ही तर व्यवस्थेने केलेली हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 01:20 AM2017-09-03T01:20:12+5:302017-09-03T01:20:31+5:30
मंगळवारी मुंबईत अतिवृष्टी झाली. त्याचा फटका जनसामान्यांना चांगलाच बसला. या पावसामुळे कितीतरी बळी गेले. त्यात एक बळी गेला, तो प्रसिद्ध गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट डॉ. दीपक अमरापूरकर यांचा. त्यांच्या जाण्याने वैद्यकीय क्षेत्राची खूपच हानी झाली आहे. त्यांच्या कारकिर्दीवर दृष्टिक्षेप टाकणारा हा लेख
- डॉ. एस. व्ही. कुलकर्णी
मंगळवारी मुंबईत अतिवृष्टी झाली. त्याचा फटका जनसामान्यांना चांगलाच बसला. या पावसामुळे कितीतरी बळी गेले. त्यात एक बळी गेला, तो प्रसिद्ध गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट डॉ. दीपक अमरापूरकर यांचा. त्यांच्या जाण्याने वैद्यकीय क्षेत्राची खूपच हानी झाली आहे. त्यांच्या कारकिर्दीवर दृष्टिक्षेप टाकणारा हा लेख.
डॉ. दीपक नारायण अमरापूरकर (५८ वर्षे) हे जागतिक दर्जाचे पोट व लिव्हरविकारतज्ज्ञ (गॅस्ट्रोएंटरोलॉजीस्ट) होते. सोलापूरच्या व्ही. एम. मेडिकल कॉलेजला १९७७ मध्ये त्यांनी प्रवेश घेतला व एमडी प्रथम वर्ग सुवर्ण पदकासहीत मिळवून नवीन नवीन उच्चांक प्रस्थापित केले. अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्ता व संशोधन वृत्ती त्यांच्यात कॉलेज जीवनापासून होती. एमडीनंतर मुंबईच्या नायर महाविद्यालयात डीएम गॅस्ट्रोएंटरोलॉजीस्टसाठी प्रवेश घेतला, तेव्हापासून या शास्त्रातील प्रत्येक कॉन्फरन्स जर्नल यात दीपकच्या बुद्धिमत्तेचे तेज, विचार करण्याची शक्ती व सर्व सभा समारंभात भाषण करण्याची पद्धत हे एक प्रत्येकाला आवडेल, भावेल, अशीच होती.
अप्लावधीतच तो नायरच नव्हे, तर इतर मेडिकल कॉलेजसमध्ये सर्वांना हवाहवासा वाटणारा संशोधक, संपादक व व्याख्याता म्हणून प्रसिद्ध झाला. नायर नंतर पुढे काय! असा प्रश्न पडल्यावर अती उत्कृष्टतेचा ध्यास घेतलेल्या, या तरुण संशोधक डॉक्टरांनी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये आपले पुढील करिअर चालू केले, तिथेही अमाप रुग्णसमूह अत्यंत कुशल भाषणशैली, निगर्वी स्वभाव व सगळ्यांशी मिळून-मिसळून हास्य विनोद सवांदातून त्याने आपला मित्र परिवार वाढवतच ठेवला.
