दृष्टिकोन - ‘पॅसिव्ह’ऐवजी ‘अ‍ॅक्टिव्ह’ शिक्षणाच्या दिशेने पावले उचला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2019 06:30 AM2019-09-05T06:30:08+5:302019-09-05T06:30:26+5:30

आजही शिक्षण पद्धतीत अनेक मोठे बदल घडून येणे बाकी आहे. सध्या भारतीय शिक्षण व्यवस्थेत परिवर्तन काळ सुरू आहे.

Take steps towards 'active' education rather than 'passive' | दृष्टिकोन - ‘पॅसिव्ह’ऐवजी ‘अ‍ॅक्टिव्ह’ शिक्षणाच्या दिशेने पावले उचला

दृष्टिकोन - ‘पॅसिव्ह’ऐवजी ‘अ‍ॅक्टिव्ह’ शिक्षणाच्या दिशेने पावले उचला

Next

डॉ. जमशेद भरुचा

१९६२ सालापासून आपल्या देशात दरवर्षी ५ सप्टेंबर हा दिवस ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला जातो. तत्त्वज्ञ, विद्वान, शिक्षक व राजकारणी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा हा जन्मदिवस आहे. आपले अवघे जीवन त्यांनी शिक्षणक्षेत्राच्या विकासाला समर्पित केले.
कोणत्याही देशाचे भवितव्य देशातील मुलांवर आणि त्यांना मिळणाऱ्या शिक्षणावर अवलंबून असते. म्हणूनच केवळ मुलांच्याच नाही, तर देशाच्या जडणघडणीत शिक्षकांची भूमिका अतिशय मोलाची ठरते. आज जगभरात शिक्षकाचे काम हे सर्वाधिक महत्त्वाच्या कामांपैकी एक म्हणून गौरविले जाते. ज्ञान आणि चांगली मूल्ये यांचे खतपाणी घालून शिक्षक युवा मनांची मशागत करतात. आजच्या काळात मानवी इंटरफेसची जागा मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स घेत असताना शिक्षकांनादेखील गतकाळातील गोष्टी, पद्धती बाजूला ठेवून भविष्यासाठी उपयुक्त ठरतील अशी नवी तंत्रे आत्मसात करणे आणि वापरणे अतिशय गरजेचे आहे.

आजही शिक्षण पद्धतीत अनेक मोठे बदल घडून येणे बाकी आहे. सध्या भारतीय शिक्षण व्यवस्थेत परिवर्तन काळ सुरू आहे. शिक्षणाच्या माध्यमातून देशाच्या मनुष्यबळाला सक्षम करण्यासाठी ‘जे पाश्चिमात्यांचे सर्वोत्कृष्ट ते योग्य’ हे धोरण अवलंबिले जात आहे. बहुसंख्य विद्यार्थी फक्त माहिती ऐकतात. परीक्षांच्या काळातील तयारी सोडली तर शिकवण्याच्या, शिकण्याच्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा सहभाग खूपच कमी असतो. भारतातील शिक्षण पद्धती ही आजही मानवी मेंदूच्या शिकण्याच्या पद्धतीशी सुसंगत नाही. लेक्चर सुरू असताना म्हणजे वर्गात जेव्हा फक्त शिक्षक बोलत असतात तेव्हा विद्यार्थ्यांचे मन विचलित होणे सहजशक्य आहे. ४० ते ५० मिनिटांच्या लेक्चरमध्ये खूपच कमी विद्यार्थी संपूर्ण वेळ पूर्ण एकाग्रतेने लक्ष देऊ शकतात. कितीतरी विद्यार्थी ५ मिनिटेही लक्ष देऊन लेक्चर ऐकू शकत नाहीत. पण जेव्हा आपापसांत चर्चा, प्रश्न-उत्तरे, संवाद असे सुरू होते तेव्हा सर्व मुले नीट लक्ष देतात, त्यांचा मेंदूदेखील सजगतेने, वेगाने काम करू लागतो. श्रोत्यांसोबत जराही संवाद न करता, फक्त वक्त्याने बोलत राहण्याची शिक्षण पद्धती उपयुक्त ठरू शकत नाही. ही पद्धत खूप जुन्या काळी सुरू करण्यात आली होती जेव्हा शिक्षक आणि विद्यार्थ्यांदरम्यान संवादाची इतर कोणतीही माध्यमे उपलब्ध नव्हती. पण आज काळ बदलला आहे, आज सर्व विद्यार्थ्यांना सर्व माहिती उपलब्ध असते. फ्लिप्ड क्लासरूम मॉडेलमध्ये विद्यार्थ्यांनी त्यांना नेमून दिलेला भाग संपूर्ण वर्गासमोर वाचायचा असतो. विद्यार्थ्यांनी जे वाचले आहे, त्याचे जे आकलन त्यांना झाले आहे त्याचे विश्लेषण संपूर्ण वर्गासमोर किंवा काही विद्यार्थ्यांच्या समूहासमोर करावे लागेल हेदेखील विद्यार्थ्यांना माहिती असते. आज शिक्षकांचे काम मुलांना माहिती देणे हे नसून ज्ञान संपादनाच्या प्रक्रियेमध्ये त्यांना सामावून घेणे हे आहे. चर्चा, अभिव्यक्ती, समीक्षा, ज्ञानाचा उपयोग आणि नवनवीन विचारांचा, गोष्टींचा शोध या सर्व प्रक्रियांमध्ये शिक्षकांची भूमिका मार्गदर्शकाची असली पाहिजे.

