विवेक हरविल्याचीच लक्षणे...

By किरण अग्रवाल | Published: December 30, 2021 05:05 PM2021-12-30T17:05:04+5:302021-12-30T17:51:30+5:30

Editors view : महापुरुषांबाबत अवमानकारक वक्तव्य करणे ही तशी विकृत मानसिकताच ठरते.

Symptoms of loss of conscience ... | विवेक हरविल्याचीच लक्षणे...

विवेक हरविल्याचीच लक्षणे...

Next

- किरण अग्रवाल

घटनेने दिलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे परधर्माचा अनादर किंवा राष्ट्रपुरुषांवर चिखलफेक करण्याचा परवाना असल्याचा गैरसमज काहींनी करून घेतल्याचे दिसते, त्यातूनच बेतालपणे बरळण्याचे प्रकार वाढले असून, फुकट प्रसिद्धीचा सोस यामागे असल्याचे दिसून येते. रायपूरच्या एका कार्यक्रमात तथाकथित कालीचरण बाबाने महात्मा गांधींबद्दल जे अनुद्गार काढलेत त्याकडेही याचसंदर्भाने बघता यावे. असे प्रकार समाज मान्यतांना धक्का देणारे व भावना दुखावणारे तर आहेतच, शिवाय राष्ट्रद्रोह घडविणारेही असल्याने अशांवर केवळ गुन्हे दाखल करून न थांबता ते फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून त्यांना अद्दल घडेल अशी कारवाई होणे गरजेचे आहे.

 

राष्ट्रपुरुष मग ते कोणीही असोत, कोणत्याही जाती-धर्माचे वा वर्ग विशेषाचे नसतात; समस्त राष्ट्रासाठी ते आदर्श व प्रेरणादायी असतात. त्यामुळे अशा महापुरुषांबाबत अवमानकारक वक्तव्य करणे ही तशी विकृत मानसिकताच ठरते. सन्मानजनक बोलायचे तर त्यासाठी विचार करावा लागतो, संबंधिताचे चरित्र ज्ञात असावे लागते किंवा अभ्यासावे तरी लागते; परंतु विचाराने बोलण्याऐवजी स्वतःच्या प्रचारासाठी जेव्हा कोणी बरळून गेल्याचे पहावयास मिळते तेव्हा अशांची कीव आल्याखेरीज रहात नाही. त्यांना महापुरुषाची थोरवी माहीत नसते अशातला भाग नसतो, परंतु स्वतःला प्रसिद्धीच्या झोतात आणण्यासाठी महनीय व्यक्तीवर चिखलफेकीचा मार्ग त्यांना सोयीचा व सोपा वाटतो, त्यामुळेच अशांच्या तोंडाला वेसण कशी घालता येईल याचा विचार होणे गरजेचे बनले आहे.

 

अकोल्याच्या कुणी कालीचरण बाबाने नुकतेच रायपुरातील एका धर्मसंसदेच्या व्यासपीठावरून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अनुद्गार काढल्याने धर्म प्रांतातील बुवा बाबांच्या राजकीय लालसांचा विषय चर्चेत येऊन जाणे स्वाभाविक ठरले आहे. मुद्दाम येथे राजकीय लालसेचा संदर्भ घेतला कारण त्याखेरीज असा उद्दामपणा घडून येणे शक्य नाही. आपल्या पाठीशी कोणी तरी असल्याचा किंवा उभे राहण्याचा विश्वास असल्याखेरीज अशी मजल गाठली जात नाही. हरिद्वारमध्ये झालेल्या एका कथित धर्मसंसदेतही कुणाकडून धार्मिक विद्वेषाची भाषा केली गेली म्हणे. तेव्हा कालीचरण असो की अन्य कुणी, अशांचा उद्दामपणा रोखणे ही शासनाची व समाजाचीही जबाबदारी आहे; कारण केवळ उद्दामपणाच नव्हे तर राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा मलीन करण्याचा व सर्वधर्मसमभावाच्या तत्वालाच नख लावण्याचा राष्ट्रद्रोह ज्यावेळी घडून येतो तेव्हा अशांना कायद्याच्या चौकटीतुन आवर घालणे गरजेचे बनते

 

दुर्दैव असे, की राष्ट्रपुरुषांचा अवमान करणार्यांना समाजात बहुमान लाभताना दिसतो. कुणी ऊक्तीने तर कुणी कृतीने अधर्म करताना दिसतो. कायदा आपले काम करतो, परंतु संबंधितांना त्याचे भय वाटत नाही. धर्माच्या शाली पांघरून समाजाच्या आस्था आणि श्रद्धांशी खेळणाऱ्या काही बाबांना गंभीर गुन्ह्यांच्या आरोपामुळे गजाआड होतानाही आपण पाहतो आहोत, पण तरीही अंधभक्तांच्या त्यांच्यावरील श्रद्धा दूर होत नाहीत हे आश्चर्याचेच म्हणायला हवे. बाबा गजाआड असतांना त्यांचे भक्त अजूनही मिरवणुका काढतात व त्यांनी वापरलेल्या खडावांवर डोके ठेवताना दिसतात, इतक्या आपल्या श्रद्धा अविवेकी आहेत का? भोंदू व भामट्यांची चिकित्सा करण्याचा विवेकच आपण हरवून बसलोय की काय असा प्रश्न यातून पडावा. ही एक प्रकारची अंधश्रद्धाच म्हणावयास हवी. तेव्हा समाजातील सौहार्दाचे संबंध बिघडविण्यास कारणीभूत ठरणाऱ्या घटकांपासून अंधश्रद्धीयांना दूर ठेवण्यासाठी सुजाण व सदविवेकी नागरिकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

Web Title: Symptoms of loss of conscience ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.