प्रतिभावान गायिका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 04:22 AM2019-09-28T04:22:07+5:302019-09-28T04:23:03+5:30

लताच्या आवाजातील ज्या गुणाचे अगणित सांगीत-सौंदर्यशास्त्रीय परिणाम झाले आहेत त्याचे वर्णन ‘प्रसाद’ असे करता येईल.

talented and versatile singer lata mangeshkar turns 90 | प्रतिभावान गायिका

प्रतिभावान गायिका

Next

- अमरेंद्र धनेश्वर

लताच्या आवाजातील ज्या गुणाचे अगणित सांगीत-सौंदर्यशास्त्रीय परिणाम झाले आहेत त्याचे वर्णन ‘प्रसाद’ असे करता येईल. मध्ययुगीन संगीतशास्त्रीय साहित्यातून चर्चित झालेल्या या संज्ञेने व संकल्पनेने ‘माध्यम’ म्हणून आवाजाची सारभूत पारदर्शक कार्यक्षमता कशी आहे याकडे लक्ष वेधले जाते. ज्या आवाजात ‘प्रसाद’गुण असतो त्यामुळे त्यातून वा त्याद्वारे सादर होणारे संगीत श्रोत्यांना थेट, लगेच आणि मूळ संगीतातील सर्व वा प्रमुख गुणांचा अजिबात अपभ्रंश न होता - किंंवा तो कमी प्रमाणात होऊन पोहोचतो... लताच्या आवाजाच्या संदर्भात आणि तिच्या सांगीत गुणवत्तेच्या दर्जाबाबतच्या चर्चेत प्राचीन भारतीय संगीतशास्त्रातील आणखी एक सांगीत सौंदर्यशास्त्रीय संकल्पना महत्त्वाची आहे व तिचा निर्देश ‘शारीर’ या संज्ञेने केला जातो. असा आवाज आपणहूनच गायकाच्या अडथळ्याशिवाय भावनेपर्यंत पोहोचतो. प्रयुक्त होत असलेल्या रागाच्या योग्य त्या भावनिक गाभ्याशी थेट पोहोचण्याची आवाजाची क्षमता या गुणाने शक्य होत असते.’ या प्रदीर्घ वाटणाऱ्या अवतरणात संगीतशास्त्रज्ञ डॉ. अशोक रानडे यांनी लता मंगेशकरांच्या आवाजाची दोन अनन्यसाधारण वैशिष्ट्ये सांगितली आहेत. त्यांपैकी एक म्हणजे आवाजाची पारदर्शकता आणि दुसरे म्हणजे त्याचे ‘शारीर’ स्वरूप.



या दोन गुणांनी युक्त असा लताबाईंचा आवाज गीताला इतके परिणामकारक बनवितो की ते गीत स्थलकालाच्या मर्यादा ओलांडून श्रोत्याच्या हृदयापर्यंत थेट पोहोचते. आपल्याला त्याची असंख्य उदाहरणे सांगता येतील. जयदेव यांनी स्वरबद्ध केलेले ‘हम दोनो’ या चित्रपटातील ‘अल्ला तेरो नाम’ या गाण्याचेच उदाहरण घेऊ. हे गाणे ‘धानी’ रागावर आधारित आहे. लताबाईंनी या गाण्यातून ‘धानी’ रागाचा जो आविष्कार केला आहे तो केवळ अद्भुत आहे. अत्यंत निरागस चेहऱ्याची नंदा देव्हाऱ्यासमोर बसून हे गाणे म्हणते. तिचा पती युद्धावर गेला आहे. त्याच्या सुरक्षिततेविषयीची चिंंता एकीकडे तिचे मन कुरतडत असते आणि दुसरीकडे आपली परमेश्वरावरील असीम श्रद्धा त्याला सुखरूप परत आणेल, असा दृढ विश्वासही तिला वाटत असतो. नंदाच्या चेहºयावर हे सर्व भाव जितक्या तरलपणे दिसतात तितक्याच सूक्ष्मपणे ते लताबाईंच्या आवाजात प्रकट होतात. ‘तू दानी तू अंतर्यामी, तेरी कृपा हो जाए तो स्वामी, हर बिगडी बन जाए’ हा अंतरा गाताना त्यांचा आवाज तारसप्तकात ज्या लालित्याने आणि सफाईने भ्रमण करतो त्याला तोड नाही. एकदा पुण्यामध्ये गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात या गीतातले ‘धानी’चे सुंदर रूप मी गाऊन उलगडून दाखवत होतो. समोर श्रोतृवर्गात अभिनेते श्रीराम लागू बसले होते. तेव्हा मी बोलून गेलो की, माझ्यासारख्या किंंवा डॉ. लागूंसारख्या नास्तिक माणसालाही आस्तिक बनविण्याची ताकद या गाण्यात आहे. त्या वेळी डॉ. लागूंनी संमतीदर्शक हालचाल करीत मान डोलावली होती. लताबार्इंच्या आवाजातील पारदर्शकता ही अशी आहे.
 



