शेतकऱ्यांचे बोला, नंतर भांडत बसा

By admin | Published: July 13, 2015 12:18 AM2015-07-13T00:18:39+5:302015-07-13T00:18:39+5:30

महाराष्ट्रात सध्या बदलाचे राजकारण सुरू आहे. पंधरा वर्षांची सत्ता हातची गेल्याने अस्वस्थ झालेली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस काही मुद्यांचे कोलीत हातात पडताच राज्यातील

Talk to the farmers, then sit in a ruckus | शेतकऱ्यांचे बोला, नंतर भांडत बसा

शेतकऱ्यांचे बोला, नंतर भांडत बसा

Next

महाराष्ट्रात सध्या बदलाचे राजकारण सुरू आहे. पंधरा वर्षांची सत्ता हातची गेल्याने अस्वस्थ झालेली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस काही मुद्यांचे कोलीत हातात पडताच राज्यातील आजवरच्या सर्व पापांचे धनी भाजपच आहे या आविर्भावात तुटून पडले आहेत. मुख्यमंत्रीही बदलाची भाषा बोलत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीचे घोटाळे बाहेर काढण्याची धमकी त्यांनी दिली आहे. सोमवारपासून सुरू होणारे विधिमंडळाचे अधिवेशन एकमेकांच्या कुलंगड्या बाहेर काढण्याचा अड्डा बनेल असे दिसते. घोटाळे चव्हाट्यावर आणण्यासाठी या अधिवेशनाचा वापर करायला दोघेही निघाले आहेत. यासाठीच का लोकांनी यांना निवडून दिले?
अधिवेशनात शेतकऱ्यांबद्दल बोला. राज्यात पाऊस जवळपास बेपत्ता आहे. शेतकरी अत्यंत हवालदिल झाला आहे. त्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत. इवल्याशा रोपट्यांनी माना टाकल्या आहेत. दुबार पेरणीचे संकट अख्ख्या राज्यावर आहे. विधिमंडळात ७० टक्के आमदार शेतकरी आहेत वा शेतकऱ्यांची मुलं आहेत. तरीही बळीराजाचे अश्रू पुसण्यासाठी विधिमंडळ धावून गेल्याचे दिसले नाही तर त्यासारखे दुसरे दुर्दैव नसेल. धरणं कोरडी पडताहेत, पिकलंच नाही तर चाऱ्याचा प्रश्न भीषण होईल. महागाई डोक्यावर आहेच. टँकरची संख्या वाढते आहे. जलयुक्त शिवार योजनेत निर्माण केलेले पाणीसाठे पावसाची वाट पाहून थकत आहेत. नजीकच्या काळात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनेल. शेतकरीच जगला नाही तर सरकार चालवायचं कोणासाठी? सनसनाटी आरोप-प्रत्त्यारोप करून खळबळ उडवून देण्याची ही वेळ आहे की अख्खे राज्य शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचे चित्र निर्माण करणे ही आजची गरज आहे हे सर्वच पक्षांनी ठरविले पाहिजे.
शिवसेना सत्तेत आहे की विरोधी पक्षात हे अजूनही समजत नाही. ‘मित्र’ पक्ष भाजप हा नंबर एकचा शत्रू असल्यासारखी शिवसेनेच्या नेतृत्वाची विधाने असतात आणि मुखपत्रातून भाजपवर जे तोंडसुख घेतले जाते ते पाहता शिवसेना एकाचवेळी सत्तेतील भागीदार आणि विरोधी पक्षाची भूमिका बजावत असल्याचे जाणवते. सरकारमध्ये सहभागी होऊन राज्याला स्थैर्य द्यायचे आणि त्याचवेळी राजकीय अस्थिरताही ठेवायची अशी दुटप्पी आणि तितकीच अनाकलनीय भूमिका शिवसेनेने घेतली आहे. सत्तेत राहून समाधान नसेल तर त्यांनी बाहेर पडावं. तळ्यातमळ्यात कशाला करता? एक घाव दोन तुकडे हा बाळासाहेबांचा स्वभाव होता.
मातोश्रीचा स्वभाव आता बदलला की काय?
शिवसेनेचे सरकारला सहकार्य नाही. दोन्ही पक्षांमध्ये कुठलाही समन्वय नाही. मुंबई महापालिकेच्या दीड वर्षाने होणाऱ्या निवडणुकीवर डोळा ठेवून एकमेकांवर कुरघोडी करण्याची स्पर्धा भाजप-शिवसेनेत लागली आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा मुंबईत आले आणि त्यांनी वीस वर्र्षे आम्हीच सत्तेत राहणार असा विश्वास पक्षजनांना दिला. केंद्र आणि राज्यात पक्षाची सत्ता असताना भंडारा, गोंदिया जिल्हा परिषदेत असलेली सत्ता भाजपला टिकवता आली नाही. खासदार नाना पटोले विरुद्ध भाजप असा सामना काही ठिकाणी झाला. भाजपचा परंपरागत मतदार असलेल्या या जिल्ह्यात नाचक्की झाली. अंतर्गत हेव्यादाव्यांनी फटका बसला. त्याचे आत्मचिंतन भाजपच्या प्रदेश कार्यालयात दिसत नाही. उलट, दोन जिल्हे गेले तर काय असा फरक पडला ही गुर्मी आहे. केंद्र आणि राज्य सरकारबद्दल लोक खुश नाहीत हे मानायला भाजपवाले तयार नाहीत ही खरी अडचण आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल फॉर्मात होते. त्यांनी शंभर सभा घेतल्या. लोकसभेत दारुण पराभव झालेले पटेल पुन्हा परतले. राज्यात आरोपांमुळे घेरलेल्या राष्ट्रवादीला दिलासा मिळाला. विशेष म्हणजे दोन्ही जिल्ह्यांत दमदार नेता नसलेल्या काँग्रेसनेही चांगले यश मिळविले. काँग्रेस लोकांच्या मनातून गेलेली नाही.
जाता जाता : महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी आपल्या यवतमाळ जिल्ह्यात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाची शेती पेरून दिली. ते आणि अनेक शिवसैनिक दोन दिवस स्वत: शेतात राबले; पेरणी के ली. एखादा मंत्री असे काही करू शकतो हे अविश्वसनीय आणि तितकेच कौतुकास्पद आहे. संजूभाऊ! आपण केवळ बियाणे पेरले नाही तर माणुसकी पेरली आणि त्यातून माणुसकीच उगवेल, अशी आशा आहे.
- यदु जोशी

Web Title: Talk to the farmers, then sit in a ruckus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.