ई-लर्निंगचा संपूर्ण लाभ घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 11:24 PM2017-11-14T23:24:52+5:302017-11-15T11:54:52+5:30
व्यत्यय हा एक नवा प्रचलित व्यावसायिक शब्द आहे. त्याने शिक्षणाला अनेक पद्धतीने प्रभावित केले आहे. फायद्यासाठी संस्था, आॅनलाईन मिश्रित हायब्रिड शिक्षण पद्धती या सर्व त्याच्याच अभिव्यक्ती आहेत.
व्यत्यय हा एक नवा प्रचलित व्यावसायिक शब्द आहे. त्याने शिक्षणाला अनेक पद्धतीने प्रभावित केले आहे. फायद्यासाठी संस्था, आॅनलाईन मिश्रित हायब्रिड शिक्षण पद्धती या सर्व त्याच्याच अभिव्यक्ती आहेत. शिक्षणाचे मापदंड व्यापक स्वरूपात बदलत चालले आहेत आणि याची मुख्य तीन कारणे असण्याची शक्यता आहे. तरुण लोकसंख्येचा वाढता प्रभाव, शिक्षणाचा वेगाने वाढता खर्च आणि दुर्गम भागातील लोकांपर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहचविण्याची गरज.
ज्ञान हे दोन प्रकारचे असते. आनुमानिक (डिडक्टिव्ह) आणि अनुभवात्मक (एक्सपरिअन्शिअल). विद्यार्थी त्याला मिळणारे प्रारंभिक मार्गदर्शन आणि आपल्या आजूबाजूच्या वातावरणातून जे शिकतो त्याला आनुमानिक शिक्षण म्हणतात. तर अनुभवात्मक शिक्षण हे रोजगाराच्या उद्देशाने घेतले जात असते. या दोन्ही प्रकारच्या शिक्षणात आपल्या गुरुप्रती प्रगाढ निष्ठा आणि त्यांच्या आदेशांचे पालन करण्याची गरज असते. असे म्हटले जाते की,
ध्यानमूलं गुरुर्मूर्ती: पूजामूलं गुरुर्पदम्
मंत्रमूलं गुरुर्वाक्यं, मोक्षमूलं गुरुर्कृपा
पारंपरिक गुरु-शिष्य परंपरा ही बहुदा शिक्षणाची सर्वोत्तम पद्धत आहे. अर्थात विद्यमान काळात आॅनलाईन शिक्षणाची मागणी वाढत चालली असून ती एकलव्य परंपरेत मोडते. फरक फक्त एवढाच आहे की आता त्यात अंगठ्याची मागणी केली जात नाही, पण कुठेही द्रोणाचार्य लपलेले असू शकतात.
भारतात बहुतांश खासगी, अभिमत विद्यापीठे आणि राज्यातील विद्यापीठे बहुदा दूरस्थ शिक्षणालाच प्राधान्य देत असतात. यामध्ये सर्वसाधारणपणे विद्यार्थ्यांची अध्ययन केंद्र आणि फ्रेंचाइजीमध्ये नोंदणी केली जाते. आयआयटी आणि आयआयएम पदव्युत्तर स्तरावरील शिक्षण आॅनलाईन पद्धतीने देत असते. अनेक खासगी संस्था कामकाजी व्यावसायिक आणि एएमआयई, आयईटीई यासारख्या व्यावसायिक संस्थांसह इतर लोकांनाही आॅनलाईन अभ्यासक्रम उपलब्ध करून देत असतात. या अभ्यासक्रमासाठी दिली जाणारी प्रमाणपत्रे ही व्यावसायिक पदवीच्या समतुल्य असल्याचा त्यांचा दावा आहे.
संगणक आणि इंटरनेटच्या वाढत्या वापराने दूरस्थ शिक्षण अत्यंत सुलभ झाले आहे आणि आज व्हर्चुअल स्कूल आणि युनिव्हर्सिटींद्वारे संपूर्ण आॅनलाईन अभ्यासक्रम दिले जात असतात. याशिवाय अनेक खासगी सार्वजनिक अलाभान्वित, लाभान्वित संघटनासुद्धा सर्वोच्च स्तरापर्यंत पदवीच्या माध्यमाने आॅनलाईन शिक्षणाची व्यवस्था करतात. स्टेनफोर्ड आणि हार्वर्डसारखी नामांकित विद्यापीठेही आॅनलाईन शिक्षणाच्या बाबतीत आघाडीवर आहेत.
