पोलादी दोघी अन् जिनपिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2022 07:23 AM2022-08-04T07:23:24+5:302022-08-04T07:23:43+5:30

चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना दोघींनी आव्हान दिले आहे. अवघे काही तास तैवानमध्ये असताना, संसदेसमोर भाषण करताना नॅन्सी यांनी सद्भावनेचा शब्द दिला.

Taiwan's President Tsai Ing-wen, America's Nancy Pelosi and Xi Jinping | पोलादी दोघी अन् जिनपिंग

पोलादी दोघी अन् जिनपिंग

Next

वय, राजकारणाचा वारसा किंवा जगाच्या व्यासपीठावर प्रभाव अशा कोणत्याही मुद्द्यांवर तुलना केली तर त्या दोघींमध्ये तसे काही साम्य नाही. पहिलीचे वय ८२ वर्षे, वडिलांकडून जन्मत:च राजकीय वारसा घेऊन आलेली. जगाचा दादा ज्याला म्हणतात त्या अमेरिकेच्या सत्तावर्तुळातील दुसऱ्या क्रमांकाच्या त्या नेत्या. दुसरी जेमतेम ६६ वर्षांच्या उंबरठ्यावर, राजकारणाचा विचार करता तरुणच. पुढच्या ३१ ऑगस्टला तिचा ६६ वा वाढदिवस. राजकीय वारसा अजिबात नाही. तिच्या वडिलांचे गॅरेज होते. कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर राजकारणात आली. गेली सहा वर्षे ती जेमतेम अडीच कोटी लोकसंख्येच्या, चीनच्या वसाहतवादाच्या शृंखला तोडण्यासाठी, लोकशाही रुजविण्यासाठी संघर्ष करणाऱ्या तैवान नावाच्या चिमुकल्या देशाचे नेतृत्व करीत आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये ज्यांच्या भेटीमुळे महासत्ता चीन अस्वस्थ झाला आहे त्या या दोघी. अमेरिकन प्रतिनिधी सभागृहाच्या अध्यक्ष नॅन्सी पोलेसी व तैवानच्या अध्यक्ष त्साई इंग वेन. दोघींमध्ये एक साम्य मात्र ठळक आहे. दोघीही पोलादी व्यक्तिमत्त्वाच्या आहेत. त्याचमुळे त्या जगभर कौतुकाचा विषय आहेत.

चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना दोघींनी आव्हान दिले आहे. अवघे काही तास तैवानमध्ये असताना, संसदेसमोर भाषण करताना नॅन्सी यांनी सद्भावनेचा शब्द दिला. हुकुमशाही व लोकशाही यामधील एकाची निवड करण्याची वेळ आल्याचे सांगत अमेरिका लोकशाहीवादी तैवानसोबत असल्याची ग्वाही देऊन त्या दक्षिण कोरियाला रवाना झाल्या. त्यांच्यामागे अमेरिकेची ताकद आहेच. पण, खरे कौतुक आहे ते त्साई इंग वेन यांच्या पोलादी वृत्तीचे. वेन म्हणजे ‘मूर्ती लहान, कीर्ती महान’! तैवानवरील चीनची सत्ता गुंतागुंतीची आहे. म्हटले तर रिपब्लिक ऑफ चायना म्हणजे आरओसी असे कागदोपत्री नाव असलेला हा देश काही बाबतीत स्वतंत्र आहे. सार्वभौम मात्र नाही. शे-दीडशे बेटांचा मिळून बनलेला व अंदाजे ३५ हजार चौरस किलोमीटरच्या क्षेत्रफळाचा हा देश चीनचा अंकित आहे. १९७६ पासून म्हणायला ते मर्यादित स्वातंत्र्य आहे. स्वत:चा अध्यक्ष, संसद, मंत्रिमंडळ वगैरे ठेवता येते. चायनीज तैपेई नावाने त्याला ऑलिम्पिकसारख्या जागतिक स्पर्धांमध्ये सहभाग वगैरे घेता येतो. तथापि, स्वतंत्रपणे कोणत्याही देशाशी मुत्सद्देगिरीचे संबंध ठेवता येत नाहीत. आर्थिक व्यवहार करता येत नाहीत. साम्यवादी म्हणजेच डाव्या विचारांची एकपक्षीय व हुकुमशाहीकडे झुकणारी चीनची सत्ता आणि तैवानीज जनतेमधील लोकशाहीचा हुंकार असा हा संघर्ष आहे.

नॅन्सी पोलेसी यांच्या रूपाने अमेरिका यात उतरल्यामुळे महासत्तांच्या संघर्षाचे नवे केंद्र दक्षिण आशियात उघडले गेले आहे. तैवान हे चीनसाठी हाँगकाँगनंतरचे दुसरे नवे आव्हान आहे. नॅन्सी पोलेसी यांच्या तैवान भेटीने चीनचा तीळपापड झाला आहे. ड्रॅगनचे फूत्कार सुरू झाले आहेत. आर्थिक, सामरिक महासत्ता म्हणवून घेणाऱ्या या महाकाय देशाने कडक तंबी दिली होती, की नॅन्सी पोलेसी यांची तैवानला भेट ही अमेरिकेची अक्षम्य चूक आहे आणि त्या चुकीची किंमत चुकवावीच लागेल. त्यानंतरही चीनच्या नाकावर टिच्चून नॅन्सी पोलेसी मलेशियावरून तैपेईला पोचल्या. अमेरिकन वायुदलाच्या ज्या विमानातून त्या तिथे गेल्या त्याच्याभाेवती चार लढाऊ विमानांचे कडे करण्यात आले होते. त्या तैपेईमध्ये उतरणारच हे स्पष्ट झाल्यानंतर तातडीने चीनने शियामेन येथील युद्धनौकांचा ताफा समुद्रात उतरवला. आशियातील सत्ता समतोलात व संघर्षात अत्यंत महत्त्व असलेल्या दक्षिण चीन समुद्रात हालचाली वाढल्या आहेत. क्षेपणास्त्रे सज्ज ठेवण्यात आली आहेत.

तैवानमधून येणारी लिंबूवर्गीय फळे व माशांची आयात, त्यात कीटकनाशकाचा अंश अधिक असल्याचे कारण देऊन  थांबविण्यात आली आहे. चीनमधून तैवानला जाणारी वाळू भरलेली जहाजे रोखली गेली आहेत. त्यासाठी मात्र काही कारण देण्यात आलेले नाही. तैवानमधील सरकारी व खासगी व्यवस्थापनांवर सायबर हल्ल्यांची आणि लोकशाहीसाठी लढणाऱ्या दोन प्रमुख संस्थांवर बंदीची तयारी सुरू आहे. परिणामी, जपानने चिंता व्यक्त केली आहे. रशिया आणि पाकिस्तानने चीनच्या सुरात सूर मिसळला आहे. भारताने अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणामुळे आधीच निर्माण झालेली अस्वस्थता वाढविणारे हे सारे आहे. तूर्त शी जिनपिंग यांच्या महत्त्वाकांक्षेसमोर या दोन पोलादी महिला उभ्या ठाकल्या हे कौतुकाचे. 

Web Title: Taiwan's President Tsai Ing-wen, America's Nancy Pelosi and Xi Jinping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.