तार्इंची शिकवणी

By admin | Published: May 8, 2015 11:36 PM2015-05-08T23:36:55+5:302015-05-09T05:21:45+5:30

सांगा कोण लोक चित्रपट बघतात? हात वर करा. तुम्हाला आवडलेल्या एखाद्या चित्रपटाचे नाव सांगा? त्यांनी असे म्हटले आणि साऱ्यांच्याच चेहऱ्यावरचा तणाव क्षणात सैल झाला

Taverne Tutorial | तार्इंची शिकवणी

तार्इंची शिकवणी

Next

 रघुनाथ पांडे -
सांगा कोण लोक चित्रपट बघतात? हात वर करा. तुम्हाला आवडलेल्या एखाद्या चित्रपटाचे नाव सांगा? त्यांनी असे म्हटले आणि साऱ्यांच्याच चेहऱ्यावरचा तणाव क्षणात सैल झाला. प्रसंग होता ‘तार्इंच्या वर्गातील’! आणि प्रश्न विचारला होता, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी. मग साऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांना आवडणारे चित्रपट सांगितले तर कुणी गाण्यांचे बोलही. मोठी झक्कास संध्याकाळ होती. ‘आयुष्य जगण्यासाठी आहे. ते मस्त जगा. राजकारणात राहून तुमच्यातील निरागसपणा सोडू नका’, ताई सांगत होत्या आणि नवे खासदार या शब्दातील जादू, गोडवा टिपत होते अगदी तन्मयतेने. तार्इंनी कोणता संकल्प करणार, असा प्रश्न केला. तेव्हा विचारपूर्वकच सांगावे लागेल ना, असेच भाव साऱ्यांच्याच चेहऱ्यावर होते.
कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंनी पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिले. बीडच्या खासदार प्रीतम मुंडे म्हणाल्या, शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या कशा थांबविता येतील यावर माझे लक्ष आहे. नंदुरबारच्या हीना गावित यांनी, आदिवासी पट्ट्यातील असल्याने आरोग्य व पोषणावर लक्ष केंद्रित केल्याचे सांगितले. मुंबईच्या पूनम महाजन यांनी दिवसाला एक याप्रमाणे एक वर्षांत शौचालये बांधणार, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल म्हणाल्या, कुपोषणाविरुद्ध अभियान चालवणार. रामविलास पासवान यांचे चिरंजीव चिरागनेही बिहारचा विकास हेच स्वप्न असल्याचे राजकीय उत्तर दिले. असे भन्नाट विषय आणि चौकटीबाहेरच्या कल्पना येत होत्या.
२० अकबर रोड. हा लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांचा बंगला. तिथे दोन दिवस सायंकाळी तीन तास युवा खासदारांची शिकवणी सुमित्रातार्इंनी घेतली. नंतर खास इंदुरी पद्धतीचे मालवा भोजन. महाराष्ट्रातील सहा खासदार सहभागी झाले होते. कारण अटच तशी होती. राज्यात लोकसभेचे ४८ खासदार असले तरी जे पहिल्यांदा विजयी झाले व आणि ज्यांचे वय पंचेचाळीसच्या आत आहे, अशांची ही शिकवणी होती. हा वर्ग सर्वपक्षीय होता. देशभरातील ६८ युवा खासदारांना तार्इंनी शिकविले. २५-२७ लाख जनतेचा प्रतिनिधी असलेल्या खासदारांना किती प्रश्न पडू शकतात, त्यांच्याकडील नवीन कल्पना जाणून ताई चकित झाल्या. प्रत्येक खासदाराची एक यशकथा होती. ताईंनी त्यांना त्यांचे छंद व प्राधान्यक्रम विचारले. त्यांनी एका खासदाला गंमतीने म्हटले सुद्धा, न्यूटनसारखे प्रश्न पडलेत, आणि मनमोकळ्या हसल्याही.
खरं तर, नवीन खासदारांना यापूर्वीही पक्षस्तरावर सांसदीय पद्धतीचे प्रशिक्षण दिले आहे. आजवरच्या तीन अधिवेशनातील नव्यांचा अनुभव लक्षात घेऊन लोकसभाध्यक्षांनी स्वत:हून पुढाकार घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. सुमित्राताई मतदारसंघ न बदलता इंदूरमधून सलग आठ वेळा विजयी झाल्या. यामागील रहस्य काय हा कळीचा प्रश्न अनेकांच्या मनात होता. एकाने तोही विचारलाच. ७३ वर्षींय ताई म्हणाल्या, ‘अरे बाबा, आपली गोष्ट सांगण्यापेक्षा लोकांचे अधिक ऐका !’
युवा खासदारांनी आपली योग्यता वाढविली पाहिजे, हा या शिकवणीमागील खरा उद्देश होता. ग्रंथालयाचा उपयोग तर खासदार करतातच, पण प्रश्न मांडताना त्यामागील संदर्भ ताजे ठेवा, आवडीचे विषय पक्के करा, विषयातील तज्ज्ञ व्हा हीच यामागील प्रांजळ भावना. दोन दिवसांच्या मंथनातून ‘गायडन्स फोरम’ची संकल्पना अस्तित्वात आली. विषयतज्ज्ञांची टीम लोकसभेत खासदारांच्या दिमतील असेल. सभागृहातील कामकाज अभ्यासपूर्ण व्हावे यासाठी संवाद, संपर्क व समन्वय या त्रिसूत्रीवर आता लोकसभेतील नवे खासदार आपली भूमिका वठविणार आहेत. एरवी गटागटांमध्ये वावरणारे युवा खासदार तार्इंपुढे शिस्तीत बसले होते. पार्टीपेक्षा वेगळी लाईनदोरी इथे होती. सांसदीय कामकाज त्यांनी समजून सांगितलेच, पण मनातील भयगंड दूर करण्यासाठी टिप्सही दिल्या. त्यामुळेच ‘दिल्लीत आमची काळजी घेणारं कुणी आहे’, असेच मला वाटले, ही डॉ. श्रीकांत शिंदे यांची भावना म्हणजे या शिकवणीचे फलित. खरं तर लोकसभेचे कामकाज पाहिले तर वयाची अट वगळून अनेकांना या शिकवणीची गरज आहे. सुरुवात तर झाली आहे. याचे पडसाद पावसाळी सत्रात उमटतील अशी अपेक्षा आता करू या.

Web Title: Taverne Tutorial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.