शिक्षणाची विद्यमान पद्धत ही विद्यार्थीकेंद्रित असून यात सर्व प्रकारच्या नवकल्पनांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. याअंतर्गत क्लासरुम शिक्षणासह तंत्रज्ञानाच्या माध्यमाने संशोधनात्मक शिक्षण, त्याचप्रमाणे आॅनलाईन शिक्षणापासून तर पारंपरिक शिक्षण पद्धतींचा अवलंब केला जात असल्याचे दिसते.
उच्च शिक्षणात विद्यार्थ्यांच्या नोंदणीची संख्या ३.३ कोटी एवढी असून यापैकी ११ टक्के लोक हे दूरस्थ शिक्षण पद्धतीने शिक्षण घेत असतात. देशात वर्तमान स्थितीत सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा ३.६५ टक्के हिस्सा शिक्षण क्षेत्रात गुंतविला जातो. दूरस्थ शिक्षण पद्धतीला प्रोत्साहन देऊन यावर होणारा खर्च मोठ्या प्रमाणात कमी केला जाऊ शकतो.
दूरस्थ शिक्षण पद्धती अशा विद्यार्थ्यांसाठी आहे जे शाळांमध्ये नियमित हजर राहू शकत नाहीत. अशा विद्यार्थ्यांना पत्रव्यवहार माध्यमाने अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्याची पारंपरिक पद्धत आहे. आता यात आॅनलाईन सेवेचाही समावेश होतो. दूरस्थ शिक्षणात आकलनाचे काम सर्वाधिक कठीण आणि पारंपरिक पद्धतीपेक्षा फार वेगळे असू शकते. कॉपीला आळा घालण्यासाठी यात विशेष लक्ष देण्याची गरज आहे. शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या या वेगवेगळ्या पद्धती दुर्गम क्षेत्रापर्यंत ज्ञानगंगा पोहोचविण्याचे उपयुक्त माध्यम होऊ शकतात. अर्थात या सर्व पद्धतींसाठी वेगवेगळे मापदंड असू शकतात. त्यामुळे या सर्व प्रकारच्या शिक्षणाच्या मूल्यांकनाची विशिष्ट पद्धत असणे गरजेचे आहे.
देशात साक्षरतेचे प्रमाण वाढविण्यासाठी आॅनलाईन दूरस्थ शिक्षण महत्त्वपूर्ण आहे. यामध्ये काही धोकेही आहेत. परंतु ते आम्हाला सतर्क राहून टाळावे लागणार आहेत. विशेषत: अध्यापन साहित्याच्या गुणवत्तेवर लक्ष द्यावे लागेल. त्याचप्रमाणे बदलत्या काळात कुठला अभ्यासक्रम अथवा पाठ्यक्रम दिला जाणे गरजेचे आहे, हे सुद्धा बघावे लागेल.
ई-लर्निंगचे आव्हान जेम्स बेटस् यांच्या शब्दात असे आहे :
‘जर तुम्ही शिकणा-यात रुची निर्माण केली नाही तर चांगल्यात चांगले आणि सखोलात सखोल शब्दही शिकल्याशिवाय राहून जातील. आणि ते असे करीत असतील तर तुम्हाला त्यांच्या डोळ्यात झाकून ते जाणून घेता येणार नाही. त्यामुळे सांगा, दाखवा, लिहा, प्रदर्शित करा आणि दैनंदिन व्यवहाराशी त्याला जोडा. हाच मार्ग उपयुक्त ठरू शकेल.’
आमची विद्वत्ता, उद्यमशिलता आणि जोश आम्हाला या आव्हानांचा सामना करण्यास सक्षम बनवू शकतात काय? हे येणारा काळच सांगेल.
-डॉ. एस.एस. मंठा
(माजी अध्यक्ष,एआयसीटीई
एडीजे.प्रोफेसर,एनआयएएस,बेंगळुरु)