संगणक आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्राला पुन्हा सुगीचे दिवस आले, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2022 07:54 AM2022-02-12T07:54:40+5:302022-02-12T07:55:02+5:30
कृत्रिम बुद्धिमत्ता कशी निर्माण करता येईल?- या प्रश्नाचे उत्तर शोधण्यात अनेक शास्त्रज्ञांनी हयात खर्चली, त्यांच्या वाटेत वळसे होते आणि ठेचाही!
विश्राम ढोले
माध्यम, तंत्रज्ञान, संस्कृती या विषयांचे अभ्यासक
“मानवी बुद्धिमत्तेच्या घटकांचे तत्त्वतः अगदी नेमकेपणे वर्णन करता आले, तर त्यानुसार चालणारी यंत्रे बनविणे शक्य आहे.” हे फक्त एक विधान नाही. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील शास्त्रज्ञांच्या सुरुवातीच्या पिढ्यांचे ते एक खोलवरचे गृहितक होते. एकोणविसाव्या शतकातील एदा लोवलिएसपासून ते विसाव्या शतकातील अँलन ट्यूरिंगपर्यंत अनेकांनी वेगवेगळ्या शब्दांत ते व्यक्त केले होते.
या गृहीतकाला एक तत्त्व म्हणून प्रतिष्ठा आली ती १९५६ मध्ये. त्यावर्षी अमेरिकेतील हॅनोवर येथील डार्टमाऊथ कॉलेजमध्ये एक परिषद भरविण्यात आली होती. या परिषदेसाठी पुढाकार होता जॉन मकार्थी या गणितज्ज्ञाचा. महिनाभर चाललेल्या त्या परिषदेमध्ये संगणक तज्ज्ञ मार्विन मिन्स्की आणि नॅथनियल रॉचेस्टर, माहिती शास्त्रज्ञ क्लॉड शॅनन आणि डोनाल्ड मॅके, गणितज्ज्ञ रे सॉलोमनाफ, राज्यशास्त्रातील तज्ज्ञ हर्बर्ट सायमन यांच्यासह मोजकेच पण अग्रणी अभ्यासक सहभागी झाले होते. मकार्थीनी या परिषदेला नाव दिले होते आर्टिफिशियल इंटेलिजन्स कॉन्फरन्स. या शब्दाचा हा पहिला अधिकृत वापर. त्याआधी हे विद्याक्षेत्र कम्प्युटिंग, ऑटोमेटा थिअरी, सायबरनेटिक्स अशा नावाने ओळखली जाई.
या परिषदेने संबंधित क्षेत्रांतील तज्ज्ञांना पहिल्यांदा एकत्र आणले. विषयासंबंधी एक व्यापक भान निर्माण केले आणि कृत्रिम बुद्धिमत्ता कशी निर्माण करता येईल, याबाबत वर दिलेल्या गृहितकाला एक तत्त्व म्हणून मान्यता दिली. पुढे या तज्ज्ञांनी संगणक, कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावली. या सगळ्यांमुळे पन्नाशीच्या दशकाखेर कृत्रिम बुद्धिमत्ता ही एक विद्याशाखा म्हणून तर प्रस्थापित झालीच पण विद्यापीठ आणि संशोधकांच्या वर्तुळाबाहेरही त्याबद्दल सर्वसामान्य लोकांमध्ये एक कुतूहल निर्माण होत गेले. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या इतिहासात ‘डार्टमाऊथ परिषद’ एक ऐतिहासिक टप्पा ठरली.
पण वरकरणी बिनतोड वाटणाऱ्या या गृहितकला मर्यादा होत्या. एकतर या तत्त्वानुसार मानवी बुद्धिमत्तेच्या घटकांचे नेमकेपणे वर्णन करण्याची जबाबदारी मानवावर आली होती. हळूहळू लक्षात येत गेले की, नेमके वर्णन तर सोडाच; पण बुद्धिमत्तेचे विविध घटक ओळखणे, त्यांचे एकमेकांशी असलेले संबंध शोधणे या साध्या वाटलेल्या गोष्टीही विलक्षण गुंतागुंतीच्या आहेत. यंत्राला ती गुंतागुंत आत्मसात करायला लावणे, हे वाटते तितके सोपे नव्हते. कारण ही गुंतागुंत पचवू शकेल इतकी गणनक्षमताच त्यावेळी दृष्टिपथात नव्हती.
नव्या विद्याशाखेच्या जन्मामुळे पल्लवित झालेल्या आशावादाच्या या मर्यादा तेव्हा लक्षात आल्या नाहीत. सायमन यांनी १९६५ मध्ये भाकित केले की, माणूस जे काही करू शकतो, ते सारे येत्या वीस वर्षांमध्ये यंत्रे करू लागतील. पुढे दोनच वर्षांनी मिन्स्की यांनीही दावा केला की, कृत्रिम बुद्धिमत्ता निर्माण करण्याच्या मार्गातील साऱ्या अडचणी एका पिढीच्या कालावधीत (साधारण वीस वर्षे) सुटतील. त्यावेळचे इतरही तज्ज्ञ कमी-अधिक फरकाने असेच ‘बीस साल बाद’ची आश्वासने देत होते.
