येरवडा कारागृहात बंदीजनांच्या हातची चहा-भजी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2023 12:21 PM2023-08-12T12:21:06+5:302023-08-12T12:22:50+5:30
येरवडा कारागृहाच्या आवारात प्रशासनाने नवा उपक्रम सुरू केला आहे : ‘शृंखला उपाहारगृह’! बंदीजनांच्या हाती नवी कौशल्ये देण्याची गरज का असते?
- स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग, पुणे
प्रत्येक माणसाला चूक सुधारण्याची संधी मिळाली पाहिजे. गुन्हा केला, न्यायालयाने दोषी ठरविले, शिक्षा केली. यानंतर जेव्हा कारागृहात बंदी येतात, तेव्हा त्यांच्याकडे गुन्हेगार म्हणून पाहण्याची गरज नसते. उलट गरज असते ती त्यांच्या प्रबोधनाची. आपली चूक मान्य करून, शिक्षा भोगून एक चांगला नागरिक म्हणून नव्याने आयुष्य सुरू करता येऊ शकतं, असं त्यांना वाटलं पाहिजे आणि त्यासाठी त्यांच्या हाती नवं कौशल्य दिलं पाहिजे. मला मिळालेलं कौशल्य वापरून मी चरितार्थ चालवू शकतो, माझ्या कुटुंबाला माझा अभिमान वाटू शकतो, असं जर बंदी बंधूभगिनींना वाटलं तर ते नवीन आयुष्य सुरू करतात. ही नवीन सुरुवात त्यांच्यासाठीच नाही तर त्यांच्या कुटुंबासह समाजासाठीही फार हिताची असते.
नुकतंच येरवडा कारागृहाच्या आवारात कारागृह प्रशासनाने एक हॉटेल सुरू केलं. ‘शृंखला उपाहारगृह’ हे त्याचं नाव. नव्या जगण्याची साखळी या अर्थानं एक नवी सुरुवात. येरवडा कारागृहाच्या परिसरातच रस्त्यालगत कारागृहाचीच जागा पडून होती. आसपास कॉलेजात शिकणाऱ्या तरुण-तरुणींपासून अनेक लोक त्या भागात विविध खाद्यपदार्थ खायला येतात. कारागृहाच्या जागेतच बंदीबांधवच चालवतील असं हॉटेल का सुरू करू नये, अशी कल्पना समोर आली. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या कल्पनेला पाठिंबा, शुभेच्छा दिल्या आणि खुल्या कारागृहातील कैद्यांनीच ते हॉटेल चालवायचं असं ठरलं ! सुरूही झालं.
कैद्यांना रोजगार मिळावा, हा तर त्यामागचा उद्देश आहेच. कारागृह प्रशासनालाही त्यातून महसूल मिळेल; पण उत्पन्न हाच या साऱ्यामागचा एकमेव हेतू नाही. त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे बंदीजनांच्या हाताला कौशल्य देणं. काम केल्याचं, अनुभवाचं प्रमाणपत्रही कारागृह प्रशासन देतं. एकीकडे सगळ्या देशात ‘स्किल इंडिया’ हा उपक्रम राबवला जात असताना केवळ तुरुंगात आहेत म्हणून बंदीबांधवांना कौशल्य आणि संधी नाकारण्यात येऊ नयेत. चांगले विचार, शिक्षण, कौशल्य, संधी आणि मनोरंजन यांपासून कारागृहातील बंदीही वंचित राहता कामा नयेत. बी.ए., बी.कॉम.च्या केवळ पदव्या घेऊन आता चरितार्थ चालवता येत नाही; त्यामुळे बंदीबांधवांचं शिक्षणही तेवढंच असता कामा नये. त्यांनाही रोजगाराभिमुख कौशल्यं शिकता यायला हवीत. कारागृहात असतानाच कौशल्य शिकले तर शिक्षेनंतर नवीन आयुष्य सुरू करताना त्यांना त्या कौशल्याचा आधार वाटतो. ‘भूखे पेट भजन ना होये गोपाला’ हे तर खरंच आहे. चरितार्थाचं काही साधन नसेल तर एका शिक्षेनंतर परत गुन्हेगारीकडे वळणारे, आर्थिक गुन्हे करणारेही कमी नाहीत.
