स्वामी : भाजपाचे अनियंत्रित क्षेपणास्त्र

By admin | Published: June 25, 2016 02:38 AM2016-06-25T02:38:47+5:302016-06-25T02:38:47+5:30

स्फोटक विधाने आणि बेलगाम आरोप ही भारतीय राजकारणातली सुब्रह्मण्यम स्वामी यांची विशेष ख्याती. भाजपाची खासदारकी मिळवल्यावर एक अनियंत्रित क्षेपणास्त्र अशी आता त्यांची नवी ओळख आहे

Swamy: BJP's unmanned missile | स्वामी : भाजपाचे अनियंत्रित क्षेपणास्त्र

स्वामी : भाजपाचे अनियंत्रित क्षेपणास्त्र

Next

सुरेश भटेवरा, (राजकीय संपादक, लोकमत)
स्फोटक विधाने आणि बेलगाम आरोप ही भारतीय राजकारणातली सुब्रह्मण्यम स्वामी यांची विशेष ख्याती. भाजपाची खासदारकी मिळवल्यावर एक अनियंत्रित क्षेपणास्त्र अशी आता त्यांची नवी ओळख आहे. पण त्यांचे खरे टार्गेट अर्थमंत्री अरूण जेटली आहेत व जेटली विरोधकांचे बळ त्यांच्या पाठीशी आहे.
स्वामी आणि अरूण जेटली यांचे पूर्वीपासूनच संबंध चांगले नाहीत. २0१४ च्या लोकसभा निवडणुकीत स्वामींना जेटलींच्या विरोधामुळे दिल्लीतून भाजपाची उमेदवारी मिळू शकली नाही. मोदी सरकारमध्ये अर्थ खात्याचे कॅबिनेट मंत्रिपद मिळेल अशी त्यांना आशा होती. जेटलींच्या विरोधामुळे हा प्रयोगही फसला. तेव्हापासून स्वामींनी एकीकडे पंतप्रधान मोदींची तारीफ तर दुसरीकडे जेटलींच्या अर्थ मंत्रालयावर लागोपाठ हल्ले असे सत्र सुरू केले. पण जेटलींच्या इच्छेविरूध्द राज्यसभेचे सदस्यत्व मिळवण्यात अखेर स्वामी यशस्वी ठरले तेव्हा भाजपाच्या अंतर्गत राजकारणात बदलत्या समीकरणांची चर्चा सुरू झाली.
संसदेत सोनिया गांधींवर थेट आरोप करण्यासाठी स्वामींचा वापर होईल, या हेतूने त्यांना राज्यसभेचे सदस्यत्व मोदींनी बहाल केले. तथापि ७६ वर्षांचे स्वामी दुधारी शस्त्रासारखे आहेत. दररोज नवा शत्रू बनवणे हा त्यांचा जुना छंद आहे. त्यांच्या उपद्व्यापी कृत्यांना मोदी सरकारने वेळीच लगाम घातला नाही तर विरोधकांपेक्षाही अधिक तीव्रतेने हे शस्त्र
सरकारचा घात करील, या शक्यतेचे पुरेसे पुरावे स्वामींच्या अलीकडच्या हल्ल्यातून स्पष्ट झाले
आहेत.
भूतकाळातले दाखले द्यायचे तर स्वामी ज्या ज्या पक्षांबरोबर होते, त्या तमाम पक्षांना त्यांनी पुरेपूर खड्ड्यात घातले. उदाहरणेच द्यायची तर १९७७ साली स्वामी मुंबईतून जनता पक्षाचे खासदार होते. अवघ्या २८ महिन्यात हा पक्ष सत्तेतून पायउतार झाला. नांगरधारी शेतकरी हे या पक्षाचे निशाण हाती घेतलेले ते एकटेच भारतात उरले.
१९९९ साली वाजपेयींचे सरकार अवघ्या एक मताने सत्तेतून गेले. सरकार पाडण्यासाठी जयललिता आणि सोनियांची भेट घडवणारे मुख्य मध्यस्थ तेच होते. त्यापूर्वी जयललितांवरही स्वामींनी बऱ्याच आरोपांचे कुभांड रचले होते. चंद्रशेखर सरकारमध्ये स्वामींना आयुष्यात प्रथमच केंद्रीय मंत्रिपद मिळाले ते केवळ या सरकारला असलेल्या काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे. अवघे १00 दिवस हे सरकार टिकले. त्यानंतर राज्यसभेत शिरण्यासाठी स्वामींना काँग्रेसचे सहकार्य हवे होते. ते मिळाले नाही म्हणून सोनिया गांधींशी त्यांनी उभा दावा मांडला. काँग्रेसचे त्यामुळे काही बिघडले नाही.
राजकीय नेता कसा नसावा, याचे आदर्श उदाहरण म्हणजे सुब्रह्मण्यम स्वामी. विरोधकांवर व्यक्तिगत स्वरूपाचे हल्ले करण्यासाठी सध्या ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग साईटचे माध्यम त्यांनी निवडले आहे. याखेरीज कट्टरपंथी हिंदुत्ववादी असा स्वामींचा नवा अवतार आहे. अयोध्येत राम मंदीर उभारण्याच्या जुन्या मोहिमेचे सध्या ते स्वयंघोषित नेते आहेत. सोशल मीडियावर तासनतास आपल्या विकृतींची भूक भागविणाऱ्या हिंदुत्ववाद्यांना म्हणूनच स्वामी आपले हिरोे वाटतात. स्वामींनी आसारामबापूंच्या समर्थकांचे पाठबळ आपल्याला मिळावे म्हणून अनेक आरोपांचा सामना करणाऱ्या आसारामबापूंचीही यापूर्वी पाठराखण केली आहे. थोडक्यात स्वामी अ‍ॅसेट ऐवजी लायबिलिटी अधिक आहेत.
रघुराम राजन यांच्या मुदतवाढीचा विषय संपुष्टात आल्यानंतर स्वामींनी अचानक अरविंद सुब्रह्मण्यम यांच्यावर हल्ला चढवला. रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी सुब्रह्मण्यम यांची अथवा त्यांनी सुचवलेल्या व्यक्तीची नियुक्ती होऊ नये हा बहुदा स्वामींचा त्यामागे हेतू असावा. या पदाच्या स्पर्धेत तूर्त अरूंधती भट्टाचार्याचे नाव पुढे आहे. त्याचे श्रेयही बहुदा स्वामीच घेतील. राजन यांच्या नकारामुळे मोदी सरकारच्या तटबंदीची पहिली वीट ढासळली. नादान की दोस्ती जानका खतरा....! या उक्तीनुसार न जाणो भविष्यात मोदी सरकारला भगदाड पाडण्यातही स्वामींचे अनगाईडेड मिसाईलच कारणीभूत ठरेल.

Web Title: Swamy: BJP's unmanned missile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.