अखंड तळपणारा ‘स्वरभास्कर!’
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2021 08:16 AM2021-02-04T08:16:55+5:302021-02-04T08:18:33+5:30
Bhimsen Joshi : भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षास आजपासून प्रारंभ होत आहे. किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका पद्मभूषण डॉ. प्रभा अत्रे यांनी भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांना वाहिलेली ही शब्दांजली.
एखादा कलाकार आपल्या कलेवर प्रभुत्व मिळवतो, तेव्हा कलाकार व कला एकरूप झालेली असतात हेच खरं! भीमसेनजी मला प्रथम आठवतात ते माझे गुरू सुरेशबाबू यांच्या पाठीमागे तंबोऱ्यावर बसलेले. गाणं नुसतं डोक्यात असून चालत नाही, तेवढ्याच ताकदीनं ते गळ्यातून बाहेर पडावं लागतं. नैसर्गिक देणगीबरोबरच पराकोटीची साधनाही हवी. नशिबाची साथ तर लागतेच. भीमसेनजी खरंच भाग्यवान! उतारवयातही त्यांचा आवाज एखादा प्रकाशाचा झोत चहूबाजूंनी अंगावर यावा, तसा श्रोत्याला भारावून टाकायचा.
या आवाजात जबरदस्त ‘मास अपील’ होतं. भीमसेनजींचा आवाज रुंद, घुमारदार, पीळदार, लांब पल्ल्याचा, दमसास पेलणारा, सुरेल, गोड, भावस्पर्शी. आवाज बारीक करून भीमसेनजी जेव्हा तार षड्ज लांबवायचे किंवा तान घ्यायचे, तेव्हा श्रोत्यांना एक वेगळाच आनंद मिळायचा. भीमसेनजी मैफलीचे बादशहा होते. त्यांची मैफल म्हणजे श्रोत्यांची तुडुंब गर्दी आणि वाहवांची खैरात! किराणा गायकीला नवीन जीवनसत्त्व देऊन तिचं आयुष्य वाढवण्यात, तिला सुदृढ करण्यात भीमसेनजींचा मोठा वाटा आहे. ‘अभंगवाणी’नं भीमसेनजींना विलक्षण लोकप्रियता मिळवून दिली. भीमसेनजींसारखी ‘भीमसेनी’ लोकप्रियता मिळवणारा विनम्र शास्त्रीय गायक एखादाच.
माझे गुरू सुरेशबाबू, हिराबाई यांच्या स्मरणार्थ गेली अनेक वर्षे विलेपार्ले इथे मी एक मोठा संगीत महोत्सव करते. या उत्सवाला भीमसेनजी आवर्जून यायचे. त्यामुळे उत्सवाची शान निश्चितच वाढायची. माझे दोन्ही गुरू गेल्यानंतर - सरस्वतीबाई, गंगूबाई, फिरोज दस्तूर आणि भीमसेनजी - माझं कौतुक करण्यासाठी, मला आशीर्वाद, शुभेच्छा देण्यासाठी माझ्या पाठीशी होते. मात्र पाहता पाहता ही वडीलधारी मंडळी एकेक करत सोडून गेली. आता मात्र मी खरोखरीच पोरकी झाले आहे.