तात्याराव लहाने हाजीर हो...
By राजा माने | Published: May 14, 2018 02:46 AM2018-05-14T02:46:14+5:302018-05-14T02:49:01+5:30
इंद्रलोकांचा स्टार रिपोर्टर यमकेची आज घाबरगुंडी उडाली होती. महागुरू नारदांच्या पाठीमागे लपत तो इंद्रदरबारी हजर व्हायला निघाला होता
इंद्रलोकांचा स्टार रिपोर्टर यमकेची आज घाबरगुंडी उडाली होती. महागुरू नारदांच्या पाठीमागे लपत तो इंद्रदरबारी हजर व्हायला निघाला होता. दरबाराच्या बाहेरच यमराजांचा रेडा ‘पार्क’ केल्याचे त्याला दिसले. न राहून त्याने महागुरूंना प्रश्न विचारला. ‘आज यमराजांचे वाहन इकडे कसे?’ त्यावर नारद उत्तरले, ‘इंद्रदेवांचे फर्मान व्हॉट्सअॅपवर तू पाहिले नाहीस का? अरे, तुला, आमचा दूत म्हणजे तुमचा ‘देवदूत’ डॉ. तात्याराव लहाने आणि यमराजांनाही आजच्या इंद्रदरबारात हजर राहण्याविषयी ते होते!’ तात्यारावांबरोबरच यमराजांचेही नाव ऐकताच यमके घामाघूम झाला. इंद्रदेवांनी आपल्यालाच यमराजांच्या हवाली केले तर कसे! या कल्पनेनेच तो गळून गेला. इंद्रदरबार सुरू झाला. तात्यारावांना नारदांनी अगोदरच दरबाराच्या दालनात पोहोच केले होते. इतक्यात पुकारा झाला. ‘तात्याराव लहाने हाजीर हो...’ पुकारा ऐकताच तात्याराव हसतमुखाने उभे राहिले. पण यमराज पुढे सरसावले आणि म्हणाले, ‘देवा, मला थोडी अर्जन्सी आहे. माझा विषय आधी संपवा.’ इंद्रदेवांनी इशाऱ्यानेच यमराजांची विनंती मान्य केली.
यमराज : भूलोकी माझा ओव्हरटाइम सुरू असताना, मला इथे का बोलावले आहे देवा!
इंद्रदेव : यमराज, तुम्हाला ‘आॅनलाईन’ कामाचा सराव झालेला दिसत नाही.
यमराज : काय चुकले माझे? मी तर सतत अपडेट असतो.
इंद्रदेव : अपडेट असता तर मग फाईलमध्ये नाव नसलेल्या हिमांशू रॉयसारख्या राष्टÑप्रेमी-मातृप्रेमी वत्साला तुम्ही ताब्यात घेतलेच नसते!
यमराज : देवा, ती माझी चूक नाही! बुद्धिदेवांनी आपल्या सिस्टमला रिफ्रेश करण्यासाठी उसंत घेतली आणि त्याच काळात हिमांशू रॉय यांच्या ‘हँग’ झालेल्या बुद्धीने गोळी झाडून घेतली. मग माझा नाईलाजच झाला.
इंद्रदेव : मी बुद्धिदेवांना बोलतो. पण तुमच्या फाईल्स करप्ट होणार नाहीत याची काळजी घ्या. बरं, तात्याराव काय चालले आहे तुमच्या राज्यात? (तात्याराव बोलायच्या आतच यमके मध्येच बोलू लागला.)
यमके : देवा, तात्याराव देवमाणूस आहे. अनेकांना दृष्टी देण्याचे कार्य त्यांनी भूतलावर केले आहे...
इंद्रदेव : ते आम्हाला ठाऊक आहे. पण मराठी भूमीतील मानव लोकांची प्रकृती ढासळत आहे. फेसबुक, टिष्ट्वटरबिटर काही पाहता की नाही... (तात्याराव बोलण्याच्या आतच यमके बोलू लागला.)
यमके : होऽहोऽऽहोऽऽऽ नेहमी माफ करणार नाही, अरे बाबांनो म्हणणाºया अजितदादांनी मराठी भूमीत दहा महिन्यात तेरा हजार बालमृत्यू झाल्याचे टिष्ट्वट केले होते.
इंद्रदेव : तेही पाहिले आम्ही. पण औरंगाबादेत एक चिमुरडी आपल्या रुग्ण पित्याच्या सलाईनची बाटली घेऊन ताटकळते काय... स्ट्रेचर ट्रॉली हातगाड्यासारखी ओढत रुग्णाचे सगेसोयरेच रुग्णाला नेतात काय...
तात्याराव (हात जोडत) : देवा, मला सगळंच माहिती आहे, म्हणून तर मी राज्याच्या दौºयावर निघालो आहे. सगळं दुरुस्त करीन.
इंद्रदेव : अरे, अनेकांना तू दृष्टी दिली. आता तुझ्याच यंत्रणेतील लोकांच्या डोळ्यात अंजन घालण्याची वेळ आली आहे. तू करतो त्यापेक्षा ही सर्जरी कठीण असते. तू दृष्टिदानात इतिहास घडविलास, आता हे आव्हान स्वीकार.
- राजा माने