चहाच्या कपातील विष!
By Admin | Published: September 10, 2014 08:44 AM2014-09-10T08:44:55+5:302014-09-10T08:44:55+5:30
विविध गुणधर्मांनी समृद्ध संपन्न असलेला चहा विषारी आहे, असे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘ग्रीनपीस’च्या अहवालामध्ये म्हटले आहे.
लक्ष्मण वाघ, सामाजिक विषयाचे अभ्यासक
चहा हे भारतीयांचे राष्ट्रीय पेय आहे. चहाशिवाय भारतीयांच्या दिवसाला प्रारंभ होत नाही. अनेक भारतीयांच्या घरात सकाळी गरम आणि वाफाळलेल्या चहाचे घुटके घेत वर्तमानपत्र वाचले जाते. गरिबापासून श्रीमंतांपर्यंत सकाळी आणि संध्याकाळी चहाचा आस्वाद आवडीने घेतला जातो. चहाप्राशनामुळे मनाला एक प्रकारची तृप्ती मिळते. आळस घालविण्यासाठी चहा हा उत्तम उपाय आहे. थंडीमध्ये आणि पावसाळ्यात शरीरामध्ये उष्णता निर्माण होण्यासाठी चहा प्राशन करावा लागतोच. चहामध्ये क जीवनसत्त्व अंतर्भूत असल्याने शरीरामध्ये ऊ र्जा निर्माण होते. घरी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी चहा पाहिजेच. ताण-तणाव, आनंद-हुशारी, तरतरी-उत्साह अशा सर्व क्षणांसाठी कपभर चहाची सोबत अनिवार्य असतेच. अशा प्रकारे विविध गुणधर्मांनी समृद्ध संपन्न असलेला चहा विषारी आहे, असे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘ग्रीनपीस’च्या अहवालामध्ये म्हटले आहे.
‘ग्रीनपीस’ या पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थेने भारतीय बाजारपेठेमध्ये विकल्या जाणाऱ्या चहापावडरच्या नमुन्यांची नुकतीच तपासणी केली. कोलकाता, बेंगळुरु, दिल्ली, मुंबई आणि इतर काही शहरांमध्ये जून २०१३ ते मे २०१४ या कालावधीत अनेक ब्रँडच्या चहा पावडरचे नमुने संकलित करण्यात आले. यातल्या ९४ टक्के उत्पादनांमध्ये मानवी शरीराला अपायकारक आणि धोकादायक कीटकनाशकांचे अंश सापडले. कीटकनाशक म्हणून वापरला जाणारा डीडीटी हा विषारी रासायनिक घटक चहाच्या ६७ टक्के नमुन्यात दिसला आहे. भारतात १९८९ सालापासून डीडीटीच्या वापरावर बंदी आहे. तथापि चहा उत्पादक कंपन्या डीडीटीचा वापर मनसोक्तपणे करतात, असे दिसून आले.
जागतिक आरोग्य संघटनेने अतिधोकादायकच्या यादीमध्ये समाविष्ट केलेले आणि मेंदूवर विपरीत परिणाम करणारे मोनोफ्रोटाफॉस २७ नमुन्यांमध्ये आढळले. टेब्युफेन पायरॅड नावाच्या कीटकनाशकाची भारतामध्ये नोंदणी नाही तरीही ते एका नमुन्यामध्ये सापडले आहे. हा घटक लिव्हरसाठी खूपच घातक आहे. श्वसन यंत्रणेवर गंभीर परिणाम करणारे सायपरमेअीन काही नमुन्यामध्ये दृश्यमान झाले आहे.
सर्वांत आश्चर्य म्हणजे तपासणीत आढळलेली ६८ टक्के कीटकनाशके चहाच्या पिकासाठी नोंदविण्यात आलेली नव्हती. तरी चहा उत्पादक कंपन्याकडून ती चहाच्या पिकावर सर्रास वापरण्यात आली, असे ग्रीनपीसच्या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे.
ग्रीनपीसच्या अहवालामध्ये ज्यांचा नामनिर्देश केला आहे, ते सगळे ब्रँड भारतामध्ये प्रसिद्ध असलेले आहेत. या कंपन्यांच्या चहाचा वापर भारतीय अनेक दशकांपासून विश्वासाने करीत आहोत. चहाच्या कपातील विष दृश्यमान करणारी ग्रीनपीस ही संस्था सुमारे ४० देशांमध्ये कार्यरत आहे. अनेक देशांमधल्या सरकारांना, कॉर्पोरेट कंपन्यांना पर्यावरणविषयक धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी ती साहाय्य करते. ग्रीनपीसच्या या अहवालामुळे टी बोर्ड आॅफि इंडिया या भारतीय चहा उत्पादकांच्या प्रमुख कंपन्यांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.
सर्वच मोठ्या चहा उत्पादक कंपन्यांनी प्रस्तुत अहवालाला सकारात्मक प्रतिसाद देऊन याबद्दल आवश्यक संशोधनाची तयारी दर्शविली आहे. कीटकनाशकांचा वापर न करता आॅरगॅनिक पद्धतीने उत्तम प्रतीचा चहा उत्पादित करणे. मातीच्या बिघडलेल्या आरोग्यामध्ये सुधारणा करणे. चहाच्या पिकांचे कीटकनाशकापासून संवर्धन संरक्षण करणे त्यावरील कीडीचा अभ्यास करणे, प्रतिकारशक्ती वृद्धिंगत करणे. बदलत्या हवामानाचा अभ्यास करून चहा लागवडीत आवश्यक परिवर्तन करणे असे अनेक पर्याय ग्रीनपीस संस्थेने चहा उत्पादक कंपन्यांना सुचवले आहेत.
कीटकनाशकमुक्त चविष्ट स्वरूपाच्या चहापावडर उत्पादनाचा आराखडा तयार करण्यासाठी ग्रीनपीस संस्थेस सहभागी करून घेण्यास तयार असल्याचे टी बोर्ड आॅफ इंडिया संस्थेने जाहीर केले आहे.
आपल्या देशात हरितक्रांती झाली. तद्नंतर अन्नधान्याचे उत्पादन अनेक पटींनी वाढले. तथापि आपल्याला हरितक्रांतीने शिस्त मात्र शिकवली नाही. खत आणि कीटकनाशके किती वापरायची? खताचे गुणवत्तेचे प्रमाण मूल्यमापन शेतीविषयक तज्ज्ञाऐवजी खताचे दुकानदार ठरवू लागले. अज्ञान, माहितीचा अभाव आणि भरपूर उत्पादनाचे अवास्तव प्रलोभन यांमुळे रासायनिक खते आणि कीटकनाशके मनसोक्तपणे वापरली जाऊ लागली. याचा अनिष्ट परिणाम भारतीयांच्या आरोग्यावर होत आहे. हा एक प्रकारचा ‘द सायंलेट किलर’ आहे.
चहामध्ये कीटकनाशके सापडली म्हणून चहा वर्ज्य करणे, हा पर्याय होऊ शकत नाही. शुद्ध, स्वच्छ, निर्भेळ चहा मिळणे हा प्रत्येक भारतीयांचा हक्क आहे आणि त्यासाठी सर्वांनी आग्रही असणे अनिवार्य आहे.