तासगाव कारखाना दिनकरआबांच्या स्वप्नाची परवड! रविवार --- जागर
By वसंत भोसले | Published: November 18, 2018 12:26 AM2018-11-18T00:26:48+5:302018-11-18T00:31:28+5:30
दिनकरआबांचा राजकीय बळी एका साखर कारखान्याच्या स्वप्नासाठी गेला. ज्या दिनकरआबांच्या नेतृत्वामुळे राजकारणात चिंचणीचे पाटील घराणे दबदबा निर्माण करू शकले त्यांच्या वारसांनी तरी त्यांनी दिलेल्या योगदानासाठी हा कारखाना सहकारी तत्त्वावर चालवून त्यांची स्मृती जपायला हवी होती
दिनकरआबांचा राजकीय बळी एका साखर कारखान्याच्या स्वप्नासाठी गेला. ज्या दिनकरआबांच्या नेतृत्वामुळे राजकारणात चिंचणीचे पाटील घराणे दबदबा निर्माण करू शकले त्यांच्या वारसांनी तरी त्यांनी दिलेल्या योगदानासाठी हा कारखाना सहकारी तत्त्वावर चालवून त्यांची स्मृती जपायला हवी होती. तो कारखाना आता राहणार नाही, ही दिनकरआबांच्या स्वप्नाची त्यांच्या पश्चातही दुर्दैवी परवड आहे, हेच खरे!
सांगली जिल्ह्यातील तासगावला एक ऐतिहासिक महत्त्व आहे. पटवर्धनांचे स्वतंत्र राजघराणे होते. गणपती मंदिर आणि गणेशोत्सवातील अडीचशे वर्षांपूर्वीपासूनची रथोत्सवाची परंपरा महत्त्वाची आहे. राजकीयदृष्ट्या जागृत आहे. स्वातंत्र्य आंदोलनात १९४२चा तासगाव मोर्चा गाजला होता. सांगली जिल्ह्याचा मध्यवर्ती तालुका म्हणूनही तासगावला महत्त्व आहे. प्रतिसरकारची राजधानी मानलेल्या कुंडलचा परिसरही तासगाव तालुक्याचा भाग होता. पुढे ही भूमी द्राक्षासाठी देशभर प्रसिद्ध पावली. आज बेदाण्याची राष्ट्रीय पातळीवर नोंद घ्यावी, अशी बाजारपेठ तासगावनेच निर्माण केली. कारण चाळीस वर्षांपूर्वी या तालुक्याने एक नवे वळण घेतले. द्राक्षशेतीचा प्रयोग यशस्वी करून दाखविला. ‘तासगाव चमन’ म्हणून या द्राक्ष शेतीचा लौकिक युरोपच्या बाजारपेठेपर्यंत पोहोचला आहे. पूर्वी तमाशा आणि सर्कस या करमणूकप्रधान कलेचाही वारसा तासगाव तालुक्याकडेच जातो. अलीकडच्या दोन- अडीच दशकांत आर. आर.(आबा) पाटील यांनी राज्याचे नेतृत्व करण्याच्या महत्त्वाकांक्षेने राजकारणात दमदार ओळख निर्माण केल्याने तासगावचे नाव पुन्हा एकदा आघाडीवर राहिले.
असा हा तासगाव तालुका कॉँग्रेस पक्ष, वसंतदादा पाटील यांचे नेतृत्व आणि डाव्या विचारांने प्रभावित होता. आताचा पलूस तालुका (कृष्णाकाठचा भाग) तासगाव तालुक्यातच होता. तासगावचा पूर्व भाग कोरडवाहू शेतीचा किंवा विहीर बागायतीवर गुजराण करीत होता. सांगलीच्या वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे मोठे कार्यक्षेत्र याच तालुक्यात होते. जवळपास चौदा हजार शेतकरी या साखर कारखान्याचे सभासद आहेत. परिणामी पाच-सहाच संचालक नेहमीच कारखान्यावर प्रतिनिधित्व करीत होते. तासगावचे आमदार होण्यापूर्वी तासगाव तालुका सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक दिनकरआबा पाटील हे वसंतदादा साखर कारखान्याचे पाच वर्षे अध्यक्ष होते. वसंतदादांचे वैशिष्ट्य होते की, ते कधीच स्वत: साखर कारखान्याचे अध्यक्ष नव्हते.
