळचणीला गेले असताना राजू शेट्टींनी हा निर्णय घेतला आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.
राजू शेट्टींचा हा निर्णय जुगारासारखा आहे. तो त्यांच्या अंगलटही येऊ शकतो किंवा प्रचंड लाभदायीही ठरू शकतो. भाजपाचे चवताळलेले नेतृत्व आता राजू शेट्टींना लगाम लावण्यासाठी सदाभाऊ खोत यांना ताकद देणार हे उघड आहे. त्यामुळे राजू शेट्टींसाठी पुढील प्रवास सोपा नाही; पण त्यांनी त्यांच्या पुढील खेळी काळजीपूर्वक केल्यास, ‘स्वाभिमानी’साठी भविष्यकाळ उज्ज्वल असू शकतो, हेदेखील निश्चित!
विदर्भापुरते बोलायचे झाल्यास, ‘स्वाभिमानी’चे विदर्भातील सर्वात मोठे नेते असलेल्या रविकांत तुपकर यांनी शेट्टी व खोत यांच्या लढाईत शेट्टींचा पक्ष घेतला आहे. त्यासाठी राज्यमंत्रिपदाचा दर्जा असलेल्या वस्त्रोद्योग महामंडळाच्या अध्यक्ष पदावर त्यांनी पाणी सोडले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुपकरांना २०१९ मधील निवडणुकीच्या वेळी योग्य तो विचार करण्याचे आश्वासन दिले होते, अशी माहिती आहे; मात्र कोणत्याही आमिषास बळी न पडता राजू शेट्टींना साथ देण्याचा निर्णय तुपकरांनी घेतला.
राजू शेट्टींचा निर्णय जसा धाडसी आहे, तसाच त्यांना साथ देण्याचा तुपकरांचा निर्णयही धाडसीच म्हणावा लागेल. वास्तविक तुपकरांचे शेट्टी अन् खोत या दोघांसोबतही मधूर संबंध होते. खोत यांचा पदर धरला असता, तर सत्तासुख उपभोगता आले असते; पण शेट्टींच्या सोबतीने विरोधाचे राजकारण करण्याचा निर्णय घेऊन, आपली नजर भविष्यावर असल्याचे तुपकरांनी दाखवून दिले आहे.
विदर्भात सध्या विरोधकच शिल्लक नाहीत, अशी परिस्थिती आहे. कधीकाळी बालेकिल्ला असलेल्या विदर्भात काँग्रेसला नेतृत्वाची पोकळी जाणवत आहे. सक्षम नेतृत्व नसल्याने कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला, शरद पवारांच्या काही बिनीच्या शिलेदारांच्या प्रभावाखालील भाग वगळता, विदर्भात पाय रोवताच आले नाहीत. आता तर बरेचसे शिलेदारच साहेबांची साथ सोडून ‘नमस्ते सदा वत्सले’ करू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेससारखीच शिवसेनेचीही स्थिती आहे. स्थानिक नेत्यांमुळे काही मतदारसंघांपुरता तेवढा प्रभाव टिकून आहे.
या परिस्थितीमुळे विदर्भात विरोधकांची मोठीच पोकळी निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्यांचा प्रदेश अशी ओळख निर्माण झालेल्या विदर्भात, योग्य पावले उचलल्यास ‘स्वाभिमानी’ला चांगली संधी आहे. कधीकाळी स्व. शरद जोशींच्या शेतकरी संघटनेने विदर्भात भक्कम स्थान निर्माण केले होते. त्या चळवळीतून विदर्भात बरेच शेतकरी नेते उदयास आले. त्यापैकी काहींनी पुढे राजकारणातही प्रभाव निर्माण केला. आज ते नेते मुख्य प्रवाहातून बाहेर फेकल्या गेल्या आहेत किंवा उतरणीला लागले आहेत. त्यामुळे विदर्भातील शेतकरी नेतृत्वविहीन झाला आहे. दुष्काळी परिस्थिती, नापिकी, आॅनलाईन कर्जमाफीचा बोजवारा, आत्महत्यांचे वाढते प्रमाण असे अनेक मुद्दे आहेत; पण ते हाती घ्यायला नेताच नाही, अशी स्थिती आहे.
या पार्श्वभूमीवर, अभ्यासू युवा शेतकरी कार्यकर्ते हेरून त्यांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था केली आणि उत्तम संघटना बांधणी केली, तर ‘स्वाभिमानी’ विदर्भात प्रभाव निर्माण करू शकते. अर्थात, त्यासाठी राजू शेट्टींना विदर्भात भरपूर वेळ द्यावा लागेल. विदर्भातील शेतकºयांचे प्रश्न हाती घ्यावे लागतील. रविकांत तुपकरांना झपाटल्यागत काम करावे लागेल. उभय नेत्यांनी ती तयारी ठेवल्यास, विदर्भातील शेतकºयांना नेतृत्व आणि ‘स्वाभिमानी’ला विदर्भात ‘अच्छे दिन’ लाभू शकतात.
- रवी टाले