‘लताच्या आवाजाचा तारता-पल्ला अतिशय विस्तृत आहे. तिला सर्व दिशांनी चपलगती शक्य असते. तिला बºयाच प्रकारची ध्वनिवैशिष्ट्ये शक्य आहेत,’ असेही डॉ. रानडे यांनी अन्यत्र म्हटले आहे. ‘तारता पल्ला’ या वैशिष्ट्याचा विचार केला तर शंकर-जयकिशन यांनी स्वरबद्ध केलेले ‘अजी रुठकर अब कहाँ जाइयेगा’ हे गीत आठवते. या गीताचा आधार म्हणजे ‘देस’ राग आहे. मुळात ‘देस’ राग हा उत्तरांगप्रधान आहे. म्हणजे सप्तकाच्या वरच्या भागात (‘प नी सा’ला) अधिक खुलत जातो. लताबार्इंनी हे गाणे गाताना आपल्या आवाजाच्या तारता क्षमतेची कमाल दाखविली आहे. ‘अजी लाख परदामें छुप जाइएगा’ ही ओळ त्या दोनदा गातात. पहिल्यांदा तार सप्तकातल्या गंधाराला हलकासा स्पर्श करून येतात. दुसऱ्यांदा गंधारावरून रिषभावर येऊन पुन्हा गंधाराकडे ‘छलांग’ मारतात. अक्षरश: अंगावर रोमांच उभे करणारा हा क्षण आहे.



‘मुरकी’ हा अलंकारपणाचा एक राजमान्य प्रकार आहे. लताबाईंच्या गळ्यात ‘मुरकी’ स्वाभाविक किंंवा नैसर्गिकच आहे. तीन किंंवा चार स्वर अतिजलद लयीत गुंफले की त्यातून मुरकी तयार होते. विद्युल्लतेसारखी चमकणारी मुरकी कृष्णराव शंकर पंडित किंवा बडे गुलामअली खान या दिग्गजांच्या गळ्यात विराजमान होती. लताबाईंनी अनेक गीतांमध्ये अतिशय श्रुतीमधुर मुरक्या पेरल्या आहेत. शंकर जयकिशन रचित ‘ये वादा करो चाँद के सामने’ हे गाणे ‘राजहठ’ या चित्रपटात आहे. हे एक युगलगीत आहे. त्यातल्या अंतऱ्याच्या पहिल्या दोन ओळी मुकेशच्या आवाजात आहेत. ‘ये चंदा ये तारे तो छुप जाएंगे, मगर मेरी नजरोंसे छुपना ना तुम’ या मुकेशच्या ओळींना ‘बदल जाए दुनिया न बदलेंगे हम’ असा जवाब लताबाई देतात. पण त्या ओळींपूर्वी त्या ‘आ’ हे स्वरयुक्त अक्षर घेऊन त्या एक झटकदार मुरकी घेतात. ती अक्षरश: काळजाचा ठोका चुकवते. ‘मुगल-ए-आझम’ चित्रपटातील सर्वोत्तम गीतरचना म्हणजे ‘मोहे पनघट पे’. ही मुळातच पारंपरिक ‘पूरब’ अंगाची ठुमरी. नौशादजींनी त्याला चित्रपटगीताचा पेहराव चढविला आहे. ज्याला ‘पंचमसे गारा’ म्हणतात अशा रागावर ही ठुमरी बेतलेली आहे. यातल्या दोन्ही अंतºयांमध्ये लताबाईंनी एकच मुरकी घेतली आहे. ‘कंकरी मोहे मारी’ म्हणताना ‘मो’ आणि ‘हे’ यांच्यामध्ये दोन सेकंद लांबीची पण वेगाने येणारी ही मुरकी आहे. तसेच ‘नैनोंने जादू किया’ यातल्या ‘जा’ आणि ‘दू’ या दोन अक्षरांच्या मध्यभागी ती येते. लताबाईंचा गळा किती नजाकतीने गाण्यातील भाव व्यक्त करू शकतो याची ही उत्तम उदाहरणे आहेत.



लताबाईंच्या गळ्यात असलेली मिंंड ही मुलायम आहे. दोन भिन्न स्वरांना जोडताना त्यांच्या आसपासचे सर्व कण मुळापासून, स्पर्श करीत घेतले की मिंंड तयार होते. त्यांची मिंंड मुलायमपणा टिकवूनही वरवरची वाटत नाही. ‘अल्ला तेरो नाम’च्या दुसऱ्या अंतऱ्यात ‘निर्बल को बल देनेवाले’ ही ओळ गाताना त्या ‘को’ शब्दावर दिलखेचक मिंंड घेतात. वेगवेगळे स्वरांचे आवाजाचे लगाव वापरून भाव गहिरा करण्यात त्या माहीर आहेत. मुखबंदी म्हणजे तोंड बंद करून गाणे. मुखबंदीची तान असते. पण लताबाईंनी ‘आजा रे, अब मेरा दिल पुकारा’ या गाण्यात किंंवा ‘जाने ना नजर पहचाने जिगर’ या गाण्यात मुखबंदीतून आलाप घेऊन अप्रतिम परिणाम साधला आहे, अशी ही प्रतिभावान गायिका आहे.
(लेखक ग्वाल्हेर घराण्याचे गायक आहेत.)

Web Title: talented and versatile singer lata mangeshkar turns 90

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.