वाचनीय लेख - न्या. चंद्रचूड आणि एका तैलचित्राची कहाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 09:17 AM2022-11-30T09:17:12+5:302022-11-30T09:18:06+5:30
सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी पिता आणि पुत्रानेही विराजमान होणे ही एक ऐतिहासिक घटना! त्या संदर्भातल्या एका प्रसंगाची आठवण..
- ॲड. मिलिंद पवार
पुणे जिल्हा बार असोसिएशन ही भारतातील एक प्रतिष्ठित संघटना! असोसिएशनने अनेक नामवंत वकील, न्यायाधीश भारतीय न्यायव्यवस्थेला दिले. या असोसिएशनचा अध्यक्ष या नात्याने मी माझे गुरुवर्य ॲड. हर्षद निंबाळकर यांच्यासमोर एक कल्पना मांडली : शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाच्या आवारातील ऐतिहासिक ब्रिटिशकालीन सुप्रसिद्ध ‘अशोक हॉल’मध्ये पुणे जिल्ह्याचे भूमिपुत्र व भारताचे माजी सरन्यायाधीश यशवंतराव चंद्रचूड यांचे तैलचित्र असावे. तो कार्यक्रम पुणे जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने घ्यावा. मी, कार्यकारिणीचे उपाध्यक्ष ॲड. अतुल गुंजाळ, ॲड. प्रवीण नलावडे, सचिव ॲड. विकास हिंगे व ॲड. अभिजित टिकार; आम्ही सर्वांनी पुढाकार घेतला.
स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासात सरन्यायाधीश म्हणून साडेसात वर्षांची प्रदीर्घ कारकिर्द न्या. यशवंतराव चंद्रचूड यांना मिळाली होती. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात समाजहिताचे अनेक निकाल दिले. काही दशकांपूर्वी पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर त्यांचे छोटेखानी वकिलीचे कार्यालय होते. खेड- राजगुरुनगर तालुक्यातील कन्हेरसर हे त्यांचे मूळ गाव. आजही चंद्रचूड कुटुंबाचा मोठा वाडा तेथे आहे. गावातील देवीच्या दर्शनाला चंद्रचूड कुटुंबीय दरवर्षी न चुकता येत असतात.
२०१०-११ या कालावधीत विद्यमान सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड हे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होते. आम्ही न्या. डाॅ. धनंजय चंद्रचूड यांना भेटलो. न्या. यशवंतराव चंद्रचूड यांचे तैलचित्र पुणे जिल्हा न्यायालयात असावे, अशी आमची इच्छा असल्याचे त्यांना सांगितले. ते मंद स्मित करीत म्हणाले, ‘योग्य निर्णय, योग्य कार्यक्रम व योग्य संकल्पना आहे! आम्हा चंद्रचूड कुटुंबीयांना नक्कीच आनंद होईल!’ त्यानंतर पुन्हा दोन आठवड्यांनी भेटायचे ठरले. जिल्हा न्यायालयाच्या आवारात कोणाचेही तैलचित्र लावायचे असल्यास जिल्हा न्यायालय, जिल्हा न्यायालय प्रशासन तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अशा सर्वांची रीतसर परवानगी लागते. जानेवारी २०११मध्ये जिल्हा न्यायालय प्रशासनाकडून परवानगी मिळाली.
तैलचित्र अनावरणाचा कार्यक्रम सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती हेमंत गोखले यांच्या हस्ते, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा व आपल्या प्रमुख उपस्थितीत व्हावा, अशी इच्छा असल्याचे आम्ही न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांना सांगितले. न्या. चंद्रचूड यांच्या पुण्यातील नातेवाइकांनी न्या. यशवंतराव चंद्रचूड यांची काही जुनी व दुर्मीळ चित्रं दिली. आम्ही एक छायाचित्र निवडले, यथावकाश तैलचित्र तयार झाले व अशोक हाॅलच्या प्रचंड मोठ्या भिंतीवर लावले. न्या. चंद्रचूड यांना मी सर्व माहिती देतच होतो. ते म्हणाले, माझी बहीण अमेरिकेत शिकागोला असते. खास या कार्यक्रमासाठी ती उपस्थित राहणार आहे. चंद्रचूड कुटुंबातील सुमारे ४० ते ५० सदस्य कार्यक्रमाला उपस्थित असतील!
कार्यक्रमाच्या दोन दिवस आधी सुटीच्या दिवशी न्या. चंद्रचूड सपत्नीक आले. तैलचित्र पाहून भारावून गेले. ते जे काही बोलले, ते शब्दांत सांगता येणे कठीण आहे. तैलचित्र अनावरणाचा समारंभ २६ मार्च २०११ रोजी झाला. एका गोड, कौटुंबिक व ऐतिहासिक अशा प्रसंगाचा मी साक्षीदार झालो. मी व माझी कार्यकारिणी, आम्ही सारेच धन्य झालो.
विद्यमान सरन्यायाधीश डाॅ. धनंजय चंद्रचूड यांचे शिक्षण दिल्ली आणि हार्वर्ड विद्यापीठात झाले. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि नंतर अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशपद भूषविणारे न्या. चंद्रचूड उदारमतवादी म्हणून ओळखले जातात. अनेक ऐतिहासिक निकाल देणाऱ्या खंडपीठांमध्ये त्यांचा सहभाग होता. ओक्लाहोमा, हार्वर्ड, येल आणि मुंबईसह इतर विद्यापीठांमध्ये ते अभ्यागत प्राध्यापक म्हणून भेट देतात. मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून कार्यरत असताना त्यांच्या भेटीची संधी मिळाली. अतिशय प्रेमळ, उच्च विचारांचे, उदारमतवादी भावना जपणारे, सामान्य माणसाला लवकरात लवकर न्याय कसा मिळेल, असा विचार करणारे न्या. धनंजय चंद्रचूड हे कर्तव्याप्रती अखंड निष्ठावंत आहेत. भारतासारख्या महाकाय देशामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी पिता आणि पुत्रानेही विराजमान होणे ही एक ऐतिहासिक घटना आहे. पुणे जिल्हा न्यायालयातील ऐतिहासिक ‘अशोक हाॅल’मध्ये लागलेले माजी सरन्यायाधीश यशवंतराव चंद्रचूड यांचे तैलचित्र तरुण वकिलांना, न्यायाधीशांना ऊर्जा आणि स्फूर्ती देत असते!
(लेखक पुणे जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष आहेत)