सुरुवातीस प्रमोटर म्हणून नेतृत्व केल्यानंतर अंकलखोपचे दिनकर बापू पाटील, चिंचणीचे दिनकरआबा पाटील असे अनेक वसंतदादांचे कार्यकर्ते नेतृत्व करीत होते. १९८० मध्ये कॉँग्रेस पक्षातर्फे स्वातंत्र्यसैनिक गणपतराव नायकू कोळी यांना कॉँग्रेसमधील दादा विरोधी गटाकडून आमदारकीसाठी उमेदवारी मिळाली. दिनकरआबांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली आणि ते दुसऱ्यांदा आमदार झाले. १९७८ मध्ये ते कॉँग्रेसचे आमदार होते. याच काळात त्यांनी तासगाव तालुक्यासाठी स्वतंत्र साखर कारखाना स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्या कारखान्याचा प्रस्तावही सादर करण्यात आला होता. त्या कारखान्याचे नाव वसंतदादा सहकारी साखर कारखाना असे होते. मात्र, वसंतदादा पाटील यांच्या मनात हा कारखाना व्हावा असे नव्हते. कारण त्याचा परिणाम सांगलीच्या शेतकरी सहकारी साखर कारखान्यावर होईल अशी भीती होती. त्या काळी साखराळेचा वाळवा तालुका सहकारी साखर कारखाना (आताचा राजारामबापू कारखाना) आणि चिखली(ता. शिराळा) चा विश्वास सहकारी साखर कारखाना असे दोनच कारखाने होते. शिवाय रेठरे बुद्रुकचा कृष्णा आणि वारणानगरचा वारणा सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र वाळवा तसेच शिराळा तालुक्यांत होते.
वारणा धरणाची उभारणी होण्याच्या पूर्वीचा हा काळ होता. वारणा काठावर उसाचे क्षेत्र कमी होते. ताकारी, म्हैसाळ, टेंभू या योजनांचाही जन्म झालेला नव्हता. परिणामी सांगली जिल्ह्यात कृष्णाकाठ वगळता विहीर बागायतीच अधिक होती. अशा परिस्थितीमुळे तासगावात स्वतंत्र कारखाना नकोच, किंबहुना वसंतदादा साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात नवा कारखाना नको अशी भूमिका वसंतदादा पाटील यांची होती. मात्र, दिनकरआबा पाटील यांचे स्वप्न होते की, तासगावला साखर कारखाना झाला पाहिजे. १९८५ मध्ये तिसºयांदा आमदार झाल्यावर दिनकरआबांनी मनावर घेतले. मात्र, वसंतदादाच मुख्यमंत्री होते. त्यांना बदलून शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होताच दिनकरआबांनी परत उचल खाल्ली. तासगावला कारखाना झालाच पाहिजे, अशी आग्रही मागणी करून त्यांनी शंकरराव चव्हाण यांना समर्थन देण्याची भूमिका घेतली.
वसंतदादा पाटील राजस्थानचे राज्यपाल होते आणि त्यांना शंकरराव चव्हाण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री नको होते. या संघर्षात आपल्याकडे आमदार वळविण्याच्या प्रयत्नात शंकरराव चव्हाण यांनी दिनकरआबांना जवळ केले. त्यांची मागणी मान्य केली आणि तासगाव तालुका सहकारी साखर कारखाना देण्याची तयारी दर्शविली.
नव्या कारखान्याला परवाना मिळण्यात अडचणी होत्या, म्हणून नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर जवळचा महाराष्ट्र शुगर या खासगी कारखान्याचा प्रस्ताव घेण्यात आला. डहाणूकरांचा हा कारखाना बंद होता. तो दहा कोटींत घेण्याचे ठरले. सांगली जिल्ह्यात वसंतदादा पाटील यांच्या विरोधात जाऊन कारखाना उभारण्याचे धाडसच होते; पण शंकरराव चव्हाण यांच्या पाठिंब्याने ते सत्यात उतरणार होते. हा व्यवहार पूर्ण होऊन कारखाना उभारणी करण्यापूर्वीच शंकरराव चव्हाण यांचे मुख्यमंत्री पद गेले आणि शरद पवार या पदावर आले. त्यांनीही दादांच्या विरोधी गटाला बळ देण्यासाठी दिनकरआबांचेच समर्थन केले.
कारखाना विकत घ्यायचा ठरला, पण तेथील कामगारांची देणी भागवायची होती. साखर कामगार संघटना उच्च न्यायालयात गेली होती. ती देणी देऊन कारखान्याचा व्यवहार करण्याची अट न्यायालयाने घातली होती. शरद पवार यांनी मार्ग काढण्यासाठी आठ दिवसांत एक कोटी रुपये जमा करण्यास सांगितले. त्यासाठी राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष जयंत पाटील यांना मदत करण्यास सांगितले. या सर्व दादा विरोधकांनी पैसा उभारला. जयंत पाटील यांनी एका दिवसात राजाराम बापू बॅँकेतून चाळीस लाखांचे कर्ज उपलब्ध करून दिले. कारण वसंतदादांच्या इच्छेविरुद्ध होणाºया कारखान्यास कोणीच जिल्ह्यातून मदत करण्यास तयार नव्हते.
