स्वदेशीचा पुरस्कार हाच विकासाचा मूलमंत्र ठरेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 12:03 AM2018-04-26T00:03:09+5:302018-04-26T00:03:09+5:30

अमेरिका चीनकडून मोठ्या प्रमाणात वॉशिंग मशिन्स आयात करते. त्यावर आता वाढीव कर द्यावा लागणार आहे.

Swadeshi's award will be a source of development | स्वदेशीचा पुरस्कार हाच विकासाचा मूलमंत्र ठरेल

स्वदेशीचा पुरस्कार हाच विकासाचा मूलमंत्र ठरेल

Next

डॉ. भारत झुनझुनवाला|

चीन व अमेरिका हे व्यापार युद्ध छेडण्याच्या मन:स्थितीत असल्याचे दिसत आहे. चीनकडून आयात करण्यात येत असलेल्या अनेक वस्तूंवर अमेरिकेने आयात कर वाढविला आहे. अमेरिका चीनकडून मोठ्या प्रमाणात वॉशिंग मशिन्स आयात करते. त्यावर आता वाढीव कर द्यावा लागणार आहे. म्हणजेच त्या वस्तू महाग होणार आहेत. त्यामुळे चीननेही इशारा दिला आहे की अमेरिकेकडून आयात होणाऱ्या वस्तूंवर आम्हीही आयात कर वाढवू. चीन अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात वस्तू आयात करीत असते. त्यात बोर्इंगच्या विमानांपासून सोयाबीनसारख्या वस्तू समाविष्ट असतात.
जागतिक अर्थकारणाचे दोन मूलभूत पैलू असतात. (१) अत्याधुनिक तंत्रज्ञान जे बौद्धिक मालमत्तेच्या अधिकारात मोडते. (२) वस्तू आणि सेवांचा मुक्त बाजार. पाश्चात्त्य राष्ट्रे अत्याधुनिक तंत्रज्ञानात प्रगत असून त्यावर त्यांचा हक्क असतो. पाश्चात्त्य राष्ट्रांमधील बहुराष्ट्रीय कंपन्या पेटन्ट असलेल्या वस्तूंची निर्यात करून प्रचंड प्रमाणात नफा कमावीत असतात. उदाहरणार्थ मायक्रोसॉफ्ट कंपनी विन्डोज सॉफ्टवेअर निर्यात करीत असते. पूर्वेकडील विकसनशील राष्ट्रांना वस्तूंचा आणि सेवांचा पुरवठा करणे हे फायदेशीर ठरत असते. या राष्ट्रांना कर्मचाºयांना वेतन कमी द्यावे लागते. त्यामुळे कापडाचे उत्पादन करणे किंवा सॉफ्टवेअर पुरविणे यासाठी द्यावा लागणारा खर्च कमी असतो. १९व्या शतकात पाश्चात्त्य राष्ट्रे आणि पौर्वात्य राष्ट्रे यांच्यातील व्यवहार हे देवाण घेवाणीच्या तत्त्वावर होत. त्यातूनच या राष्ट्रातील मुक्त बाजारपेठा विकसित झाल्या. पाश्चात्त्य राष्ट्रे पौर्वात्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरवठा करीत आणि त्यातून कमाई करीत. तर पौर्वात्य राष्ट्रे पाश्चात्त्यांना वस्तू आणि सेवा पुरवीत आणि त्याच्या जोरावर पैसा कमावीत. हा व्यवहार उभयतांना समाधानकारक आणि लाभदायक असायचा.
जागतिकीकरणातून वेगळ्याच परिस्थितीची निर्मिती झाली. जागतिकीकरणातून पाश्चात्त्य राष्ट्रांनी पौर्वात्य राष्ट्रांना आधुनिक तंत्रज्ञान देण्यास सुरुवात केली. अमेरिकन आणि फ्रेन्च कंपन्यांनी अणु-ऊर्जा प्रकल्प विकसित करण्यासाठी भारताला साहाय्य केले. तसेच त्यांची एफ-१६ आणि राफेल जातीची विमाने भारतात तयार करण्यासाठीही त्यांनी तंत्रज्ञान पुरविले. त्यामुळे भारतीय कंपन्यांमध्ये स्वत:चे तंत्रज्ञान निर्माण करण्याची क्षमता निर्माण होऊ शकेल. तंत्रज्ञान निर्यात केल्यामुळे अनेक उत्पादनांच्या निर्मितीची क्षमता ही राष्ट्रे गमावून बसली आहेत आणि तेवढ्या प्रमाणात प्रगत तंत्रज्ञान स्वीकारून समृद्ध झालेली राष्ट्रे अधिक स्वावलंबी बनली आहेत.
