डॉ. शां. ब. मुजुमदार : आत्मजेचा आत्मा!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2020 05:46 AM2020-07-31T05:46:52+5:302020-07-31T05:50:07+5:30
डॉ. शां. ब. मुजुमदार ऊर्फ दादांचा ३१ जुलै २०२० रोजी ८५ वा वाढदिवस. सिम्बायोसिस परिवारातील सुमारे ३,५०० सदस्य हा वाढदिवस उत्साहात साजरा करणार होते; परंतु कोरोना उद्रेकामुळे आम्ही हा वाढदिवस सर्वांच्या साक्षीने साजरा करू शकत नाही.
डॉ. विद्या येरवडेकर ।
प्रधान संचालिका, सिंबायोसिस
माझे वडील, डॉ. शां. ब. मुजुमदार ऊर्फ दादांचा ३१ जुलै २०२० रोजी ८५ वा वाढदिवस. आम्ही सर्व आप्तेष्ट, सिम्बायोसिस परिवारातील सुमारे ३,५०० सदस्य हा वाढदिवस उत्साहात साजरा करणार होतो; परंतु कोरोना उद्रेकामुळे आम्ही हा वाढदिवस सर्वांच्या साक्षीने साजरा करू शकत नाही, याची मनापासून खंत वाटते. दादांची मोठी मुलगी या नात्याने दादांबद्दलच्या ज्या भावना मनात रुंजी घालत आहेत, त्यांची अभिव्यक्ती म्हणून हा लेखप्रपंच. आत्मजा म्हणजे मुलगी अर्थात कन्या. मी दादांना माझा आत्मा समजते म्हणून या लेखाचे हे शीर्षक! दादांचा ८५ वा वाढदिवस आणि दादांनी स्थापन केलेल्या सिम्बायोसिस संस्थेचा ५० वा वाढदिवस हा सुवर्णयोग जुळून आला आहे.
सुमारे दीड वर्षापूर्वी दादा आणि आईने ‘आनंदी गोपाळ’ पाहिला. या चित्रपटातील आनंदीबार्इंच्या व्यक्तिमत्त्वाने दादा प्रभावित झाले. चित्रपट पाहून परतल्यावरही दादा त्याच प्रभावाखाली होते. ‘भारतातील पहिली महिला डॉक्टर’ हा मान ज्यांना दिला जातो त्या आनंदीबाई जोशींचे प्रांजळ कष्ट, जिद्द, चिकाटी हे गुण दादांच्या मनाला स्पर्शून गेले. त्यादरम्यान सिम्बायोसिस हॉस्पिटलच्या उभारणीचे काम चालू झालेले होते. दादांच्या मनात आले की, हॉस्पिटल तर आपण सुरू करणारच आहोत, तर या हॉस्पिटलला संलग्नित वैद्यकीय महाविद्यालय आणि टीचिंग हॉस्पिटल सुरू करून ते केवळ स्त्रीशक्तीलाच समर्पित का करू नये? त्यांनी त्याच रात्री मला फोन करून ही कल्पना सांगितली. खरोखरंच हा एक आगळा-वेगळा विचार होता. त्यांच्या कल्पनेचे आम्ही सर्वांनीच मनापासून स्वागत केले. आणि एका वेगळ्या जाणिवेने मेडिकल कॉलेजच्या उभारणीचा श्रीगणेशा केला. हे महाविद्यालय जून २०२० पासून सुरू व्हावे, असे त्यांनी सुचविले. आम्हा सर्वांसमोर केवळ एक ते दीड वर्षाचा कालावधी होता. दादांच्या काम करण्याच्या पद्धतीप्रमाणे एखादे काम हाती घेतले की ते पूर्ण झाल्यशिवाय ते स्वस्थ बसत नाहीत, याची मला पूर्ण कल्पना असल्याने आम्ही सर्व तातडीने कामाला लागलो. एका वर्षात १० लाख चौरस फुटांचे बांधकाम केले. आवश्यक परवानग्या आणि इतर सोपस्कार पार पडण्यात आम्ही यशस्वी झालो व १५० विद्यार्थिनींच्या वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी मिळाली.
