Afghanistan: तालिबान्यांमुळे शेकडो महिला बनताहेत ‘पुरुष’

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 06:24 AM2022-02-03T06:24:08+5:302022-02-03T06:24:50+5:30

अफगाणिस्तानातील सत्यकथेवर आधारित ‘द ब्रेडविनर’ ही जगप्रसिद्ध ‘बेस्टसेलर’ कादंबरी काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाली होती. डेबोरा एलिस यांनी पाकिस्तानातील निर्वासित छावण्यांमध्ये राहणाऱ्या शेकडो महिला आणि मुलींशी प्रत्यक्ष बोलून लिहिलेल्या वास्तवाचा या कादंबरीला आधार आहे.

Taliban turn hundreds of women into 'men' | Afghanistan: तालिबान्यांमुळे शेकडो महिला बनताहेत ‘पुरुष’

Afghanistan: तालिबान्यांमुळे शेकडो महिला बनताहेत ‘पुरुष’

Next

अफगाणिस्तानातील सत्यकथेवर आधारित ‘द ब्रेडविनर’ ही जगप्रसिद्ध ‘बेस्टसेलर’ कादंबरी काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाली होती. डेबोरा एलिस यांनी पाकिस्तानातील निर्वासित छावण्यांमध्ये राहणाऱ्या शेकडो महिला आणि मुलींशी प्रत्यक्ष बोलून लिहिलेल्या वास्तवाचा या कादंबरीला आधार आहे. या कादंबरीतील प्रमुख पात्र म्हणजे परवाना. तिचे वडील परदेशात शिकून आले असल्यामुळे तालिबान्यांनी त्यांना पकडून नेलं आणि सुरू झाली या कुटुंबाची ससेहाेलपट. घरात दुसरा कोणीही कर्ता पुरुष नसल्यानं आणि महिलांना पुरुषांच्या सोबतीशिवाय बाहेर पडता येत नसल्यानं शेवटी परवानानं आपले सुंदर केस कापले, मुलासारखा पोशाख केला आणि आपलं स्त्रीत्व लपवत रोजीरोटीसाठी बाहेर पडली. ती जे काही कमावून आणत असे, त्यावरच तिचं कुटुंब जगत होतं. परवानाच्या या धैर्याच्या कहाणीला अख्ख्या जगातून दाद मिळाली. अमेरिकेनं तालिबानलाअफगाणिस्तानातून हुसकावून लावण्याआधीची ही कहाणी...
पण आजही या कहाणीत काहीच बदल झालेला नाही. तालिबान्यांनी अफगाणिस्तानची सत्ता पुन्हा ताब्यात घेतल्यानंतर महिलांवर जिवंतपणी मरणयातना भोगण्याची पाळी पुन्हा एकदा आली. शेकडो महिला आजही ‘पुरुष’ बनून भूमिगत अवस्थेत जगत आहेत.
तालिबानी राजवटीतले कायदे पुन्हा एकदा लागू झाले आहेत. महिलांनी शिक्षण घ्यायचं नाही, नोकरी करायची नाही, एकटीनं बाहेर पडायचं नाही, सोबत पुरुष नातेवाईक हवाच हवा, डोक्यावर हिजाब घातल्याशिवाय कुठेही हिंडता येणार नाही...
अफगाणिस्तानात आजही अशा अनेक महिला आहेत, ज्या एकट्या, घटस्फोटित आहेत, ज्यांचा नवरा मेला आहे, घरात कुणीच पुरुषमाणूस नाही.. ज्या महिला परित्यक्ता किंवा विधवा आहेत, शिवाय ज्यांना लहान मुलंही आहेत, अशा महिलांचं जिणं तर नरकापेक्षाही भयानक झालंय..
काय करावं या बायकांनी? कसं जगावं? आपल्या लहान पोरांना पदराआड लपवून कठे आणि किती पळत फिरावं? तालिबान्यांच्या विखारी नजरा आणि त्यांच्या हातातल्या चाबकाच्या फटकाऱ्यांपासून कसं वाचावं?..