कॉग्निटिव्ह न्यूरोसायन्समध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनाच्या निष्कर्षानुसार सक्रिय शिक्षण पद्धतीमध्ये दिली जाणारी माहिती नीट समजते आणि दीर्घकाळ लक्षात राहते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे नवीन समस्या, अडचणी सोडविण्यात आणि नवीन संधींचा लाभ घेण्यात अशा माहितीचा योग्य प्रकारे उपयोग करता येतो. शेवटी भविष्य म्हणजे तरी काय, ज्यांचा पूर्वी कधीही विचार केला नव्हता अशा समस्या आणि संधी. सक्रिय शिक्षणामुळे व्यक्ती वर्तमान माहिती व ज्ञानावर अशा प्रकारे प्रभुत्व मिळवते की ज्यामुळे परिवर्तनशाली भविष्याला सामोरे जाण्याची क्षमता तिच्यामध्ये निर्माण होते. सक्रिय शिक्षणात विद्यार्थ्यांचा मेंदू संपूर्ण क्षमतेनिशी वापरला जातो. कल्पना, विचारांच्या देवाणघेवाणीत विद्यार्थ्यांना सहभागी करवून घेतले जाते. देशाच्या वेगाने विकसित होत असलेल्या अर्थव्यवस्थेमध्ये एका बाजूला नोकऱ्यांच्या कितीतरी जागा रिकाम्या आहेत तर दुसरीकडे बेरोजगार कॉलेज पदवीधारकांची संख्या वाढते आहे. भारतीय उच्च शिक्षणाच्या समस्येचे हे खूप मोठे लक्षण आहे. अभिनव कल्पना व क्रांतिकारी सुधारणा घडवून आणण्यासाठी सध्याचा काळ अतिशय अनुकूल आहे. विद्यार्थ्यांच्या अंगभूत नैसर्गिक गुणांचा विकास करण्याच्या दृष्टीने शिक्षण पद्धतीची रचना केली गेल्यास भविष्यात भारतातील युवा पिढी देशाला यशाच्या अत्त्युच्च शिखरावर नेऊन पोहोचवू शकते. परंतु तसे न झाल्यास, तरुणांची प्रचंड लोकसंख्या ही देशाची खूप मोठी डोकेदुखी ठरू शकते. निर्णय आत्ता घ्यायला हवा.



(लेखक एसआरएम विद्यापीठात कुलगुरू आहेत)

Web Title: Take steps towards 'active' education rather than 'passive'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.