घरातल्या तरुण मुला-मुलींशी तातडीने ‘एवढे’ बोलाच..

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 09:19 AM2023-06-27T09:19:54+5:302023-06-27T09:20:52+5:30

१८ ते १९ वयोगटातील महाराष्ट्रातील साधारण ४३ लाख तरुणांपैकी केवळ आठ लाखांनीच मतदार यादीत नाव नोंदवले आहे ! बाकीची ३५ लाख मुले गेली कुठे?

Talk to the young boys and girls of the house immediately. | घरातल्या तरुण मुला-मुलींशी तातडीने ‘एवढे’ बोलाच..

घरातल्या तरुण मुला-मुलींशी तातडीने ‘एवढे’ बोलाच..

googlenewsNext

- डॉ. हमीद दाभोलकर
(कार्यकर्ता, महा अंनिस)
२०२४च्या निवडणुकीच्या निमित्ताने अद्ययावत केलेल्या महाराष्ट्रातील मतदार आकडेवारीमधून लोकशाहीच्या तब्बेतीसाठी चिंताजनक वाटावी अशी एक गोष्ट समोर आली आहे. १८ ते १९ वयोगटातील महाराष्ट्रातील साधारण ४३ लाख तरुणांपैकी केवळ आठ लाख तरुणांनीच मतदार यादीत त्यांचे नाव नोंदवले आहे! टक्केवारीचा विचार करता, हे प्रमाण वीस टक्क्यांपेक्षा कमी भरते. 

लोकशाहीत नागरिक म्हणून मतदान करणे या मूलभूत कर्तव्याविषयी तरुणाई इतकी उदासीन आहे, हे अस्वस्थ करणारे वास्तव! समाजातील सर्व लोकांच्या सहभागातून निर्माण होणारी रसरशीत लोकशाही आपल्या समाजात असावी, अशी इच्छा असलेल्या प्रत्येकाने याचा गांभीर्याने विचार करायला हवा. मुळात आपल्या तरुणांमध्ये ही उदासीनता निर्माण का झाली? 

- एक महत्त्वाचे आणि सहज दिसून येणारे कारण म्हणजे राजकारणाचा अत्यंत खालावलेला स्तर. गेली काही वर्षे राजकारणाच्या माध्यमातून समाजात काही सकारात्मक घडत असल्याचा अनुभव जवळजवळ नाहीच. रोज एकमेकांवर गलिच्छ भाषेत केलेली आगपाखड, धर्म, जात आणि प्रांताच्या इतिहासावरून उकरून काढलेले अस्मितेचे झगडे हे सगळे उबग येणारे आहे. त्यामुळे  सज्जन लोक निवडणुकीत उभे राहण्यापासून दूर झाले; आता तरुण पिढीला तर मतदार होणेही नकोसे झाले आहे का, अशी शंका  निर्माण होते. गेल्या काही वर्षांत “लोकशाहीऐवजी या देशाला एखादा हुकूमशहाच पाहिजे”, अशी जी कुजबुज कॅम्पेन आपल्या समाजात केली जात आहे, त्याची पार्श्वभूमीदेखील या गोष्टीला आहे, हे विसरता येणार नाही.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पोलिस आणि न्यायव्यवस्थेकडून नैसर्गिक न्याय मिळण्याची शक्यता झपाट्याने कमी होणे. सध्याच्या  यंत्रणेमध्ये तुमच्याकडे पैसे किंवा सत्ता यापैकी काहीतरी एक असल्याशिवाय न्याय मिळणे जवळजवळ अशक्य  अथवा अत्यंत त्रासाचे असल्याची सार्वत्रिक भावना आहे. अशा वातावरणात कशाला नोंदवायचे मतदार यादीत नाव ? मत देऊन तरी काय फरक पडणार आहे? - अशा मानसिकतेमधूनदेखील वरील परिस्थिती उद्भवलेली असू शकते.

खरे तर ज्या गोष्टींना वयाची मर्यादा घातलेली आहे, अशा गोष्टी कधी एकदा करतो, अशी तरुण मुलांची मानसिकता असते. उदाहरणार्थ, गाडी चालवण्याचे वय, मद्य पिण्यासाठीचे वय, लैंगिक संबंध प्रस्थापित करण्यासाठीचे / लग्नाचे वय.. पण मतदार होणे आणि नागरिक म्हणून आपली जबाबदारी पार पडायला लागणे ह्या बाबतीत मात्र एकदम उलटी परिस्थिती दिसून येते.

जयप्रकाश नारायण एकदा म्हणाले होते, ‘स्वातंत्र्याची सगळ्यात मोठी किंमत म्हणजे सतत बाळगावी लागणारी सजगता होय!’’. नागरिक म्हणून आपण सजग राहिलो नाही, तर आपले स्वातंत्र्य आपण कोणातरी दुसऱ्याच्या दावणीला बांधत असतो, हे आपण समजून घ्यायला हवे.
अठराव्या वर्षी अचानक या सर्व गोष्टींचा साक्षात्कार आपल्या मुलांना होईल, अशी अपेक्षा ठेवणे योग्य नाही. त्यासाठी नागरिकशास्त्राच्या अभ्यासात बदल करणे, भाषा - गणित -विज्ञान अशा विषयांइतकेच महत्त्व नागरिकशास्त्राला देणे आवश्यक आहे. या विषयाचा आपल्या जीवनाशी काय संबंध आहे, हे  मुलांना समजून सांगणेही आवश्यक आहे. 

महा अंनिसमार्फत चालवल्या जाणाऱ्या विवेकवाहिनीचे ब्रीदवाक्य आहे : ‘आपला विकास आपल्या हाती, हक्क हवेतच, पण कर्तव्य आधी’. आपण केवळ हक्कांविषयी बोलत राहिलो आणि नागरिक म्हणून आपले मूलभूत कर्तव्य बजावायचे विसरलो, तर लोकशाहीचा गाडा  पुढे जाऊ शकत नाही, ही साधी गोष्ट समाज म्हणून आपण विसरता कामा नये. निवडणूक आयोगासारख्या सरकारी यंत्रणांना नागरिकांनीही बळ देणे आवश्यक आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मतदार यादीतील नाव नोंदणी प्रक्रिया अधिक सोपी करण्याचे प्रयत्नही गरजेचेच! मतदार नोंदणी ही जबाबदार नागरिक होण्याच्या प्रक्रियेमधील पहिली पायरी आहे. अधिकाधिक लोकांचा सहभाग असणारी लोकशाही आपल्याला हवी असेल तर, त्याची सुरुवात मतदार नोंदणीपासून होते. या विषयी समोर आलेले वास्तव स्वीकारून ते चित्र बदलावे म्हणून कृतिशील होणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. 
- मी माझ्या आजूबाजूच्या तरुण मुलांशी याविषयी बोलायचे ठरवले आहे; तुम्हीपण हा प्रयत्न कराल ?
(hamid.dabholkar@gmail.com)

Web Title: Talk to the young boys and girls of the house immediately.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.