वंचितांचा टाहो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2015 09:50 PM2015-09-03T21:50:10+5:302015-09-03T21:50:10+5:30

महादेवराव जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष, राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना, विनायक मेटे यांची शिवसंग्राम परिषद आणि रिपब्लिकन पक्षाचे आठवले

Tahachita taho | वंचितांचा टाहो

वंचितांचा टाहो

googlenewsNext

महादेवराव जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष, राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना, विनायक मेटे यांची शिवसंग्राम परिषद आणि रिपब्लिकन पक्षाचे आठवले आणि गवई गट या राज्यातील सत्तारुढ असूनही सत्तावंचित राहिलेल्या बारक्या पक्षांचे संयुक्त संमेलन नागपुरात अलीकडे भरले. त्यात त्यांच्या नेत्यांनी ‘सत्तेत वाटा द्या नाहीतर इंगा दाखवू’ अशी धमकी सत्तारुढ भाजपाला दिली. या धमकीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा पक्ष यावर फारसा परिणाम होणार नाही याची खात्री ही धमकी ऐकविणाऱ्या नेत्यांनाही चांगली असावी. गेले संबंध वर्ष राज्यातील खऱ्या सत्ताधाऱ्यांनी या पक्षांना व त्यांच्या नेत्यांना ज्या कटाक्षाने सत्तापदांपासून दूर ठेवले त्यावरून आपल्या धमकीचे पोकळपण त्यांच्या लक्षात आलेही असणार. मुळात भाजपाने शिवसेनेसारख्या मातब्बर सहकाऱ्याला अतिशय चिल्लर मंत्रीपदे देऊन ज्या तऱ्हेने आजवर गप्प बसविले त्यावरूनही या वंचित पक्षांना राज्यातील राजकारणाचा नेमका अंदाज आलाच असणार. गंमत म्हणजे या मेळाव्याचे उद््घाटन करायला या नेत्यांनी राज्याच्या बालकल्याण व महिला विकासमंत्री पंकजा मुंडे यांना तर त्याचे अध्यक्षपद स्वीकारायला वीजमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना बोलविले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही या मेळाव्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले होते. मात्र या मेळाव्याची फलश्रुती सत्तापदांच्या मागणीत होणार असल्याची आगाऊ कल्पना असल्यानेच मुख्यमंत्री त्याकडे फिरकले नसणार. पंकजा मुंडे याही त्यांचे भाषण ऐकवून मेळावा सोडून गेल्या तर वीजमंत्री बावनकुळेही काही काळ त्यात रेंगाळून निघून गेले. मंत्र्यांना बोलवण्यामागे त्यांच्या कानावर आपली धमकी प्रत्यक्ष जावी असाच आयोजकांचा हेतू असावा. मात्र तो तडीस गेला नाही. उलट पंकजा मुंडे यांनी राजू शेट्टींना राखी बांधून त्या मेळाव्याचे रुपांतर भावा-बहिणीच्या सलोख्यात करून टाकले. राष्ट्रीय समाज पक्षाच्या बाराव्या वर्धापनदिनानिमित्त बोलविलेल्या या मेळाव्याला वंचितांचे सगळे पक्ष व प्रतिनिधी हजर असले तरी खा. राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा अपवाद वगळता त्यातल्या कोणाजवळही निवडणुकीतून मिळविलेला मजबूत जनाधार नव्हता. जनाधारापासून दूर राहिलेल्या पुढाऱ्यांची व पक्षांची बोळवण कशी करायची ही गोष्ट खऱ्या सत्ताधाऱ्यांना चांगली समजते. रामदास आठवले दिल्लीत गेले वर्षभर मंत्रीपदाची वाट पहात आहेत. त्यांची साधी दखलही तेथे कोणी घेत नाही ही गोष्ट या साऱ्यांच्या लक्षात अजून आली नसेल तर त्यांचे राजकीय आकलनच कमी पडते असे म्हणावे लागेल. रिपब्लिकन पक्षाच्या गवई गटाला राजकारणात फारसे स्थान नाही आणि शिवसंग्राम परिषदेचा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी असलेला ऐतिहासिक संबंधही साऱ्यांच्या लक्षात आहे. जानकरांच्या पक्षाची ‘एका जातीचा पक्ष’ अशी संभावना एका सत्ताधारी पुढाऱ्याने नुकतीच केल्याचे साऱ्यांच्या स्मरणात आहे. एकटे राजू शेट्टी आणि त्यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनाच काय ते आपले उमेदवार लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत निवडून आणून आपला जनाधार सिद्ध करता आला आहे. या शेट्टींनी ‘आपण दुष्काळी भागाचा दौरा केला असल्याचे व त्यात ग्रामीण जनतेला दिलासा देणारी कोणतीही कामे सुरू नसल्याचे’ यावेळी केलेल्या भाषणात सांगितले. वर ‘अच्छे दिन आले असे म्हणणारा एकही माणूस आपल्याला राज्यात भेटला नाही’ असेही त्यांनी सांगून टाकले. भाजपाने आपल्याला सोबत घेऊन मते मिळविली पण सत्तेत वाटा देताना आपल्याला फसविले असा जाहीर आरोप करून ‘वेळ पडल्यास आपली वाघनखे आम्ही बाहेर काढू’ असे ते म्हणाले. महादेवराव जानकर यांनी गेल्या निवडणुकीत आपण ८३ सभा घेतल्याचे व त्यासाठी केलेल्या खर्चाचे बिल भाजपाला दिले नाही असेही यावेळी सांगून टाकले. विरोधी पक्षांनी राज्यसभा व विधानसभा यातील जागांसह २०० कोटी रुपयांची आॅफर दिली असतानाही आपण भाजपासोबत राहिलो अशी त्यांच्या झालेल्या फसवणुकीची रडकथाही त्यांनी सांगितली. यापुढच्या काळात १०० मतदारसंघात पक्षाची बांधणी करून आपले २५ उमेदवार निवडून आणू असे सांगून भाजपाच्या नेत्यांना आणखी चार वर्षांची मुदतही त्यांनी देऊन टाकली. राजकारण हा ताकदीच्या कमीअधिकपणावर चालवायचा खेळ आहे. त्यात आपली, विरोधकांची व मित्रांची ताकद नीट लक्षात घ्यावी लागते. ती समजून घेऊनच राजकीय समझोते आणि वैरे करायची असतात. विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाने या पक्षांना ज्या जागा दिल्या त्या नेमक्या पराभूत होणाऱ्या होत्या ही गोष्ट या पुढाऱ्यांच्या नजरेतून सुटली असेल असे कसे म्हणावे? त्या निवडणुकीत भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरेल व तो प्रसंगी शिवसेनेलाही सत्तेत फारसा सहभाग मिळू देणार नाही हेही त्यांना कळले नसेल असे कोण म्हणेल? जी माणसे दीर्घकाळ राजकारणात आणि राजकारणाच्या परिघावर वावरतात त्यांना आपल्या दुबळेपणाचे वास्तव कळत नसेल व त्यापायी आपल्या वाट्याला येऊ शकणारी वंचना दिसत नसेल तर त्यांना अशा पोकळ धमक्या देऊनच आपले समाधान करून घ्यावे लागते. या बिचाऱ्यांच्या धमक्यांची तरी भाजपाने दखल घ्यावी व त्यांची रडकथा दूर करावी हेच अशावेळी कोणीही म्हणेल.

Web Title: Tahachita taho

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.