अमेरिकेत शिक्षण घेणं आता पूर्वीपेक्षा सहजसाध्य

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 04:13 AM2019-11-19T04:13:29+5:302019-11-19T04:15:09+5:30

वार्षिक ओपन डोअर रिपोर्टप्रमाणे सुमारे दोन लाख भारतीय विद्यार्थी सध्या अमेरिकेत उच्चशिक्षण घेत आहेत. हा आकडा मागच्या सहा वर्षांत दुप्पट झाला आहे.

taking education in America easier than ever | अमेरिकेत शिक्षण घेणं आता पूर्वीपेक्षा सहजसाध्य

अमेरिकेत शिक्षण घेणं आता पूर्वीपेक्षा सहजसाध्य

googlenewsNext

- डेव्हिड जे. रॅन्झ, मुंबईतील अमेरिकी वकिलातीचे प्रमुख

वार्षिक ओपन डोअर रिपोर्टप्रमाणे सुमारे दोन लाख भारतीय विद्यार्थी सध्या अमेरिकेत उच्चशिक्षण घेत आहेत. हा आकडा मागच्या सहा वर्षांत दुप्पट झाला आहे. यातून हे स्पष्ट होते, की अमेरिकी शैक्षणिक संस्थांमध्ये उत्तम शिक्षण दिले जाते. त्यात अद्ययावत तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर होतो आणि तेथे उत्तम शिक्षक लाभतात. सखोल संशोधन, वेगवेगळ्या ज्ञानशाखांमधील देवाणघेवाण, मुलांना एकत्र अभ्यास करण्याच्या संधी, सांस्कृतिकतेचा मेळ आणि विचार करायला लावणारी शिस्त असे शिक्षणाला आवश्यक अनेक पैलू येथे पाहायला, अनुभवायला मिळतात. परिणामी, आधुनिक काळाशी सुसंगत असलेल्या कुठल्याही कामाच्या ठिकाणी हे शिक्षण तुम्हाला उपयोगी पडते. तुम्ही तेथे तुमचे कौशल्य सिद्ध करू शकता. म्हणूनच अमेरिकी शिक्षणाकडील ओढा वाढतो आहे.



भारतीय विद्यार्थ्यांतील आधुनिक शिक्षणाबद्दलची आस कायम आहे. अमेरिकेत जाऊन सायन्स, गणित, टेक्नॉलॉजी, इंजिनीअरिंग, मॅनेजमेंट, बिझनेस, लाइफ सायन्स, हेल्थ प्रोफेशन, सोशल सायन्स अशा वेगवेगळ्या शाखांमध्ये शिक्षण घेण्याचा ओढा गेल्या दोन-तीन वर्षांत सातत्याने वाढलेला दिसून येतो. अमेरिकेत शिकण्यासाठी जाणाऱ्या दर सहा परदेशी विद्यार्थ्यांमागे एक भारतीय असतो, यातून तेथे शिकण्याबाबत भारतीय विद्यार्थी किती उत्सुक असतात, हे दिसून येते. हे प्रमाण वाढावे, यासाठी भारतातील अमेरिकी वकिलातीमार्फत प्रयत्नही केले जातात. २००७-०८ मध्ये ९४ हजार ५६३ असलेली विद्यार्थ्यांची संख्या आता दोन लाखांवर गेली आहे, यावरून या शिक्षणाबद्दलची वाढती आस्था दिसून येते. यात साधारण २५ ते ३० टक्के विद्यार्थिनी असतात. त्यांचे प्रमाणही वाढावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.



येथील वैविध्यपूर्ण अभ्यासक्रम शिक्षणाच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देतात. अमेरिकेत ४५०० हून अधिक उच्चशिक्षण संस्था आहेत आणि विविध विषयांच्या अभ्यासासाठी नवनवे मार्ग खुले झाले आहेत. काही विद्यापीठांमध्ये विशिष्ट विषयांवरील संशोधन होते, तर काही कला शाखेतील संस्था मुलांना अनेक विषयांचे एकत्रित ज्ञान देतात.

