तामिळी तमाशा

By admin | Published: February 20, 2017 12:22 AM2017-02-20T00:22:10+5:302017-02-20T01:30:15+5:30

सुरक्षा रक्षकांनी सभागृहातून उचलून नेताना द्रमुकचे नेते एम. के. स्टालिन हे डोक्यावर हात मारून घेतानाची व घसा खरवडून ओरडत

Tamil Tamasha | तामिळी तमाशा

तामिळी तमाशा

Next

सुरक्षा रक्षकांनी सभागृहातून उचलून नेताना द्रमुकचे नेते एम. के. स्टालिन हे डोक्यावर हात मारून घेतानाची व घसा खरवडून ओरडत असल्याची दृश्ये चित्रवाणीच्या पडद्यावर बघणाऱ्या भारतीयांना कपाळावर हात मारून घेण्याचीच पाळी आली असणार. गेले काही आठवडे तामिळनाडूत जो राजकीय तमाशा चालू होता, त्यातील शेवटचा वग राज्याच्या विधानसभेत होणाऱ्या विश्वासदर्शक ठरावाच्या निमित्ताने शुक्रवारी बघायला मिळणार होता. त्यावेळी जो गोंधळ घातला गेला, त्यामुळे पैसा व मनगटशक्ती यांच्या आधारे सत्ता मिळवायची आणि बिनदिक्कतपणे ती उपभोगायची, याचे भारतीय लोकशाही हे आता निव्वळ साधन बनले आहे, हे विदारक वास्तव पुन्हा एकदा ठळकपणे अधोरेखित झाले आहे. या आधी २८ वर्षांपूर्वी जेव्हा जयललिता यांनी विश्वासदर्शक ठराव संमत करून घेतला होता, तेव्हाही असाच तमाशा झाला होता आणि मुख्यमंत्री बनलेल्या जयललिता यांच्या अंगावर हात टाकण्यापर्यंत मजल गाठली गेली होती. त्यात पुढाकार होता शुक्रवारी ज्यांनी गोंधळ घातला त्या स्टालिन यांचे वडील एम. करुणानिधी यांचा. जयललिता यांच्या निधनानंतर अण्णा द्रमुक पक्षाचे लचके तोडण्याचे प्रयत्न द्रमुक, कॉँग्रेस व भाजपा करणार, हे अपेक्षितच होते. त्यामुळे तामिळी चित्रपट जेवढे भडक व बटबटीत असतात, त्याच धर्तीचे राजकारण तामिळनाडूत रंगणार, याची चिन्हे दिसतच होती. त्याची प्रचिती शुक्रवारी आली. जयललिता आजारी असताना ओ. पनीरसेल्वम यांना तात्पुरते मुख्यमंत्री बनविण्यात आले होते. जयललिता यांचे निधन झाले तेव्हा तेच मुख्यमंत्री होते. पण पक्षाचे नियंत्रण जयललिता यांची मैत्रीण शशिकला नटराजन यांच्याकडेच होते. इस्पितळात जयललिता यांना कोणाला भेटू द्यायचे की नाही, हेही शशिकला याच ठरवत होत्या. जयललिता यांच्या बरोबरीने त्यांच्यावरही भ्रष्टाचाराचा खटला चालवला गेला होता आणि जयललिता यांच्या बरोबरीने त्यांनीही काही महिने कर्नाटकातील तुरुंगात काढले होते. पुढे उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आरोप फेटाळून लावल्यावर सुटका झालेल्या जयललिता परत मुख्यमंत्री बनल्या आणि नंतर झालेल्या निवडणुकीत भरघोस मतांनी निवडूनही आल्या. पण उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधातील अपील सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित होते. याच कालावधीत जयललिता आजारी पडल्या व त्यातच त्यांचे निधन झाले. साहजिकच पक्षाचे नियंत्रण जयललिता यांची साथ देणाऱ्या शशिकला यांच्याकडे आले. पनीरसेल्वम फक्त नामधारी मुख्यमंत्री होते. पण मुख्यमंत्रिपदावर