दिनकरआबांनी आपली राजकीय प्रतिष्ठा आणि पद पणाला लावून कारखाना उभारणीसाठी संघर्ष केला. तासगाव तालुक्यातील दादा गट विरोधात गेला. त्यावेळचे जिल्हा परिषद सदस्य आर. आर. (आबा) पाटील यांनी या गटाचा पाठिंबा घेत राजकीय कुरघोडी केली. कारखाना झाला, पण दिनकर आबा यांची संपूर्ण राजकीय कारकीर्द अडचणीत आली. आर. आर. (आबा) यांचा उदय झाला. दादा गटाने दिनकरआबांच्या विरोधात त्यांना बळ दिले, असा हा संघर्ष आहे.
तासगावला साखर कारखाना झाला पाहिजे असे स्वप्न पाहण्याचा प्रयत्न दिनकरआबांनी केला. कारखाना झाला, पण त्यांचे राजकीय जीवनच संपुष्टात आले. वाटेल ती किंमत मोजण्याची तयारी त्यांनी केली होती. ती त्यांनी तासगाव कारखान्यासाठी मोजली; पण आर. आर. पाटील, पतंगराव कदम, विष्णूआण्णा पाटील, प्रकाशबापू पाटील या नेतृत्वाच्या फळीने त्यांना राजकीय स्वास्थ्य दिलेच नाही. त्याचप्रमाणे कारखानाही व्यवस्थित चालणार नाही, अशी वारंवार खबरदारी घेतली. राजकीय संघर्षात हा कारखाना नेहमीच अडचणीतून वाटचाल करू शकला नाही.
वसंतदादा पाटील, दिनकरआबा पाटील, पतंगराव कदम, आर. आर.(आबा) पाटील, विष्णूआण्णा पाटील, प्रकाशबापू पाटील, आदी नेते काळाच्या पडद्याआड गेले. मात्र, राजकीय साठमारीत हा कारखाना गेली दहा वर्षे बंद पडला आहे. राज्य सहकारी बॅँकेचे कर्ज कारखान्यावर आहे. आघाडी सरकारच्या काळात कारखाने विकण्याचा सपाटा लावला होता. तसा आतादेखील विद्यमान खासदार संजयकाका पाटील (दिनकरआबांचे पुतणे) यांना देण्याचा घाट घातला . आर. आर.(आबा) पाटील यांना ही राजकीय तडजोड हवी होती. संजयकाका पाटील हे त्यांचे स्पर्धक होते. त्यांना कारखाना देऊन गप्प बसवायचे हा उद्योग होता. या राजकारणात व्यवहारही पूर्ण झाला नाही. कारखानाही सुरू झाला नाही. दरम्यान, शेतकरी सभासदांनी खासगीकरणास विरोध केला.
वास्तविक, आजच्या घडीला दिनकरआबांचा त्याग लक्षात घेऊन खासदार संजयकाका पाटील यांनी सहकारी तत्त्वावरील हा कारखाना चालविण्यासाठी कंबर कसायला हवी होती.
पतंगराव कदम आणि आर. आर.(आबा) हे विरोधकही आता नाहीत. तसा हा कारखाना चालविण्यास कोणाचा थेट विरोध असण्याचे कारण नाही; पण त्यांनी हा कारखाना खासगी करून स्वत:कडे घेण्याचाच डाव खेळला. दिनकरआबा यांच्यासारख्या करारी नेत्याने आपली संपूर्ण राजकीय प्रतिष्ठा पणाला लावून जी किंमत मोजली त्याची जराही चाड कोणाला नाही. आर. आर. आबांनी स्वत:चे राजकीय हित पाहिले. पतंगराव कदम यांनी स्वत:च्या सोनहिरा कारखान्याला ऊस मिळावा म्हणून राजकीय खेळी करण्यात धन्यता मानली. या सर्वांचे राजकारण झाले; मात्र त्यात दिनकरआबांचा राजकीय बळी एका साखर कारखान्याच्या स्वप्नासाठी गेला, त्याची सर्वांनाच विस्मृती झाली आहे. ही व्यथा ते अनेकवेळा डोळ्यांत अश्रू आणून बोलून दाखवीत असत याची विरोधकांना खंत वाटण्याचे कारण नाही. पण, ज्या दिनकरआबांच्या नेतृत्वामुळे चिंचणीचे पाटील घराणे राजकारणात दबदबा निर्माण करू शकले त्यांनी तरी आता त्यांनी दिलेल्या योगदानासाठी हा कारखाना सहकारी तत्त्वावर चालवून त्यांची स्मृती जपायला हवी होती. तो कारखाना आता राहणार नाही, ही दिनकरआबांच्या स्वप्नाची त्यांच्या पश्चातही दुर्दैवी परवड आहे, हेच खरे!