जर भारतात या लिव्हर किंवा पोटाच्या आजारावर उपाय हवा असेल, तर एकच व्यक्ती तुम्हाला मदत करेल, ती म्हणजे डॉ. अमरापूरकर, असा त्यांचा लौकिक होता आणि याचा त्यांच्या शिक्षकांना अभिमान होता. भारतभर व जगभरात त्याची व्याख्याने, शोधनिबंध याचा अश्वमेध दौडतच होता. बरेच एमडी- एमएस झालेले तरुण डॉक्टर त्याच्याकडे ४ ते ६ आठवडे शिकण्यासाठी येत असत, पण कधीही अवघड केस असेल किंवा काही गुंतागंत झाली असेल, तर तो आपल्या शिष्यवर्गाला मदत करण्यात सदैव तत्पर असायचा. असे त्याचे अनेक शिष्य जगभर विखुरलेले आहेत. अँडोस्कोपी व त्यात करण्यात येणा-या प्रक्रियेत दीपकचा क्रमांक नेहमी पहिल्या तीनमध्ये असायचा. पेशंट श्रीमंत असो वा गरीब, तो किती पैसे देणार आहे, हा विचार कधीच त्यांनी केला नाही. कमी वेळ आणि कमीत कमी खर्चात बरे करून समोरच्या व्यक्तीला कमीत कमी शारीरिक व मानसिक त्रास होईल, याच विचाराने त्याने काम केले
आॅलिम्पिकच्या ५ रिंगाप्रमाणे दीपकचे पाचही पैलू हे संस्मरणीय होते. फारच कमी लोकांना असा सुवर्ण मध्य साधता येतो. महाराष्टÑात बहुतेक सर्व तालुका जिल्हा पातळीवर पोटविकार तज्ज्ञ डॉक्टरना अभिमान असायचा की, मी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये डॉ. अमरापुरकराकडे अँडोस्कॉपी शिकलो आहे. सर्जरीत कितीही धोका असला, तरी प्रोसिजर ही व्यक्ती हसत हसत करायची व लगेच शेजारच्या कान्सल्टिंगमध्ये जाऊन पुढच्या रुग्णाची तपासणी चालू करायची. त्याच्या ओपीडीतील पेशंटचा ओघ हा कधीच आटला नाही. त्याचा एक पेशंट हा १० पेशंटना घेऊन यायचा. कट प्रॅक्टिसशिवाय कोणत्याही डॉक्टरची लोकप्रियता ही त्याची पेशंट तपासणीची पद्धत व सल्ला देण्याची शैली यावर असते. बºयाच वेळा बरा न होणारा आजार, सर्वत्र पसरलेला कॅन्सर अशा रुणांना तो खूप काळजीपूर्वक व मोजक्याच शब्दांत समजावून सांगत असे. त्याचा शब्द हा पोटविकार तज्ज्ञामध्ये शेवटचा मानला जात असे, हे सर्वश्रुत आहे.
अनेक clinical trials त्यांनी अत्यंत प्राभावीपणे केल्या. काहीही न लपविता, त्यातील दुष्परिणाम समजाऊन सांगणे व पेशंटचा फायदा कसा होईल, याचा त्याने नेहमीच विचार केलेला असे. बॉम्बे हॉस्पिटलच्या इंशिक्स कमिटीचे अध्यक्ष डॉ. बी. के. गोयल यांनी ते अनेक वेळा बोलून दाखविले आहे.
अशा व्यक्तीचे अकाली जाणे हे त्याच्या कुंटुबीयाला तर धक्कादायक आहेच, पण पूर्ण वैद्यकीय व्यवसायाची जी हानी झाली आहे, ती कशानेच भरून निघणार नाही. त्यांच्या जाण्याने आपण नोबेल विजेता डॉक्टरही गमाविला. डॉक्टर्सना नेहमी soft target-elite commanita म्हणून संबांधले जाते.
आज डॉ. दीपकऐवजी जर एखादा मंत्री, एखादा राजकीय गुरू, एखाद्या शाखाप्रमुखाबाबत असा अपघात घडला असता, तर काय झाले असते. अहो, तुम्ही मुंबई महानगरपालिकेचे संरक्षक, कंत्राटदार, अभियंते, नगरसेवक, महापौर व त्यांच्यावर वरदहस्त ठेवणारे राज्यकर्ते आम्हाला उत्तर हवे आहे. आपला जीव इतका स्वस्त नाही की, जो ड्रेनेजमध्ये जाऊन समुद्रात मिळेल. आम्हाला या सर्वाचे उत्तर हवे आहे!
(लेखक एमडी मेडिसिन डॉक्टर आहेत.)