अर्थात हे शिक्षण घेण्यासाठी भरभक्कम आर्थिक बळ लागते. परंतु त्यासाठी नीट नियोजन आणि संशोधन केल्यास आर्थिक मदत मिळू शकते. ज्यामुळे हे शिक्षण परवडू शकते आणि भविष्यात त्याचा लाभही होतो. अमेरिकेतील राहणीमान व शिक्षणाचा खर्च प्रत्येक राज्यात भिन्न आहे. परंतु परदेशी विद्यार्थ्यांना येथे अनेक शिष्यवृती मिळतात. ज्यामुळे ते उत्तम शिक्षण योग्य दरात मिळवू शकतात.



आता प्रश्न आला व्हिसाचा. अमेरिकी व्हिसा मिळवणे सध्या अत्यंत सोपे व सुकर आहे. म्हणूनच अनेक विद्यार्थ्यांना हा व्हिसा लवकर मिळतो. फक्त अमूक अभ्यासक्रमाचेच शिक्षण का घ्यायचे आहे, ते का आवश्यक आहे, हे व्हिसाच्या मुलाखतीच्या वेळी विद्यार्थ्याने नीट सांगणे आवश्यक आहे. तसेच त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीबाबतची स्पष्टता त्याच्या बोलण्यात हवी. तो दृष्टिकोन यात तपासून पाहिला जातो. तसेच शिक्षणाचा खर्च उचलता येईल याचे पुरावे या वेळी विद्यार्थ्याने द्यायचे असतात. याखेरीज आपल्या देशात परतल्यावर त्याचा काय आणि कसा उपयोग करणार, त्याचे आपल्या देशाशी असलेले नाते हेही स्पष्ट करायचे असते.



एकदा का तुम्ही अमेरिकेतील एखाद्या विद्यापीठात दाखल झालात, की तुमचे स्वागतच होणार. तेथील खुले वातावरण खूप उत्साहवर्धक असते. जगभरातून आलेल्या विद्यार्थ्यांसोबत शिक्षणाचा अनुभव तेथे घेता येतो. त्याचबरोबर विविध शैक्षणिक कार्यक्रमांत तुम्ही सहभागी होऊ शकता. तुमच्या कलागुणांना वाव मिळतो. अनेक खेळ व सांस्कृतिक उपक्रम तुम्हाला आपलेसे करून घेतात. या वातावरणात तुम्हाला पूर्ण सुरक्षितही वाटते. संपूर्ण अमेरिकेत विद्यापीठांमध्ये अत्युच्च सुरक्षा पुरवली जाते. अमेरिकेतील गुन्हेगारीचा दर आता लक्षणीयरीत्या घटला आहे. शिक्षण घेतानाही तुम्ही नोकरीच्या संधी शोधू शकता. ज्यामुळे तुम्हाला थेट कामाचा अनुभवही मिळतो. तुमच्या विषयातील अनुभव घेण्यासाठी तुम्ही एक वर्षापर्यंत नोकरी करू शकता. जर तुम्ही विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या शाखांशी संबंधित असाल, तर तुम्ही तीन वर्षांपर्यंत नोकरी करू शकता.



अमेरिकेतील शिक्षणासाठी शैक्षणिक संस्थेची निवड महत्त्वाची आहे व त्यासाठी नीट माहिती घेऊन, संशोधनांती, संपूर्ण विचार करून निर्णय घ्यावा. जर तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना अमेरिकेत शिकायचे असेल, तर ‘एज्युकेशनयूएसए’ (educationusa.state.gov) या अमेरिकी सरकारच्या अधिकृत संस्थेशी संपर्क साधावा. तुम्हाला अचूक आणि वेळेत माहिती मिळवता येईल. इंटरनेटद्वारे, शाळा-कॉलेजमधील केंद्रांमधून किंवा वकिलातीमार्फत तुम्ही माहिती घेऊ शकता. एज्युकेशनयूएसएचे मोबाइल अ‍ॅपही तुम्ही डाऊनलोड करू शकता.

अमेरिकी विद्यापीठांमधील पदवी तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी बहुमोल ठरेल, यात शंकाच नाही. या वर्षी भारतातून हजारो विद्यार्थी अमेरिकेतील शैक्षणिक प्रवासाला सुरुवात करत आहेत. तुम्हीदेखील त्यांच्याबरोबर हा प्रवास करावा, अशी सदिच्छा.

Web Title: taking education in America easier than ever

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.