स्वीडन ते मुंबई ‘फ्रायडे फॉर फ्यूचर’

By गजानन दिवाण | Published: September 21, 2019 05:28 AM2019-09-21T05:28:06+5:302019-09-21T11:29:28+5:30

विकासाच्या नावाखाली आपण निसर्ग संपविण्याच्या विडा उचलला आहे.

From Sweden to Mumbai 'Friday for the Future' | स्वीडन ते मुंबई ‘फ्रायडे फॉर फ्यूचर’

स्वीडन ते मुंबई ‘फ्रायडे फॉर फ्यूचर’

Next

- गजानन दिवाण (उपवृत्तसंपादक, लोकमत)

विकासाच्या नावाखाली आपण निसर्ग संपविण्याच्या विडा उचलला आहे. त्यामुळे सध्या दररोज किमान २०० वनस्पती आणि कीटकांच्या प्रजाती नामशेष होत आहेत. विनाशाचा हा वेग असाच राहिला तर जीवसृष्टीच नष्ट होईल, असा इशारा युनोने दिला आहे. जीवसृष्टीच नष्ट झाली तर केलेल्या विकासाचा उपयोग तो काय? हा विचार आज ना राज्यकर्ते करतात ना सर्वसामान्य माणूस म्हणून आपण सारे. असे असले तरी उद्याचे भविष्य असलेल्या मुलांमध्ये तो होतो आहे. म्हणूनच तर स्वीडनमधील ग्रेटा थनबर्ग ही मुलगी पृथ्वीची विनाशाकडे होत असलेली वाटचाल रोखण्यासाठी काही तरी करा अशी साद घालत आॅगस्ट २०१८ पासून सलग ३ आठवडे स्वीडनच्या संसदेसमोर बसली. पुढे ती दर शुक्रवारी स्वीडनच्या संसदेबाहेर बसू लागली. आज तिच्या ‘फ्रायडे फॉर फ्यूचर’ या आंदोलनात जगभरातील शंभराहून अधिक देशांतील लाखो मुलं सहभागी झाली आहेत. महाराष्ट्रातही यात मागे नाही. म्हणूनच स्वीडन ते मुंबईचा हा प्रवास आशावादी आहे.

मूळचा अमरावती जिल्ह्यातला रहिवासी असलेला आणि आता सध्या मुंबईत राहणारा २४ वर्षांचा निखिल काळमेघ सध्या याच आंदोलनाचा भाग आहे. अन्न, पाणी आणि हवा या माणसाच्या मूळ गरजा. प्रदूषणामुळे त्याच धोक्यात आल्या. कोल्हापुरात ओला दुष्काळ असताना मराठवाडा कोरड्या दुष्काळाशी लढताना यंदा सर्वांनीच पाहिला. एकट्या महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षांत १२ हजारांवर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. हवामान बदलाचा सर्वाधिक फटका गरिबांना विशेषत: शेतकऱ्यांना बसतो.


यातून सावरण्यासाठी ‘इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज (आयपीसीसी)’च्या अहवालानुसार आपल्या हातात २०३० सालापर्यंतचाच वेळ आहे. त्यामुळेच ग्रेटाच्या ‘फ्रायडे फॉर फ्यूचर’ आंदोलनात १५ मार्च रोजी सहभागी झाल्याचे निखिल सांगतो. या लढाईत मुंबईतून तो एकटाच होता. निखिलने एकट्यानेच मंत्रालयासमोर आंदोलन केले. नंतर आपल्या कॉलेजसमोर, मरिन ड्राइव्हवर आंदोलन केले. आता मुंबईपासून ते पुण्यापर्यंत ‘फ्रायडे फॉर फ्यूचर’ आंदोलनात त्याने अनेकांना जोडले आहे. या ग्रुपमध्ये उदगीरपासून मुंबईपर्यंत आणि अमरावतीपासून कोल्हापूरपर्यंत राज्यभरातील हजारो युवक-विद्यार्थी जोडले गेले आहेत.

