तिळगूळ घ्या, पण गोड कसे बोला?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2016 12:11 AM2016-01-18T00:11:01+5:302016-01-18T00:11:01+5:30
काँग्रेसचे नेते राहुल गांधी दोन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर येऊन गेले. मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर ते आले आणि ‘तिळगूळ घ्या, गोड गोड बोला.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी दोन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर येऊन गेले. मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर ते आले आणि ‘तिळगूळ घ्या, गोड गोड बोला...’ असा संदेश देऊन गेले. त्यांनी दिलेला तिळगूळ त्यांच्या डाव्या उजव्या बाजूला बसलेल्या संजय निरुपम-गुरुदास कामत यांना आणि पाठीमागे बसलेल्या कृपाशंकर सिंह यांच्या किती पचनी पडेल हे काळच ठरवेल. हा तिळगूळ आपण मुंबई काँग्रेस कार्यालयातही देणार असल्याचे राहुल गांधी यांनी जाहीरपणे सांगितले. याचा अर्थ त्यांना मुंबई काँग्रेसमध्ये काय चालू आहे याची पूर्ण कल्पना आली आहे.
मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद सर्वाधिक काळ भूषवले ते मुरली देवरा यांनी. सगळ्या गटातटांना घेऊन ते काम करत होते. गेल्या काही काळात मुंबई काँग्रेसला आपण प्रदेश काँग्रेसपेक्षा मोठे आहोत असे आभास होऊ लागले. कृपाशंकर सिंह यांच्या काळात त्यांनी मुंबई काँग्रेस जास्तीत जास्त चर्चेत कशी राहील यासाठी भरपूर प्रयत्न केले. पण त्यांचे आणि गुरुदास कामत यांचे वाजले. कामत केंद्रात मंत्री असताना त्यांच्यामुळेच चौकशीचा ससेमिरा कृपांच्या मागे लागल्याचा संशय कृपाप्रेमींना कायमचा जडला. त्यातून त्यांचे संबंध कधीच जुळले नाहीत. मधल्या काळात जनार्दन चांदूरकर अध्यक्ष झाले. त्यांची कारकीर्द कोणत्याही अर्थाने लक्षणीय झाली नाही. आता संजय निरुपम यांच्याकडे सूत्रे आली. मुंबई पालिकेच्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवत त्यांनी आखणी केली. विविध उपक्रम राबवणे सुरू केले; मात्र त्यांचे आणि कामत यांचे सख्य जगजाहीर. त्यातून रोज कोणत्या ना कोणत्या कारणाने खटके उडू लागले. आजवरच्या अध्यक्षांमध्ये कामत यांच्याशी जुळवून घेणाराच अध्यक्ष चांगला असे चित्र मुंबई-दिल्लीत तयार केले गेले. त्यातून पक्षाच्या भल्याचा विचार करणारा अध्यक्ष हवा की कामत यांच्याशी जुळवून घेणारा हवा या नेमक्या मुद्द्यावर निरुपम यांनी बोट ठेवले आणि मुंबई काँग्रेसमध्ये घमासान सुरू झाले. मध्यंतरी दोन्ही गटांतील वाद राहुल गांधींपर्यंत नेला गेला. त्यावेळी त्यांनी निरुपम यांच्या बाजूने कौल दिला होता. आता मिलिंद देवराही मैदानात उतरल्याचे चित्र राहुल गांधींच्या दौऱ्यातून स्पष्ट झाले.
मुंबई महापालिकेच्या निवडणुका अजून दूर आहेत. मात्र काँग्रेस पक्षातल्या अंतर्गत लढाया जर अशाच राहिल्या तर या निवडणुका जिंकता येणे स्वप्नच ठरू शकते. पक्ष म्हणून लढायचे की गटबाजी करून लढायचे याचा निर्णय पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांना घ्यावा लागणार आहे. राहुल गांधींच्या तिळगूळ देण्याने तरी पक्षातली गटबाजी संपावी असे निवडणुकीसाठी बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुक उमेदवारांना वाटते. मात्र निवडणुका कोणाच्या नेतृत्वाखाली व्हाव्या हा खरा कळीचा मुद्दा आहे. कामत यांना त्यांचे ऐकणाऱ्यांचीच टीम हवी आहे, तर निरुपम यांना त्यांनी केलेले नियोजन राबवून दाखवायचे आहे. या वादावर पडदा पाडण्याचा प्रयत्न राहुल गांधी यांनी केला आहे. गरज आता निरुपम आणि कामत यांनी हातात हात घेण्याची आहे.
या सगळ्यात शिवसेनेला विरोध करण्याचे, त्यांना उघडे पाडण्याचे काम काँग्रेसकडून ज्या जोरकसपणे व्हायला हवे ते मात्र होताना दिसत नाही. राष्ट्रवादीचे नेतेही अत्यंत उथळ आणि फुसके आरोप करत स्वत:चेच हसे करून घेताना दिसत आहे. वर्षभरात सरकारच्या अनेक विभागांनी निर्णयच घेतले नाहीत असा आरोप करणाऱ्या नवाब मलिक यांनी त्यांच्या मंत्रिपदाच्या संपूर्ण काळात फक्त सात निर्णय घेतल्याचा सणसणीत टोला सरकारने लगावला आहे. त्यातून राष्ट्रवादीचे आणि मलिक यांचे हसे झाले आहे.
तिकडे शिवसेनेने एकला चलो रे म्हणत जे नियोजन सुरू केले आहे ते पाहता खरी लढत भाजपा-शिवसेनेतच होईल असे चित्र आज तरी आहे. सत्तेत राहूनही शिवसेना सरकारच्या विरोधात बोलण्याची एकही संधी सोडत नाही. केंद्र किंवा राज्य सरकारवरील टीकेचा एकही मुद्दा शिवसेना वाया जाऊ देत नाही. विरोधकांची खरी गरज भरून काढण्याचे काम आज शिवसेना करत आहे. सरकार निर्णय घेते तेव्हा ती जबाबदारी एकट्या भाजपाची नसते, तर ती शिवसेनेचीही असते, हे ठणकावून सांगण्याचे कामही दोन्ही काँग्रेसकडून होताना दिसत नाही. ही परिस्थिती बदलू शकते; पण गरज एकमेकांशी गोड बोलून हातात हात घालून काम करण्याची आहे.
- अतुल कुलकर्णी