काही वर्षांपूर्वी कादंबरीतल्या लहानग्या परवानानं जो मार्ग अवलंबला होता, तोच मार्ग वास्तवातल्या बऱ्याच महिलांनी आता नाइलाजानं अवलंबला आहे. आपलं स्त्रीत्व कसंबसं लपवत, छातीला घट्ट कापड गुंडाळत आणि पुरुषासारखा सैल पोशाख करून या महिला तालिबान्यांच्या नजरा चुकवत आपल्या कुटुंबाच्या जगण्यासाठी, काहीतरी कामधंदा मिळविण्यासाठी लपतछपत फिरताहेत.
काबूलमधील अशीच एक महिला. तिनंही आपलं स्त्रीत्व लपवत, पुरुषांचा ढगळ शेरवानी घालून ‘पुरुषा’चं रूप घेतलं. तोंडावर मास्क आणि डोक्यापासून पायापर्यंत स्वत:ला झाकत, मान खाली घालून, तालिबान्यांच्या नजरा चुकवत गेल्या काही महिन्यांपासून रोजीरोटीसाठी ती भटकते आहे. आपण किती दिवस असं फिरू शकू, हे तिलाही माहीत नाही. आपली आणि आपल्या लहान मुलीची कायमची ताटातूट होईल, या भीतीनंही तिचा जीव कासावीस होतो आहे. आपली खरी ओळख लपवताना राबिया बलखी असं (खोटंच) स्वत:चं नाव ती सांगते. राबिया ही अफगाणिस्तानातील प्रसिद्ध कवयित्री होती.
तुम्ही मला राबियाच म्हणू शकता, असं सांगताना ती म्हणते, तालिबान्यांनी पुन्हा आपला हैदोस सुरू केल्यानंतर माझ्या गावावरही कब्जा केला. लगेच माझ्या माजी नवऱ्यानं तालिबान्यांशी संधान साधलं आणि माझी मुलगी मला परत मिळवून द्या, असा लकडा त्यांच्याकडे लावला. तालिबानीही लगेच पुढे सरसावले. त्यांनी माझ्याकडे मुलीची मागणी तर केलीच, पण ते जबरदस्तीनं माझ्याशी विवाहदेखील करू पाहात होते. गावातून मी कशीबशी पळाले आणि काबूलमध्ये आश्रय घेतला.
राबिया अगोदर एका एनजीओमध्ये काम करीत होती, पण १५ ऑगस्टला तालिबान्यांनी अफगाणवर संपूर्ण कब्जा केल्यानंतर तिला आपली नोकरी तर सोडावी लागलीच, पण काबूलला पळून जावं लागलं. तालिबान्यांनी महिलांना ‘महरम’ (मेल गार्डियन) शिवाय घराबाहेर पडण्यासही बंदी घातली, तेव्हा तिच्यासाठी आयुष्य आणखी खडतर झालं. एकट्या महिलांना टॅक्सीत बसवू नका, असं फर्मानही तालिबान्यांनी काढलं. टॅक्सी मध्येच थांबवून ते तपासणीही करू लागले. पण आपण एकट्याच नाहीत, अशा शेकडो महिला आहेत, ज्या ‘पुरुष’ बनून फिरताहेत आणि तालिबान्यांविरुद्ध आवाज उठवताहेत, हे कळलं, तेव्हा राबियालाही हिंमत आली. काही निदर्शनांमध्ये तर ती स्वत:ही सामील झाली.. 

तालिबान्यांच्या थपडा आणि हजेरीची सक्ती
या निदर्शनांमध्ये ज्या ज्या महिला सामील झाल्या होत्या, त्यांची धरपकड करायला तालिबान्यांनी सुरुवात केली. त्यातली राबियाची मैत्रीण लीली तर अजूनपर्यंत सापडलेली नाही. तालिबान्यांनी राबियालाही पकडलं, तुझ्याबरोबरच्या इतर महिला कुठे आहेत, हे विचारलं, बऱ्याच थपडा मारल्या आणि पुन्हा ‘हजेरी’ लावायची ताकीद देऊन सोडून दिलं. तेव्हापासून ती पुन्हा गायब झाली आहे

Web Title: Taliban turn hundreds of women into 'men'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.