तालिबानी जवानांची आता स्केट्सवरून ‘धाड’!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 12:36 PM2023-11-29T12:36:00+5:302023-11-29T12:36:36+5:30
Taliban : तालिबानचं एक वैशिष्ट्य आहे. सत्तेवर असो, नसो, त्यांचं पहिलं ध्येय असतं ते म्हणजे जनतेवर धाक जमवणं. त्यांना कायम दहशतीत, भीतीत वावरायला लावणं. मोकळा श्वास न घेऊ देणं.
तालिबानचं एक वैशिष्ट्य आहे. सत्तेवर असो, नसो, त्यांचं पहिलं ध्येय असतं ते म्हणजे जनतेवर धाक जमवणं. त्यांना कायम दहशतीत, भीतीत वावरायला लावणं. मोकळा श्वास न घेऊ देणं. त्यांना जर आपण धाकात ठेवलं तरच आपलाही त्यांच्यावर वरचष्मा, जरब राहील आणि ते आपल्या कह्यात राहतील यावर त्यांचा प्रचंड भरवसा. त्यामुळे अफगाणिस्तानात अगदी अमेरिका पाय रोवून बसली असतानाही त्यांनी सर्वसामान्य लोकांना मोकळं सोडलं नाही. अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रांचं सैन्य राजधानी काबूलमध्ये तैनात असलं तरी तेव्हाही ग्रामीण अफगाणिस्तानात सत्ता चालत होती ती तालिबान्यांचीच.
आता तर त्यांचच राज्य आहे. त्यामुळे सत्तेत आल्याबरोबर त्यांनी सर्वसामान्य लोकांवर रोब जमवायल, त्यांचा श्वास आवळायला सुरुवात केली आहे. सर्वात पहिल्यांदा त्यांनी आपल्या अजेंड्यावर घेतलं ते महिला आणि मुलींना. त्यांच्यावर अनेक बंधनं तर लादलीच, त्यांचं शिक्षण, फिरणंही जवळपास कायमचं बंद करून टाकलं.
अनेक मध्ययुगीन आणि सरंजामशाही कायदेही त्यांनी पुन्हा सुरू केले. अलीकडेच तालिबाननं आपल्या ‘अपराधी’ नागरिकांना दिलेल्या शिक्षा पाहिल्या तर कोणालाही आश्चर्य आणि धक्का बसेल. प्रत्येकाला आपल्या देशाचा, धर्माचा अभिमान असतो, तसाच तो तालिबान्यांनाही आहे. त्यामुळे आपल्या देशाच्या किंवा धर्माच्या विरोधात कोणी कृत्य करीत आहे, कोणी धर्मत्याग करतो आहे, अशी त्यांना नुसती शंका जरी आली तरी त्या ‘आरोपी’चं मग काय होईल, याची आपण कल्पनाही करू शकत नाही. शिवाय तालिबान्यांची शिक्षा देण्याची पद्धत अतिशय क्रूर आहे. एखाद्याला छळून छळून मारणं, त्याला अति त्रास देणं म्हणजे काय, हे तालिबान्यांच्या शिक्षा पाहिल्यावर लक्षात येतं. अनेक आरोपी तर प्रार्थना करतात, मला आता मारून टाका, पण तरीही ते ज्याला जिवंत ठेवतात आणि जिवंतपणी मरणयातना देतात. धर्मत्याग, राज्यकर्त्यांविरुद्ध बंड, व्यभिचार, चोरी, दरोडा, निंदा, दारू पिणे.. यासारख्या अनेक गुन्ह्यांसाठी अफगाणिस्तानात तालिबानी अतिशय कडक शिक्षा देतात. त्यात हात आणि पाय कापून टाकणे, सर्वांसमक्ष चाबकानं फटके मारणं, आरोपींवर लोकांना दगडं फेकायला, त्यांना दगडांनी मारायला सांगणं, भर चौकात फाशी देणं, त्यासाठी लोकांना बोलवणं, अशा शिक्षा पाहण्यासाठी लोक आले नाहीत, तर त्यांनाही शिक्षा देणं.. असे शिक्षेचे क्रूर प्रकार अफगाणिस्तानात अवलंबले जातात. मुख्य म्हणजे यासाठी त्यांना कोणत्याही न्यायालयाची, कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेची गरज नाही. आपल्याला वाटलं ना, ही व्यक्ती अपराधी आहे, मग पकडा तिला, टाका तुरुंगात, तिचा वारेमाप, अमानवी छळ करा, ‘लटकवा’ तिला फासावर!
संयुक्त राष्ट्रसंघाने नुकतीच त्यावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. तालिबाननं असे प्रकार थांबवावेत आणि नागरिकांचा छळ करू नये, असं आवाहन केलं आहे. पण तालीबाननं याआधीही अशा अनेक आवाहनांना केराची टोपली दाखवली आहे.
लोकांमध्ये आपली दहशत पसरावी यासाठी तालिबानच्या जवानांनी आता आणखी एक नवीच पद्धत अवलंबायला सुरुवात केली आहे. सगळीकडे आपली ‘नजर’ राहावी, कुठेही अचानक ‘छापा’ मारता यावा, लोकांना काहीही भणक लागू नये आणि कुठल्याही बोळीबाळीत भस्सकन घुसता यावं यासाठी त्यांनी रोलर स्केट्सचा वापर करायला सुरुवात केली आहे. पाठीला बंदूक, मशीनगन बांधलेले हे जवान काबूलमध्ये स्केटिंग करत गस्त घालत आहेत. लोकांनी आता त्याचाही धसका घेतला आहे. कारण कोणत्याही ठिकाणी अंतर्गत भागात सहजपणे घुसणंही त्यांना आता शक्य झालं आहे.
तालिबानच्या मते रोलर स्केटवरील हा नवा फोर्स म्हणजे लोकांना त्रास देण्याची नवी उपाययोजना नाही, तर ही ‘पब्लिक सिक्युरिटी पोलिस’ आहे. लोकांच्या संरक्षणासाठी, संकटात असलेल्या नागरिकांपर्यंत तातडीनं पोहोचता यावं यासाठी आम्ही या जवानांची योजना केली आहे, असं तालिबानचं म्हणणं आहे. या स्केटवरील या जवानांचा लोकांनी धसका घेतला आहे, हे मात्र खरं. कारण या जवानांनी अचानक येऊन अनेक ‘आरोपीं’ना आतापर्यंत चाबकानं झोडपलं आहे. काठीचे तडाखे त्यांच्या पाठीवर लावले आहेत, लोकांच्या घरात घुसून ‘तपासणी’ केली आहे. अर्थात ज्या ठिकाणी रस्ते चांगले नाहीत, त्या ठिकाणी मात्र रोलर स्केटवरील या जवानांचा फारसा फायदा होणार नाही.
फ्रान्स, पाकिस्ताननंही केला होता प्रयोग!
तालिबाननं ‘स्केटिंग फोर्स’चा नवाच प्रकार आपल्या देशात सुरू केला असला तरी हा प्रकार मात्र नवा नाही. याआधी फ्रान्सनं पॅरिस या आपल्या राजधानीत पहिल्यांदा स्केटवरील जवानांचा उपयोग केला होता. त्यानंतर पाकिस्ताननंही २०२१ मध्ये कराचीच्या गल्ल्यांमध्ये हे जवान फिरवले होते. अर्थात अजूनपर्यंत तरी कोणीच कायमस्वरुपी या जवानांचा उपयोग केलेला नाही.