हे कार्य पार पडताना एक अत्यंत सकारात्मक ऊर्जा आमच्यामध्ये जाणवत होती. जणू काही दादांची ही इच्छा आमच्या नसानसांतून वाहत हे काम आमच्याकडून करवून घेत होती. केवळ मुलींसाठी वैद्यकीय शिक्षण देणारे महाराष्ट्र राज्यातील पहिले आणि भारतातील दुसरे वैद्यकीय महाविद्यालय सुरू होण्याची ही प्रक्रिया मला कृतार्थ करणारी आहे. ज्ञानयज्ञाचा वसा घेतलेल्या दादांनी आणखी दोन पावले पुढचा विचार केला आणि या महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या आणि गुणवत्ता यादीत असलेल्या पहिल्या पाच विद्यार्थिनींना मोफत शिक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. दादांचा हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प त्यांच्या ८५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने पूर्णत्वास जातो आहे, याचा मला मनापासून आनंद होतो आहे. दरम्यान, पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होऊ लागल्याने दादांनी मला सूचना केली की, आपल्या रुग्णालयातील ५०० खाटा तसेच ३० आयसीयू खाटा कोरोना रुग्णांसाठी आपण होऊन उपलब्ध करून द्याव्यात. त्यासाठी स्थानिक आरोग्य यंत्रणांकडून मिळणाºया सूचनांची वाट पाहू नये, असेही त्यांनी सागितले. दादांची सामाजिक बांधीलकी जपणारी भावना मला सद्गदित करून गेली. आमच्या रुग्णालयातून गेल्या साडेतीन महिन्यांत सुमारे दीड हजार कोरोनाबाधित रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी गेलेले आहेत, तर तीनशे रुग्ण सध्या कोरोनावर अजूनही उपचार घेत आहेत.
चतुर्थश्रेणी कर्मचारी वर्गापासून संचालकांपर्यंत प्रत्येकाला महिन्याच्या एक तारखेला नियमित वेतन मिळाले पाहिजे, हा दादांचा गेली ५० वर्षे चालत आलेला प्रघात आहे. कोरोनाच्या काळातही आर्थिक संकटातून जात असतानासुद्धा ही प्रथा त्यांनी अजूनही खंडित होऊ दिली नाही. सर्व कर्मचाऱ्यांवर पितृवत छाया धरणारे दादा आमच्या सर्वांचेच आधारवड आहेत.
साधारणपणे साठच्या दशकात आमचे आई आणि दादा हे उच्चविद्याविभूषित जोडपे होते. अतिशय प्रतिष्ठित अशा पुणे विद्यापीठामध्ये आई प्राणिशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेत होती आणि दादा वनस्पतिशास्त्रातील पीएच.डी. होते. १९६४ ला माझा जन्म झाला त्यावेळी दादा फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापक होते आणि आई पुणे विद्यापीठात पीएच.डी.साठीचे संशोधन करीत होती. उच्चशिक्षित मात्या-पित्यांच्या पोटी जन्माला आल्यामुळे आजोबांनी माझं नाव ‘विद्या’ असे ठेवलं, पण त्यामागे केवळ इतकंच कारण नव्हतं. मी शिक्षण क्षेत्रातच काही करिअर करावं, अशी त्यांची अंत:स्थ प्रेरणा असावी. लहानपणापासूनच दादांचाच माझ्यावर जास्त प्रभाव आहे.
आज वयाच्या ८५ व्या वर्षीही ते एक प्रचंड ऊर्जास्रोत आहेत. सकाळी ११ ते ३ या आॅफिसच्या वेळेव्यतिरिक्त कितीतरी तास ते कामात गढलेले असतात. दादांना त्यांच्या नातवंडांशी आणि परतवंडांशी खेळायला, दंगा मस्ती करायला खूप आवडते. नातवंडे, परतवंडांबरोबर लहान होऊन संवाद साधतात. तेव्हा त्यांच्यातली आजोबा व पणजोबा ही भूमिका आम्हा सगळ्यांनाच मोहवून टाकते. दादा जितके कुशल प्रशासक आहेत तितकेच प्रेमळ वडील, आजोबा आणि पणजोबाही आहेत. दादा माझ्यासाठी ‘दैवत’ आहेत. त्यांची प्रत्येक इच्छा हा माझ्यासाठी मानदंड आहे. आज मी जी कोणी आहे त्याचे श्रेय त्यांच्या शिकवणुकीचे, मूल्यांचे आणि निर्विवादपणे त्यांचेच! या प्रसंगी कविवर्य बा. भ. बोरकरांच्या एका कवितेतील काही ओळी स्मरतात...
देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे
मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे....
देखणी ती पाउले जी ध्यासपंथे चालती
वाळवंटातुनीसुद्धा स्वस्तिपद्मे रेखिती.....