ताराबाई, तुम्ही आम्हाला समृद्ध केले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2024 07:49 AM2024-10-08T07:49:14+5:302024-10-08T07:50:16+5:30
दिल्ली येथे होणाऱ्या ९८व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांची निवड झाली, त्यानिमित्ताने...
सदानंद कदम, इतिहासाचे अभ्यासक सांगली
ताराबाई म्हणजे इथल्या लोकपरंपरांचा, इथल्या मातीतल्या संस्कृतीचा डोळस अभ्यास असणाऱ्या जिज्ञासू अभ्यासक. अशा अभ्यासानंतर प्रकट होताना ‘गहिवर संप्रदाया’ला दूर सारत वैज्ञानिकतेची कास धरणाऱ्याही त्या एकमेव. त्यांना ऐकताना शुचिर्भूत झाल्याची अनुभूती. ती आम्ही सातत्यानं घेत असतोच.
आता तर त्यांच्या साऱ्या वैचारिक प्रवासाचा आस्वाद ‘मायवाटेचा मागोवा’ या मालिकेमधून.. सह्याद्री वाहिनीवरून अवघा महाराष्ट्रच नव्हे तर अवघं मराठी विश्व घेत आहे.
ऐंशी पार केलेल्या ताराबाई अजूनही तितक्याच उत्साहात लोकपरंपरांचं विश्लेषण करताना ऐकून धन्यतेची अनुभूती घेत आहे. हे देणं जसं ताराबाईंचं तसंच दूरदर्शनच्या उमाताईंचं. आम्हालाही या सगळ्याचा एक भाग होता आलं याचा आनंद अपार. असा ब्रह्मानंद तर बाईंनी दिलाच, शिवाय इथल्या लोकपरंपरांकडं बघण्याची विज्ञानाधिष्ठित दृष्टीही दिली. परंपरेतून नवता शोधण्याचा ध्यास दिला. परंपरांकडे बघण्याची चिकित्सक नजर दिली. बोट धरून त्या वाटेवरून फिरवून आणतानाच त्या वाटेचा मागोवा घेण्याची वृत्ती निर्माण केली. त्यांच्या सहवासात झालेला आमच्यातला हा बदल समृद्ध करणारा. ती अनुभूतीच शब्दांत न मावणारी. त्यांचं प्रेम आणि मायेची ऊब ही तर या जन्मीची अक्षय्य शिदोरीच.
सीता.. भारतीय जनमनात रुजलेलं व्यक्तिमत्त्व. प्रात:काली स्मरावयाच्या पंचकन्यांपैकी एक. रामायणाला व्यापून राहिलेली. लोकमानसात स्थिरावलेली जानकी. ती आयाबायांच्या ओव्यातून डोकावत असते. लोककथांतून भेटत असते. किती काळ लोटला. पण ती आहेच. असेलच. काळाच्या प्रवाहात तिच्यावर मिथकांची पुटं चढली. दंतकथा आणि लोकनाट्यातूनही ती अमर झाली. याच लोकपरंपरेतील सीतेचा शोध घेण्याचा प्रयत्न आजवर अनेकांनी केला. त्यातलं ठळक नाव डॉ. तारा भवाळकर. लोकपरंपरेच्या जाणत्या अभ्यासक. परंपरेत नवता शोधणाऱ्या विवेकवादी चिकित्सक. त्यांनी या सीतेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यांचं ‘सीतायन’ त्यांच्याच मुखातून ऐकायचं. ते ध्वनिमुद्रित करायचं भाग्य आम्हाला मिळालं. आम्ही बाईंच्या तोंडून हे ‘सीतायन’ ऐकत गेलो. समृद्ध झालो. नवी दृष्टी लाभली.
संपूर्ण भारतभरातील सर्व भाषांमधील ओव्या, लोकगीतं, कथा-दंतकथा, लोकनाट्य आणि लोकपरंपरा यातल्या सीतेचा शोध ताराबाई घेत होत्या १९७५ पासूनच. हा शोध जसा लोकसाहित्यामधून त्यांनी घेतला तसाच तो अंकुशपुराण, चंद्रावती रामायण, दशरथ जातक, आदिवासींचं सीतायन आणि चित्रपट रामायणामधूनही. या साऱ्यांमधून सीतेच्या व्यक्तिमत्त्वाचा मागोवा घेत असताना त्यांच्या ध्यानी आलं की ‘रामायण’ हे खरं तर ‘सीतायन’च आहे. त्यांना गवसलेलं ते ‘सीतायन’ आता त्यांनी मराठी वाचकांसाठी उलगडून सांगितलंय. सीतेच्या वेदना-विद्रोहाचा त्यांनी घेतलेला धांडोळा म्हणजे हे ‘सीतायन’. लोकसाहित्यापासून नाट्यशास्त्रापर्यंतचा संशोधक संदर्भकोश, मार्क्सवाद ते गांधीवाद यांच्या सूक्ष्म अभ्यासक, भारतीय संस्कृतीपासून आधुनिक स्त्रीवादी चळवळीच्या साक्षेपी समीक्षक, साहित्यापासून सामाजिक चळवळीच्या नामवंत अभ्यासक असा त्यांचा लौकिक.
ताराबाईंनी नाटक, एकांकिका, नाट्यसमीक्षा, लोकसाहित्य, अनुवाद, काव्य, काव्यसमीक्षा, वैचारिक लेखन केलंय. पंचेचाळीस पुस्तकं त्यांच्या नावावर आहेत. कोशनिर्मितीतही त्यांनी योगदान दिलंय. लाेककथांना नवं वळण देत त्यांनी जुन्या कथा पुन्हा नव्यानं सांगितल्या आहेत. ओवीमागच्या कथाही ऐकविल्या आहेत. स्वत:चा गट तयार न करणाऱ्या आणि इतरांच्या गटात सहभागी न होणाऱ्या बाईंचा हात या वयातही लिहिता आहे.
तीन वर्षांपूर्वी ‘सह्याद्री’ वाहिनीसाठी ‘बुरुंगवाडी’त त्यांच्या ‘मायवाटेचा मागोवा’ या मालिकेचे अठरा भाग चित्रीत केले. ‘सह्याद्री’च्या उमाताई दीक्षित आणि त्यांचे सहकारी सांगलीत आलेले. दोन दिवसांत सोळा भागांचं ध्वनिचित्रमुद्रण. सकाळी आठ ते रात्री सात. बाई या वयातही सलग बोलत राहिल्या. हातात कागदाचा कपटाही न घेता ऋग्वेदापासूनचे संदर्भ देत राहिल्या. दूरदर्शनची मंडळी आ वासून बघत होती. त्यात ‘मारुतराव’ नावाचे एक दाक्षिणात्य गृहस्थ होते. त्यांच्या हाती कॅमेरा होता. पहिल्या दिवशी सकाळी चेहऱ्यावर नाराजीच्या छटा असणारे हे गृहस्थ दुसऱ्या दिवशी दिलखुलास बोलते झाले. काम संपताच त्यांनी बाईंना दंडवत घातला. म्हणाले, ‘आजपर्यंत मी अनेक दिग्गजांचं चित्रीकरण केलं. पण हातात कागद न घेता दीड दोन हजार वर्षांतले संदर्भ सांगत, सलग सोळा भागांसाठी बोलणाऱ्या आणि त्यात एकदाही रीटेक करावा न लागलेल्या या पहिल्याच.’ अल्प मराठी जाणणाऱ्या एका दाक्षिणात्य माणसाची ती दाद होती बाईंच्या अभ्यासाला आणि विद्वत्तेला...