साठीच्या दशकाच्या अखेरीस या आशावादाच्या मर्यादा दिसायला लागल्या. ब्रिटिश गणितज्ज्ञ जेम्स लाईटहिल यांनी १९७३ मध्ये प्रसिद्ध केलेल्या एका व्यापक अहवालामुळे तर त्यावर जणू शिक्कामोर्तबच झाले. पुढे आठेक वर्षे कृत्रिम बुद्धिमत्तेचे क्षेत्र कोमेजलेल्या स्थितीतच राहिले. संशोधनाचा निधी आटला. नवे प्रकल्प घटले. संशोधकांचा उत्साह कमी झाला, पण ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीला जपानने संगणक क्षेत्रामध्ये मोठी गुंतवणूक करायला सुरुवात केली आणि स्पर्धेत मागे राहू नये म्हणून अमेरिका, ब्रिटनसह नाटो राष्ट्रांनी या क्षेत्रातील गुंतवणूक वाढवली. संगणक आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्राला पुन्हा सुगीचे दिवस आले; पण जुन्याजाणत्या तज्ज्ञांना जाणवत होते की, हाही फुगा फुटेल.
झालेही तसेच. मानवी बुद्धिमत्तेचे तपशीलवार वर्णन, त्याचे गणिती तर्कात रूपांतर आणि त्यावरून संगणकीय भाषेतील तपशीलवार आज्ञावली या जुन्याच सूत्रावर आधारलेले कृत्रिम बुद्धिमत्तेचे क्षेत्र नवा निधी मिळूनही फार काही चमक दाखवेना; मग निधी आटत गेला आणि पुन्हा एकदा या क्षेत्रात शिशिराची पानगळ सुरू झाली. पुढची सातेक वर्षे ती तशीच राहिली. नव्वदीच्या मध्यापासून ही पानगळ हळूहळू थांबली. नव्या वाटा दिसू लागल्या. खरं तर, दिसू लागलेल्या वाटा काही अगदीच नव्या नव्हत्या. फ्रँक रोझनब्लाट या गणितज्ज्ञ-संगणकतज्ज्ञाने १९५७ मध्येच आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क (एएनएन) ही संकल्पना मांडून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात ही पाऊलवाट निर्माण केली होती. मानवी चेतासंस्थेच्या कार्यपद्धतीचे अनुकरण करण्याच्या सूत्रावर ही संकल्पना आधारली होती. डार्टमाऊथ परिषदेने स्वीकारलेल्या सूत्रात संगणकाला शिकविण्यावर भर होता. रोझनब्लाटच्या सूत्रात संगणकाने शिकण्यावर भर होता.
एएनएनचे जाळे हे संगणकाच्या स्वयंशिक्षणाचे मुख्य माध्यम होते. त्यावर आधारित पर्सेप्ट्रॉन नावाच्या कृत्रिम बुद्धिमत्ता यंत्राची कल्पनाही त्यांनी मांडली होती. मात्र, मिन्स्की आणि सेमोर पेपर्ट या दोन तज्ज्ञांनी साठच्या दशकामध्ये या संकल्पनेच्या मर्यादा गणितीय विश्लेषणातून इतक्या प्रभावीपणे दाखवून दिल्या की, आधीच अल्पमतात असलेली ही संकल्पना, स्वयंशिक्षणाचे सूत्र आणि त्यावर आधारित यंत्र पार मोडीत निघाले. पण गंमत अशी की, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रामध्ये नव्वदीच्या दशकात थांबलेली पानगळ आणि विशेषतः गेल्या दहा-एक वर्षांत फुललेला वसंत या दोन्हींमागचा एक प्रमुख आधार ही न्युरल नेटवर्कची संकल्पनाच आहे. तेव्हा तिची क्षमता लक्षात आली नाही; पण नव्वदीनंतर संगणकाची गणनक्षमता प्रचंड प्रमाणावर वाढली. गेल्या दशकभरात संगणकाला समजेल अशी प्रचंड विदा (डेटा) निर्माण झाली आणि झाकोळल्या गेलेल्या या संकल्पनेचे तेज दिसू लागले. कृत्रिम बुद्धिमत्तेचे क्षेत्र बीस साल बादच्या आश्वासनापुरते मर्यादित राहिले नाही. आज ते जगण्याचे वास्तव बनले आहे. त्याला कारणीभूत ठरले ते न्युरल नेटवर्कचे सूत्र आणि त्याला मिळालेले महाविदेचा (बिग डेटा) आधार. हे कसे घडले, याचा विचार पुढील लेखांकांमध्ये.
vishramdhole@gmail.com