स्वातंत्र्यसूर्य: बजाज... नव्हे नव्हे, ते तर होते ‘जमनालाल गांधी’च!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 05:42 AM2022-08-29T05:42:47+5:302022-08-29T05:43:16+5:30
Jamnalal Bajaj: ज्या राष्ट्रपित्याच्या पावलावर पाऊल टाकून कोट्यवधी भारतवासीयांनी स्वातंत्र्याच्या समरात उडी घेतली, त्यांचे आशीर्वाद मिळणे हीच मोठी भाग्याची बाब समजली जायची. परंतु, केवळ महात्मा गांधींचा आशीर्वादच नव्हे तर त्यांचे पाचवे पुत्रच अशी ओळख मिळण्याचे सौभाग्य जमनलाल बजाज यांना लाभले.
संकलन : योगेश पांडे,
(मुख्य उपसंपादक, लोकमत, नागपूर)
ज्या राष्ट्रपित्याच्या पावलावर पाऊल टाकून कोट्यवधी भारतवासीयांनी स्वातंत्र्याच्या समरात उडी घेतली, त्यांचे आशीर्वाद मिळणे हीच मोठी भाग्याची बाब समजली जायची. परंतु, केवळ महात्मा गांधींचा आशीर्वादच नव्हे तर त्यांचे पाचवे पुत्रच अशी ओळख मिळण्याचे सौभाग्य जमनलाल बजाज यांना लाभले.
१९२० सालचे नागपूर अधिवेशन ऐतिहासिक होते. शतकातील सर्वात मोठे नैतिक पुरुष असलेल्या महात्मा गांधी यांनी १९२० साली झालेल्या एका सभेत जमनलाल यांना पाचवा पुत्र संबोधले व त्यानंतर जमनलाल यांची भावना होती की, ‘माझी साधनापूर्ती झाली’.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या जमनालाल बजाज यांनी देशाला औद्योगिक चेहरा देण्याचेही काम केले. विशेष म्हणजे बजाज यांनी गांधीजींच्या एका शब्दावर विदर्भातील वर्धा जिल्ह्याला आपली कर्मभूमी केली. बजाज हे तसे तर मोठे व्यापारी व उद्योजक. परंतु, देशभक्ती त्यांच्या नसानसात भिनली होती. ४ नोव्हेंबर १८८९ रोजी जयपूर संस्थानातील कालिकाबास या खेड्यातील गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वयाच्या चौथ्या वर्षी त्यांना वर्ध्याचे शेठ बच्छराज व्यास यांनी दत्तक घेतले. तेथून बजाज यांचा वेगळाच प्रवास सुरू झाला. लहानपणीच त्यांना लोकमान्य टिळक, रवींद्रनाथ टागोर यांच्यासारख्या थोर व्यक्तींना जवळून पाहता आले. नागपुरात टिळकांनी ‘केसरी’ वर्तमानपत्र सुरू करण्याची तयारी सुरू केली. त्यावेळी तरुण जमनालाल यांनी स्वत: साठविलेले शंभर रुपये टिळकांना दिले होते. देशसेवेसाठी खारीचा वाटा अशी त्यांची त्यावेळी भावना होती.
मात्र, दक्षिण आफ्रिकेतून परतलेल्या मोहनदास करमचंद गांधी यांच्याशी त्यांची भेट झाली आणि त्यांच्या आयुष्याला नवी दिशाच सापडली. असहकार व खिलाफत चळवळीत भाग घेणारे जमनलाल बजाज यांनी नागपुरात झेंडा सत्याग्रहाचेही नेतृत्व केले. १८ महिन्यांचा कारावासदेखील भोगला. त्यांनी विदर्भात काॅंग्रेसला बळकटी देण्याचे काम केले. विनोबा भावेंच्या सत्याग्रह आश्रमाच्या स्थापनेत पुढाकार घेणाऱ्या बजाज यांनी काॅंग्रेसचे कोषाध्यक्षपदही भूषविले. मिठाच्या सत्याग्रहात त्यांच्यासारखा उद्योजक सर्व काही बाजूला सारून उतरला. इतकेच नव्हे तर पत्नीलादेखील त्यांनी सत्याग्रहात जाण्यासाठी प्रेरणा दिली. यासाठी त्यांनी तुरुंगवासही भोगला.