नामधारी व्यक्ती बसवणेही शशिकला यांना धोक्याचे वाटत होते. म्हणूनच त्यांनी स्वत:ला प्रथम पक्षाच्या सरचिटणीसपदी निवडून घेतले आणि नंतर अण्णाद्रमुक विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदीही त्या जाऊन बसल्या. आता फक्त मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणेच बाकी होते. अशावेळीच सर्वोच्च न्यायालयातील खटल्याचा निकाल येण्याची चर्चा सुरू झाली आणि तामिळनाडूतील राजकीय तमाशाला रंग भरत गेला. विधिमंडळ पक्ष जयललिता यांच्या पूर्ण ताब्यात होता. तसाच तो शशिकला यांच्याही ताब्यात आहे; मात्र मूळ पक्षातील अनेक नेते व कार्यकर्ते यांना ‘अम्मा’ जयललिता यांच्या जागी ‘चिन्नम्मा’ शशिकला जाऊन बसणे मान्य नव्हते. मूळ पक्षातील या असंतोषाचा फायदा उठवण्याचा प्रयत्न पनीरसेल्वम यांनी केला आणि मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दबावाखाली दिला होता, असा पवित्रा घेऊन शशिकला यांच्या विरोधात ते उभे ठाकले. पण अण्णाद्रमुकच्या एकूण १३३ आमदारांपैकी फक्त आठ-दहांच्या पलीकडे त्यांना आपल्या पाठीशी उभे करता आले नाही. हा तमाशा रंगात आला असतानाच सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आणि शशिकला यांना दोषी ठरवून चार वर्षांची शिक्षा ठोठावली. जयललिता हयात नसल्याने त्या फक्त दोषी ठरवल्या गेल्या. त्यामुळे पनीरसेल्वम यांनी पुन्हा एकदा उचल खाल्ली. आता सारा विधिमंडळ पक्ष त्यांच्यामागे जाणार, असे सांगितले जात होते. पण पैशाचे बळ किती मोठे असते, ते शशिकला यांनी दाखवून दिले आणि तुरुंगात जात असतानाच एडाप्पडी पळणीस्वामी यांच्या हाती पक्षाची सूत्रे दिली. विधिमंडळ पक्षाने त्यांची एकमताने निवड केली. राज्यपालांनी पळणीस्वामी यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली आणि विश्वासदर्शक ठराव संमत करवून घेण्यास सांगितले. तोच शुक्रवारी विधानसभेत मांडण्यात आला. त्यावर गुप्त मतदान घ्यावे, असा द्रमुक, काँग्रेस व इंडियन युनियन मुस्लीम लीग या पक्षांचा आग्रह होता. अशा गुप्त मतदानाच्या प्रक्रियेत अण्णाद्रमुकचे अनेक आमदार पक्षादेश झुगारून मतदान करतील, हा उद्देश या मागणीमागे होता. तसे झाले असते, तर अण्णाद्रमुकमध्ये फूट पडून द्रमुकच्या हाती सत्ता येण्याची शक्यता निर्माण झाली असती. विधानसभा अध्यक्ष ही मागणी मान्य करणे अशक्यच होते. त्यामुळे द्रमुकने गोंधळ घातला. पळणीस्वामी यांना ११ वगळता पक्षाच्या १२२ आमदारांनी पाठिंबा दिला; मात्र पळणीस्वामी विश्वासदर्शक ठराव जिंकले असले, तरी तामिळनाडूत आता राजकीय अस्थिरतेचे पर्व सुरू झाले आहे, हे निश्चित. या तामिळी तमाशाचा नवीन वग आता कधी व कसा होतो आणि देशातील लोकशाहीची लक्तरे कशी व किती काळ चव्हाट्यावर टांगली जातात, हे बघत राहण्यापलीकडे भारतीयांच्या हाती काही उरलेले नाही.

Web Title: Tamil Tamasha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.