'नीट' नीट कधी होणार?; दोन जेईईमुळेही घोळ वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 11:52 AM2018-07-12T11:52:09+5:302018-07-12T11:52:51+5:30
विद्यार्थ्यांना गुणवत्ता असूनही ७०:३० च्या सूत्रामुळे दर्जेदार महाविद्यालयात प्रवेश मिळू शकत नाही
धर्मराज हल्लाळे
देशपातळीवर वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट आणि आयआयटी सारख्या संस्थांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी घेतली जाणारी जेईई अॅडव्हान्स परीक्षा दोन वेळा घेतली जाणार आहे. मेडीकल व इंजिनिअरिंग प्रवेशासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या या परीक्षांकडे महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष असते़ ‘नीट’साठी प्रत्येक वर्षी दीड ते दोन लाख विद्यार्थी प्रवेशित होतात़ यापूर्वी महाराष्ट्रामध्ये वैद्यकीय प्रवेशासाठी सीईटी होती़ ती बंद करून ‘नीट’ची घोषणाही अचानकपणे झाली होती़ विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळाला नाही, त्यामुळे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले़ वर्षभरासाठी दिलासा मिळाला़ शेवटी महाराष्ट्रातील विद्यार्थी ‘नीट’ ला सामोरे गेले़
दरवर्षी मे महिन्यात ही परीक्षा होते़ आता केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयानंतर सदर परीक्षा फेबु्रवारी आणि मे मध्ये होईल़ एकीकडे केंद्र शासनाने विद्यार्थ्यांना दोन संधी उपलब्ध करून देत दिलासा दिल्याचे म्हटले आहे़ तोच कित्ता जेईई अॅडव्हान्स बद्दल आहे़ प्रत्यक्षात या दोन्ही परीक्षांची काठीण्यपातळी लक्षात घेतली तर विद्यार्थ्यांना अचानकपणे जेईईसाठी जानेवारी व नीटसाठी फेबु्रवारी महिन्यात पहिल्या परीक्षेला सामोरे जाणे कसरतीचे ठरणार आहे़ त्यानंतर नेहमीप्रमाणे एप्रिल व मे महिन्यामध्ये अनुक्रमे अॅडव्हान्स व नीट होईल़
महाराष्ट्रात मराठवाड्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जवळपास ५५० जागा आहेत़ विदर्भात ८५० तर उर्वरित महाराष्ट्रात १७१० जागा आहेत़ एकूण महाविद्यालय व जागा आणि परीक्षा देणारे लाखो विद्यार्थी अशी परिस्थिती आहे़ अत्यंत अटीतटीची स्पर्धा होते़ विभागनिहाय विचार केला तर मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना गुणवत्ता असूनही ७०:३० च्या सूत्रामुळे दर्जेदार महाविद्यालयात प्रवेश मिळू शकत नाही हे प्रश्न आणखी वेगळे आहेत़ एकूणच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळविणे हे उद्दीष्ट असणाºया विद्यार्थ्यांना एका गुणांसाठी जीवघेणी स्पर्धा करावी लागते़ दोन वर्षांपूर्वी बायोलॉजी विषयातील काही प्रश्न व त्याच्या उत्तरांबद्दल वाद उद्भवला होता़ एकएक गुण महत्त्वाचा असल्याने विद्यार्थी व पालक उच्च न्यायालयात गेले़ तेथून प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले़ संभ्रम निर्माण करणा-या प्रश्नांचे गुण सर्व विद्यार्थ्यांना मिळाले़ हा सर्व धावपळीचा आणि स्पर्धेचा इतिहास पाहिला तर शासनाने दुबार परीक्षेचे आणलेले धोरण किती गोंधळ निर्माण करेल याची कल्पना येते़.
निश्चितच ज्या परीक्षेत सर्वाधिक गुण आहेत तेच गुण वैद्यकीय, अभियांत्रिकी प्रवेशासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत़ त्यामुळे विद्यार्थी दोन्ही संधी घेतील़ स्वाभाविकच दोन्ही परीक्षांचे प्रवेश शुल्क हे पालकांसाठी भुर्दंड असणार आहे़ जानेवारी व फेबु्रवारीत होणारी जेईई अॅडव्हान्स आणि नीट ची होणारी परीक्षा विद्यार्थी सराव परीक्षेसारखीच देतील़
यापूर्वी नीट, अॅडव्हान्स परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांना रिपीट करण्याची सुविधा होती़ देशपातळीवरील व राज्यातील कटआॅफ लक्षात घेवून पुन्हा दुसºया वर्षी रिपीट करणारेही लाखो विद्यार्थी आहेत़ त्या सर्वांना एकाच वर्षात दोन संधी उपलब्ध झाल्या, हाच काय तो दिलासा म्हणता येईल़ मात्र दोन परीक्षांमधील अल्पावधीचे अंतर लक्षात घेता विद्यार्थ्यांना लाभच होईल का हे एखादा निकाल समोर आल्यानंतरच कळणार आहे़ शिवाय फेबु्रवारी महिन्यात एकीकडे नीट तर दुसरीकडे बोर्डाची परीक्षा असे त्रांगडे होणार आहे़
आॅनलाईन परीक्षेचे सर्वच पातळीवर स्वागत होत असले तरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अजुनतरी काही काळ हे आव्हान आहे़ तसेच वेगवेगळ्या दिवशी परीक्षा होणार याचा अर्थ प्रश्नपत्रिकाही वेगळ्या असणार, अशावेळी सर्वांची काठीण्यपातळी समान असेल का हा प्रश्न उपस्थित होतो़ त्यामुळे नीट व जेईई अॅडव्हान्सच्या दोन्ही संधी विद्यार्थी घेतील़ ज्याला एकीकडे दिलासा म्हटले तरी प्रत्यक्षात विद्यार्थ्यांवर आणखी एका परीक्षेचा ताण वाढला हेही तितकेच खरे आहे़