केवळ राजकीय चळवळींमध्येच बजाज सहभागी नव्हते. अस्पृश्यता निवारण शिक्षणासाठी त्यांनी प्रयत्न केले. स्वत:च्या मालकीचे लक्ष्मीनारायण मंदिर त्यांनी बहुजनांसाठी खुले केले व एक नवा अध्याय रचला. गोधन बचाव चळवळीतही त्यांचा मौलिक वाटा होता. त्यांनीच वर्ध्यात गो सेवा संघाची स्थापना केली. मुलोद्योग शिक्षण, महिला शिक्षणासाठीही त्यांनी आग्रह धरला. देश स्वतंत्र झाल्यावर येथील लोकांना आत्मनिर्भर करण्यासाठी उद्योग हवेत याची त्यांना जाण होती. त्यासाठी देशाने तयार राहावे, या भावनेतून त्यांनी १९२६मध्ये बजाज समुहाची स्थापना केली.
उद्योग क्षेत्रातील यशाची शिखरे पादाक्रांत करत असताना जमनालाल बजाज यांचे पाय मात्र जमिनीवरच होते व देशाचे स्वातंत्र्य हेच त्यांचे प्रमुख ध्येय होते. त्यासाठीच त्यांनी आपल्या खिशातील पैसे स्वातंत्र्यलढ्यासाठी लावले. पाचवेळा ते तुरुंगात गेले होते.
महात्मा गांधी यांचे देशातील अनेकांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. मात्र, जमनलाल बजाज यांच्यावर त्यांचा विशेष जीव होता. वर्धा येथे आश्रम स्थापन करावा, असा सल्ला त्यांनी गांधीजींना दिला आणि त्यासाठी आपली २० एकर जमीनही दान केली. १९२०पासून त्यांचे घर बजाजवाडी हे तर मध्य भारतातील राजकीय बैठकींचे महत्त्वाचे स्थानच झाले होते. १९२० साली नागपुरात झालेल्या काॅंग्रेसच्या अधिवेशनातून असहकाराचा नारा निघाला व जमनलाल बजाज यांनी ‘रायबहादूर’ पदवी परत केली. त्या काळातील मोठे वकील, उद्योगपती यांचे राहणीमान ब्रिटिशांच्या पठडीतीलच होते. मात्र, श्रीमंत असूनही जमनालाल बजाज यांचे सूत्र ‘साधे जीवन, उच्च विचार’ असेच राहिले. त्यांना कधीही पदाची लालसा नव्हती. त्यामुळे १९३६ साली काॅंग्रेसचे अध्यक्ष होण्याची संधी असतानाही त्यांनी ती नाकारली. विदर्भातील वर्ध्याच्या भूमीला त्यांनी आपलेपणाने जपले व शेवटपर्यंत त्यांनी तेथील संस्कारांशी नाळ जुळवून ठेवली होती. स्वातंत्र्याचा सूर्य ते पाहू शकले नाहीत. परंतु, आजदेखील ‘जमनालाल बजाज उर्फ गांधी’ ही त्यांची ओळख त्यांच्या कार्याची प्रचिती देते.
- त्यांच्या निधनानंतर सरदार पटेल म्हणाले होते, ‘जमनालाल बजाज यांच्या जाण्याने बापूंनी त्यांचा मुलगा गमावला, जानकीदेवी व त्यांच्या कुटुंबियांनी एक सच्चा आश्रयदाता, देशाने एक निष्ठावंत सेवक, काॅंग्रेसने एक मजबूत स्तंभ, गायीने एक खरा मित्र, अनेक संस्थांनी त्यांचा संरक्षक व आम्ही सर्वांनी आमचा सख्खा भाऊ गमावला आहे,’ आजही वर्धा जिल्ह्यातील मातीमध्ये बजाज यांचे संस्कार असून, त्यांच्या कार्याला आजची पिढीदेखील नमन करते, यातच त्यांचे मोठेपण लक्षात येते.