नुसती नावे ठेवू नका, बिहारमध्ये एकदा या तर खरे!: शहनवाज हुसैन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2022 07:47 AM2022-05-18T07:47:01+5:302022-05-18T07:49:17+5:30
बिहारचे उद्योगमंत्री सय्यद शहनवाज हुसैन यांच्याशी ‘लोकमत’चे वरिष्ठ संपादक शरद गुप्ता यांनी केलेल्या संवादाचा संपादित सारांश.
बिहारमध्ये गुंतवणूकदारांनी यावे यासाठी आपण दिल्लीत नुकतेच आंतरराष्ट्रीय संमेलन भरवले होते. कसा प्रतिसाद मिळाला?
हा ऐतिहासिक समारोह होता. देश-विदेशातील १७० कंपन्या सहभागी झाल्या होत्या. यात अदानी, लुलू समूह, आयटीसी, हिंदुस्थान लिव्हर, कोका कोला, ॲमेझॉन, फ्लीपकार्ट, सॅमसंग, ब्रिटानिया, पतंजली, उषा मार्टिन, होंडा, एल अँड टी, अरविंद मिल्स, टाटा ब्लू स्कोप, केईआय इंडस्ट्रीज, श्री सिमेंट, अंबुजा यांच्यासह अनेक नामवंत कंपन्या सामील झाल्या होत्या.
बिहारमध्ये उद्योगवाढीची शक्यता पहिल्यांदाच अजमावली जात आहे काय?
नाही. यापूर्वी २००६ साली नितीशकुमार यांनी एक गुंतवणूकदार परिषद घेतली होती. त्यानंतर छोटे-मोठे प्रयत्न झाले. परंतु बिहारबाबत इतक्या मोठ्या प्रमाणावर रस प्रथमच दाखवला गेला.
या कंपन्या बिहारमध्ये गुंतवणूक करणार का?
लुलू इंटरनॅशनलचे चेअरमन आणि एमडी युसुफ अली यांनी बिहारमध्ये अन्नप्रक्रिया उद्योग आणि एक शॉपिंग मॉल उभारण्याची घोषणा केली. अदानी समूह गयेत लॉजिस्टिक्स आणि मुझफ्फरपूरमध्ये अन्नप्रक्रिया उद्योगात गुंतवणूक करील. आयटीसीचे चेअरमन संजीव पुरी यांनीही मुझफ्फरपूरमध्ये मोठ्या गुंतवणुकीचा वादा केला आहे. आयटीसीचे बिहारमध्ये आधीच ९ कारखाने आहेत. अंबुजा, श्री सिमेंट या कंपन्याही प्रकल्प सुरू करणार आहेत. फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनही गुंतवणुकीच्या विचारात आहे.
या संमेलनात एकंदर किती गुंतवणुकीचा वादा केला गेला?
आम्ही कोणाशीही वादा केला नाही. हे संमेलन प्रामुख्याने राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय पातळीवर बिहारची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न होता. प्रतिमा बदलली तर उद्योग आपोआप येतील. म्हणून आमची घोषणा आहे, ‘एकदा या तर बिहारमध्ये!’
बऱ्याच काळापासून बिहारमध्ये राजकीय अस्थिरता आहे. नितीश यांचे सरकार केंव्हाही पडू शकते असे म्हटले जाते. अशात कोणी उद्योगपती आपल्यावर विश्वास का ठेवील?
नाही, असे नाहीये. भाजपकडे भले अधिक आमदार असतील; पण पुढच्या निवडणुकीपर्यंत नितीश यांना मुख्यमंत्री ठेवण्याचे वचन आम्ही दिले आहे. ते आम्ही कसोशीने पाळू.
बिहारला गुन्ह्यांची राजधानी आणि सर्वाधिक मागास राज्य म्हटले जाते. इथे गुंतवणूक कशी होईल?
मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविले आहे. रात्र असो वा दिवस, आपण येथे निर्भयपणे फिरू शकता. याच कारणाने गेल्या वर्षात बिहारमध्ये ३६ हजार कोटींची गुंतवणूक झाली. पायाभूत सुविधा आणि कायदा - सुव्यवस्था क्षेत्रात नितीश यांच्या काळात चांगले काम झाले.
दरवर्षी अर्धा बिहार पुराच्या पाण्यात बुडून जातो. येथे उद्योग कसे उभे राहतील?
महापूर हा बिहारला शापच आहे. नेपाळच्या पहाडी भागातून आलेल्या पाण्याने हे पूर येतात. पण, गेल्या काही वर्षांत बिहार सरकारने याविषयी बरेच काम केले आहे.
...तरी आपण बिहारमध्ये मोठ्या गुंतवणुकीची अपेक्षा कशी करता?
बिहार शेती उत्पादनात अग्रेसर आहे. उद्योग सुकर व्हावेत यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत. त्यामुळे राज्याच्या औद्योगिकीकरणात पुष्कळच गती आली आहे. २००४ साली राज्याचा अर्थसंकल्प केवळ २५ हजार कोटींचा होता. आज तो वाढून २.३७ लाख कोटींचा झाला आहे. धोरण दुरुस्त करताना आम्ही गुंतवणूकदारांना प्रोत्साहनही देत आहोत.
बिहारमध्ये कोणत्या प्रकारच्या उद्योगांची शक्यता आहे?
आमचा अधिक भर अन्नप्रक्रिया आणि कापड उद्योगावर आहे. राज्यात इथेनॉलचे १७ प्रकल्प उभे राहत आहेत. एकाचा शुभारंभ झालाय. तीन तयारीत आहेत.