मुंबईत निखिलनंतर या आंदोलनाशी जोडली गेलेली पूजा दोमडिया म्हणाली, विकासामुळे आपले आणि आपल्या मुलांचे जगणे अवघड झाले आहे. मरणदेखील सोपे राहिले नाही. पृथ्वीला आणि ओघाने स्वत:ला संपविणारा हा विकास कशासाठी, हा तिचा सवाल. त्यामुळे वातावरणातील बदलाचा फटका मला बसणार नाही, असे म्हणणे वेडेपणाचे आहे. ते रोखायचे असेल तर प्रत्येकाने जागृत होऊन याकडे पाहिले पाहिजे, असे ती सांगते. एप्रिल महिन्यापासून मुंबईत कुठल्या तरी एका भागात ‘फ्रायडे फॉर फ्यूचर’ आंदोलनांतर्गत दर शुक्रवारी एक जनजागृती कार्यक्रम घेतला जातो. तेव्हापासून एकाही शुक्रवारी यात खंड पडला नाही. हे इतर कोणासाठी नाही, तर स्वत:साठीचे आंदोलन असल्याचे ती सांगते. या आंदोलनांतर्गत २० सप्टेंबरपासून पुढे आठवडाभर शाळा-महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन, रॅली, जनजागृतीपर कार्यक्रम होणार आहेत. त्याची सुरुवात पहिल्याच दिवशी मुंबई, पुणे, कोल्हापूर येथे मोठ्या संख्येने झाली आहे. अनेक शाळांनी यात सहभाग नोंदविला आहे. प्रत्येक गावातून-शाळेतून यात सहभाग वाढला पाहिजे, ही तिची अपेक्षा.


कोल्हापुरातही काही संवेदनशील कार्यकर्ते ग्रेटाच्या आंदोलनाने प्रभावित झाले. त्यांनी गेल्या काही दिवसांपासून शाळा-महाविद्यालयांत जनजागृती सुरू केली आहे. पर्यावरणातील बिघाडांना जबाबदार असणाºया आपण सर्वांनी या मुलांची हाक ऐकून एक तरी पाऊल टाकणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण ‘फ्रायडे फॉर फ्यूचर’ आंदोलनात सहभागी होऊ या, असे आवाहन कोल्हापूरचा नितीन डोईफोडे करतो.
पुण्याचा शुभम हाळ्ळे हा एसपी कॉलेजचा विद्यार्थी. तो पर्यावरणाशी निगडित अनेक संस्थांसोबत काम करतो. तो मूळचा उदगीरचा. आजी-आजोबा तिथेच राहतात. अधूनमधून येणे-जाणे होत असल्याने मराठवाड्याचा दुष्काळ जवळून अनुभवला असल्याचे तो सांगतो. मुंबईत महाविद्यालयात शिकत असतानाच पॅरिस करार झाला. तेव्हापासून तो पर्यावरणाशी जोडला गेला आहे. पुण्यात प्रत्येक शाळेत, प्रत्येक मुलापर्यंत हे आंदोलन पोहोचविण्यासाठी तो व त्याचे सहकारी झटत आहेत. पुण्यात लोकसंख्येपेक्षा वाहनांची संख्या जास्त आहे. कसे परडवडेल हे आम्हाला, हा त्याचा सवाल. सार्वजनिक वाहनांचा वापर करावा हे आम्ही शाळेत वाचले आणि तिथेच सोडून दिले. आता स्वत:ला आणि पृथ्वीला वाचवायचे असेल तर या गाड्यांच्या संख्येवर निर्बंध यायला हवेत, असे तो म्हणतो.
पृथ्वीला नव्हे तर स्वत:ला वाचविण्यासाठी ‘फ्रायडे फॉर फ्यूचर’ हे आंदोलन असल्याची जाणीव अनेकांना झाली आहे. आपल्याच कृतीमुळे होणारा निसर्गाचा कोप रोखायचा असेल, तर ही जाणीव प्रत्येकामध्ये व्हायला हवी. तेव्हाच सर्वांचे भविष्य उज्ज्वल असेल. अन्यथा सर्वांचाच विनाश अटळ आहे.

Web Title: From Sweden to Mumbai 'Friday for the Future'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.