मुक्त बाजार व्यवस्थेमुळे पाश्चात्त्य राष्ट्रांच्या संकटात वाढ झाली आहे. अकुशल कामगारांना भारतात रु.३०० रोजी द्यावी लागते. त्याच कामासाठी पाश्चात्त्य राष्ट्रांना रु. ५००० द्यावे लागतात. त्यामुळे पाश्चात्त्य बहुराष्ट्रीय कंपन्यांना वस्तूंचे उत्पादन भारतात करून त्यांची निर्यात आपल्या देशात करणे अधिक किफायतशीर ठरते. वॉलमार्टमधून विकण्यात येणाºया ८० टक्के वस्तू या चीनमधून आयात केलेल्या असतात. तयार कपडे, खेळणी आणि पादत्राणे यांचे निर्माण कार्य अमेरिकेत जवळजवळ बंद पडले आहे. त्याचे कारण भारत आणि चीन यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळाला आणि त्यांच्याकडे मानवी बळ कमी किमतीत उपलब्ध आहे, जे त्या राष्ट्रांसाठी लाभदायक ठरत आहे. याच कारणांमुळे अमेरिकेतील कर्मचाºयांचे पगार दबावाखाली आले आहेत. त्यामुळे अमेरिकेतील जनता जागतिकीकरणाला विरोध करू लागली आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचेकडून जे स्वदेशीचा पुरस्कार करण्याचे धोरण स्वीकारण्यात येत आहे, त्याचे रहस्य हे आहे.
जागतिकीकरणाचे मॉडेल कुठे फसले? माझ्या आकलनाप्रमाणे नव्या तंत्रज्ञानाच शोध सतत होत राहील, यावर अतिरिक्त विश्वास टाकण्यातूनच हे सारे उद्भवले आहे. १९ व्या शतकात पाश्चात्त्य राष्ट्रे लॅपटॉप, पर्सनल कॉम्प्युटर आणि इंटरनेट यांच्या विकासाकडे अधिक लक्ष पुरवीत होती. त्यांच्या निर्यातीतून त्या राष्ट्रांना अमाप पैसा मिळत होता. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात असा विकास सतत होत राहील असे त्यांना वाटू लागले होते. त्यामुळे डब्ल्यू.टी.ओ.मध्ये ट्रीप्स अ‍ॅग्रिमेंट समाविष्ट करण्यासाठी अमेरिका सतत प्रयत्नशील राहिली. आधुनिक तंत्रज्ञानाची निर्यात करण्यापासून होणारे उत्पन्न खूप असेल, त्यामुळे स्वस्त वस्तूंची आयात केल्यामुळे देशात जो रोजगार बुडेल, त्यामुळे होणाºया नुकसानीची सहज भरपाई होईल अशी त्यांची अपेक्षा होती आणि त्यात त्यांची काहीच चूक नव्हती. कारण प्रगत तंत्रज्ञानाच्या निर्यातीतून होणारे उत्पन्न निश्चितच प्रचंड होते. पण नवे तंत्रज्ञान विकसित होत होते तोर्यंतच हा लाभ मिळत गेला. पण तंत्रज्ञानाचा विकास होणे थांबताच विकासाचे हे मॉडेल फसले. त्यामुळे तंत्रज्ञानाची निर्यात करून मिळणारे उत्पन्नही कमी झाले. नवीन तंत्रज्ञानाच्या अभावी आपल्या कर्मचाºयांना अधिक वेतन देणे पाश्चात्त्य राष्ट्रांना अशक्य होऊ लागले.
पौर्वात्य राष्ट्रांत याउलट स्थिती होती. तेथे वेतनाचे प्रमाण कमी असल्याने रोजगार निर्मिती होत राहिली. नवे तंत्रज्ञान सतत उपलब्ध होत राहील आणि त्यामुळे विकसित राष्ट्रांना सतत लाभ होत राहील ही जी अपेक्षा या राष्ट्रांनी बाळगली होती, ती याप्रकारे फोल ठरली. त्यामुळेच जागतिकीकरण हेही अपयशी ठरले. त्यातूनच स्वदेशीला प्रोत्साहन देण्याची भूमिका घेण्याकडे पाश्चात्त्य राष्ट्रांचा कल वाढला. आगामी काळात हा प्रकार वाढीस लागणार आहे. त्यामुळे व्यापार युद्धात वाढ होणार आहे ही काळ्या दगडावरची रेघ आहे. अमेरिका व चीन यांच्यातील सध्या सुरू असलेल्या व्यापार युद्धात वाढ होण्याची शक्यता जास्त आहे. अमेरिकेतील जनतेला दिलासा देण्याचे काम स्वदेशी मालाला प्रोत्साहन दिल्यानेच मिळू शकेल तसेच त्यांना आपल्या देशात रोजगाराच्या अधिक संधी त्यामुळेच मिळणार आहेत. भारतानेसुद्धा स्वदेशीचा पुरस्कार करण्याकडे लक्ष पुरविले पाहिजे. त्यासाठी देशांतर्गत निर्मित मालाचा दर्जा सुधारण्याकडेही उत्पादकांना लक्ष पुरवावे लागेल.

Web Title: Swadeshi's award will be a source of development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.