त्यामुळे विविध गोष्टी शिकवताना खुल्या कारागृहातील कैद्यांसाठी अधिक काही प्रयोगशील, रोजगारक्षम गोष्टी केल्या जातात.
खुल्या कारागृहातील कैदी म्हणजे ज्यांचे वर्तन सलग चांगले आहे, जे सुधारण्याच्या मार्गावर आहेत, जे मुक्त होऊन समाजात मानाने आपलं नवीन आयुष्य सुरू करू शकतात असे कैदी. त्यांना विविध कौशल्ये शिकवतानाही हेही पाहण्याची गरज असते की, त्यांना नेमकी आवड कसली आहे? गती कशात आहे?
स्वयंपाक, टेक्सटाइल, विविध अत्याधुनिक उपकरणांची दुरुस्ती किंवा निर्मिती, शेती-लाकूडकाम हे सारं शिकवलं जातंच. त्या त्या क्षेत्रातील अत्याधुनिक ज्ञान आणि कौशल्यही त्यांच्यापर्यंत पोहोचवलं जातं. आज कारागृहात ‘महिंद्रा’च्या बोलेरो गाडीचे काही सुटे भाग तयार केले जातात. बंदी भगिनी दुचाकी वाहनांचे सुटे भाग बनवतात.
कारावासातील बंदीजनांना याची जाणीव होणं महत्त्वाचं असतं की, आपणही महत्त्वाचे आहोत! आपण शिकू शकतो, अजूनही हवेसे असू शकतो! - केल्या गुन्ह्याची शिक्षा झाली तरी प्रत्येकाला सुधारण्याची दुसरी संधी मिळाली पाहिजे. कारागृहातून बाहेर पडताना चांगला नागरिक, चांगला माणूस, शिक्षित-कौशल्य कमावलेली व्यक्ती म्हणून बाहेर पडता येऊ शकेल, अशा व्यवस्था उभारल्या पाहिजेत.
- अशी चर्चा सुरू झाली, की अनेकजण विचारतात, कशाला एवढे लाड करायचे कैद्यांचे? काय गरज आहे गुन्हेगारांना शिक्षण देण्याची?
त्याचं उत्तर हेच की, सुधारण्याची संधी मिळणं त्या व्यक्तीसाठीच नाही तर समाजासाठीही अतिशय गरजेचं असतं. छोटा चोर जर कायम वाईट संगतीत राहिला तर मोठा चोर होतो आणि आता आपण मोठे गुन्हे करतो याचा त्याला अभिमानही वाटू लागतो. याउलट शिक्षा भोगून चांगला नागरिक जर समाजात परत गेला तर समाजाचाही लाभ होतो आणि गुन्हेगारी चक्रात जाण्यापासून एकजण वाचतो.
कारागृहातून बाहेर पडणाऱ्या व्यक्तीलाही वाटलं पाहिजे की, मी हवासा आहे. मी महत्त्वाचा आहे, कुटुंबाचं भरणपोषण करू शकतो. समाजात सुखानं जगू शकतो. त्याला तसं वाटणं महत्त्वाचं, चरितार्थासाठी कौशल्य असणंही तेवढंच महत्त्वाचं! केलेल्या चुकीची न्यायालयानं दिलेली शिक्षा भोगल्यावर नव्यानं चांगला नागरिक म्हणून जगण्याची संधीही समाजानं दिली पाहिजे.
शिक्षण-कौशल्य-रोजगार आणि प्रबोधन ही ‘शृंखला’ बंदीबांधवांनाही इतर नागरिकांप्रमाणे सन्मानानं जगण्याची संधी देते. तशी संधी मिळावी म्हणून विविध प्रयत्न केले जातात. नुकतेच सुरू झालेले ‘शृंखला उपाहार गृह’ हा त्याच प्रयत्नांचा एक भाग आहे! नव्यानं जगणं सुरू करण्याची संधी माणसांना कधीही नाकारता कामा नये!