ताईचा सल्ला!

By admin | Published: October 7, 2016 02:35 AM2016-10-07T02:35:31+5:302016-10-07T02:35:31+5:30

भारतीय कुटुंब व्यवस्थेतील ताई या नात्याचे (की पात्राचे?) अनन्यसाधारण महत्व कोण कसे नाकारु शकेल बरे? तरीही जे नाकारु इच्छितात त्यांनी बाळ कोल्हटकरांच्या ‘वाहतो

Tai advice! | ताईचा सल्ला!

ताईचा सल्ला!

Next

भारतीय कुटुंब व्यवस्थेतील ताई या नात्याचे (की पात्राचे?) अनन्यसाधारण महत्व कोण कसे नाकारु शकेल बरे? तरीही जे नाकारु इच्छितात त्यांनी बाळ कोल्हटकरांच्या ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’मधील प्रत्येक दुर्वेइतकी त्या नाटकाची वाचिक आणि देखिक पारायणे करावीत हे त्यांच्याच भल्याचे. माय मरो आणि मावशी जगो अशी म्हण उगाचच रुढ झालेली. प्रत्यक्षात आई मरो आणि ताई जगो अशीच म्हण आकाराला यावयास हवी होती. अर्थात अजूनही वेळ गेलेली नाही. हे नाते मुळातच आत्यंतिक सोज्वळ आणि त्यामुळेच अनेक दैनिके, साप्ताहिके आणि मासिके यात प्रसिद्ध होणाऱ्या विशिष्ट सदरांतर्गत कौटुंबिक अडीअडचणी मांडून जो सल्ला किंवा मार्गदर्शन मागितले जाते, त्या सदराचे नावदेखील प्राय: ताईचा सल्ला असेच असते. इतके या नात्याचे महात्म्य आणि थोरवी. परिणामी कोणत्याही सद्गृहस्थाला ताई असणे यापरते अन्य भाग्य असू शकत नाही. महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस इतके भाग्यवान आहेत वा नाहीत, हे आम्हास ज्ञात नाही. त्यांना ताई असेलच तर ते तिचा सल्ला मागतात वा नाही हे ठाऊक नाही. त्यांनी सल्ला मागितला आणि मग ताईने तो दिला किंवा नाही याचेही आम्हास ज्ञान नाही. कदाचित त्यांना ताई असेल, तिचा सल्ला ते मागत असतील, तीदेखील त्यांना तो देत असेल पण हे सारे होतच असेल तर ते चार भिंतींच्या आतमध्ये. मुख्यमंत्री खरा जनसेवक. त्याचे सारे बोलणे, वागणे, चालणे पूर्ण पारदर्शक असले पाहिजे व ते साऱ्या जगाला समजलेही पाहिजे अशी लोकशाहीचीच अपेक्षा. गेल्या दीडेक वर्षात ती काही पुरी झाली नाही. पण आता ती उणीव दूर झाली आहे. त्यांच्या एकतर्फी मुँहबोल्या ताईने त्यांना गुपचूप नव्हे तर जाहीर सल्ला देऊन टाकला आहे, ‘फार चिडचीड होत असेल तर सोडून द्या ती सत्ता’! कोणत्याही व्यक्तीविषयी आणि त्याहून महत्वाचे म्हणजे तिच्या प्रकृतीविषयी इतकी आपुलकी, प्रेम, जिव्हाळा आणि काळजी ताईखेरीज करुन दुसरे कोणी व्यक्तवू शकेल का बरे? त्यामुळे दिवाळी जवळच आली आहे. तेव्हां देवेन्द्रभाऊ यांनी भाऊबीजेच्या दिवशी आपल्या या ताईला, सुप्रियाताई सुळे यांना घसघशीत ओवाळणी घालणे हे त्यांचे भाऊकर्तव्यच ठरते. एकदा ते केले की मग या ताईचा सल्ला मानायचा वा नाही हे ठरवायला ते मोकळे! पण तरीही ताईने हा सल्ला का आणि कशापायी दिला हे त्यांनी उत्सुकतेपोटी का होईना जाणून घ्यायला काहीच हरकत नाही. सुप्रियाताईंचा हा लाडका भाऊ अंमळ अधिकच बोलतो हे सारेच जाणतात. रामाची सीता कोण होती या साध्या, सोप्या आणि वस्तुनिष्ठ प्रश्नाचे एक वाक्यातील किंवा खरे तर एका शब्दातील उत्तर देण्याऐवजी तो थेट इक्ष्वाकू वंशापासून सुरुवात करतो, हे सत्य सारेच जाणतात. पण सुप्रियाताईंचा हा भाऊ चिडचीड करतो, हे सत्य मात्र फारच थोडे लोक जाणतात. कारण व्यवहारात तसे काही दिसत नाही. उलट महाराष्ट्राचा हा प्रथम पुरुष सपत्नीक आपल्याला लाभलेले पद भजतो आहे असेच सर्वसामान्य लोक गृहीत धरुन चालतात. सर्वसामान्य लोक आणि सुप्रियाताई यांच्यात हाच तर फरक आहे. राजकारणात वावरणाऱ्या लोकाना नेहमीच एक मुखवटादेखील सोबत घेऊन वावरावे लागते (ती वाजपेयी-अडवाणी यांची मक्तेदारी नव्हे!) याची चांगलीच जाण सुप्रियाताईंना असणार, नव्हे ती असलीच पाहिजे. कोण कुठले वसंतदादा आणि कोण कुठले नाशिकराव तिरपुडे मुख्य आणि उपमुख्य होतात म्हणजे काय, त्यावरुन झालेली चिडचीड त्यांनी स्वत:च्या डोळ्यांनी घरातच पाहिली आहे. इंदिरा गांधी यांनी हळूच बाबा किंवा पप्पा (जे काही असेल ते) यांच्या पायाखालचे सत्तेचे जाजम हिसकावून घेतल्यानंतर, नरसिंहराव नावाच्या अर्धसिंहाने पंतप्रधानपदाचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेल्यानंतर, त्यांनीच दिल्लीत आव्हान नको म्हणून मुंबईत धाडून दिल्यानंतर, राजीव गांधी यांनी जवळपास फिरकू न दिल्यानंतर अशा अनेक प्रसंगात झालेली घरातली चिडचीड आणि तिचे दुष्परिणाम ताईंनी स्वत: पाहिले व अनुभवलेही आहेत. पण त्या काळातील या चिमुरडीला कोण विचारणार आणि कोण सल्ला मागणार? पण चिडचीड म्हणजे काय हे ताईला चांगलेच ठाऊक असल्याने तिने सद्हेतून देवेन्द्र भाऊना आपुलकीचा सल्ला दिला आहे. तो या भावाने मानला तर एकाचवेळी नितीनभाऊ, विनोदभाऊ, नाथाभाऊ अशा अनेक भावांनाही आनंदच होणार आहे. पण सारे काही त्या नरेन्द्रभाऊंच्या हाती एकवटलेले. अर्थात ताई त्यांच्या पप्पांमार्फत आपल्या मनातली कळकळ तिथपर्यंतही पोहोचवू शकतात. पण त्यात कदाचित कालहरण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात देवेन्द्रभाऊ यांनी कोपर्डीतल्या बलात्कारी संशयितांविरुद्ध खटले दाखल केले नाहीत तर त्यांना घराबाहेर पडू देणार नाही असा इशाराही ताईनी दिला आहे. त्यात हेतू त्रास देण्याचा नसून बाहेर पडल्यावर उगा डेग्यू बिंग्यू व्हायला नको हाच हेतू आहे!

Web Title: Tai advice!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.