शिक्षकदेखील झाले सैराट

By admin | Published: September 1, 2016 05:10 AM2016-09-01T05:10:06+5:302016-09-01T05:10:06+5:30

चळवळींचा जिल्हा म्हणून अहमदनगरची ओळख आहे. सहकार क्षेत्राची पायाभरणीच या जिल्ह्यात झाल्याने सहकार क्षेत्राचे जे मोठे जाळे निर्माण झाले, त्यात साखर कारखाने

The teacher also became sarat | शिक्षकदेखील झाले सैराट

शिक्षकदेखील झाले सैराट

Next

चळवळींचा जिल्हा म्हणून अहमदनगरची ओळख आहे. सहकार क्षेत्राची पायाभरणीच या जिल्ह्यात झाल्याने सहकार क्षेत्राचे जे मोठे जाळे निर्माण झाले, त्यात साखर कारखाने, पतसंस्था, वि.का.संस्था, नागरी सहकारी बँकांचा समावेश आहे. यामुळे नगरचे जे अर्थकारण वाढले, त्यात अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकही आघाडीवर आहे. बँकेत ६१० कोटींच्या ठेवी असून १२ हजार सभासद तर १४ शाखा आहेत. हा पसारा सांभाळायचा म्हणजे राजकारण आलेच. ते करणारे गुरुजी राजकीय पुढाऱ्यांपेक्षा कमी नाहीत. बँकेच्या राजकारणात सदिच्छा मंडळ, गुरुकुल मंडळ, गुरुमाऊली मंडळ, इब्टा बहुजन आघाडी, ऐक्य मंडळ पुढे आहेत. अनेक वर्षे सदिच्छा मंडळ सत्तास्थानी राहिले आहे. दहा वर्षापूर्वी संजय कळमकर यांच्या माध्यमातून शिक्षक बँकेत सत्तांतर होऊन गुरुकुल मंडळाच्या हाती सत्ता गेली होतीे व त्यानंतर बँकेच्या चाव्या सदिच्छा मंडळाच्या हाती आल्या. याच मंडळात फूट पडली आणि रावसाहेब रोहकले यांच्या गुरूमाऊली मंडळाची निर्मिती झाली. बँकेत आता रोहकले यांच्या गुरुमाऊलीची सत्ता आहे. परंतु गुरुजींचे राजकारण इतक्या टोकाला गेले आहे की पाच वर्षे एकमेकांची उणी-दुणी काढण्यात हे गुरुजी व्यस्त असतात. त्यांना आपल्या शाळेतील कामांचे भानही नसते. शिक्षक नेत्यांच्या डोक्यात केवळ मंडळ व बँकेचेच राजकारण असते.
अहमदनगर शिक्षक सहकारी बँकेची ९७ वी सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. सालाबादप्रमाणे शिक्षकांची फ्री स्टाईल पाहायला मिळाली. बँकेची सभा म्हटली की, शिक्षक सैराट झालेले दिसणे, हे चित्र दरवर्षी पाहायला मिळते.
बँकेच्या वार्षिक सभेची तारीख जाहीर झाली की, शिक्षक मंडळाच्या बैठका आयोजित केल्या जातात. बैठकांमध्ये सत्ताधाऱ्यांच्या उणीवा शोधण्याचे काम विरोधकांकडून केले जाते. यातून भ्रष्टाचाराचे आरोप सुरू होतात. त्यानंतर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप, पत्रकबाजी सुरू होते. सभेत देखील कोणी काय भूमिका घ्यायची याची तयारी आधीपासून केली जाते. यंदाच्या सभेतदेखील हेच पाहायला मिळाले. दहा वर्षापूर्वी गुरुकुलची सत्ता असताना शिक्षक नेते संजय कळमकर यांना सदिच्छा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. हे प्रकरण त्यावेळी पोलीस स्टेशनपर्यंत गेले होते. त्यानंतर हेच लोण राज्यभर पसरले. यामागील कारणांचा शोध घेतला तर सहकारातील भ्रष्टाचारच पुढे येतो. शिक्षक बँकेत आतापर्यंत अनेक घोटाळे गाजले आहेत. यात बजाज अलायन्स विमा प्रकरण, कर्मचारी मेहनताना प्रकरण, १२५ कोटी खर्चाची स्ट्राँगरुम व दुरुस्ती, इतर साहित्य खरेदी प्रकरण या शिवाय कोपरगाव शाखेतील ५७ लाखांचा दडपलेला अपहार ही वादग्रस्त प्रकरणे कारणीभूत आहेत. संघटनेचे बळ मोठे असते आणि संघटित वर्ग स्वत:चे म्हणणे मांडू शकतो हे समाजात आपल्याला दिसून येते. यात शिक्षकही मागे नाहीत. यंदाच्या सभेत अनेक गुरुजी मद्यप्राशन करून आले होते. सभेत महिला सदस्यही असतात, याचेही भान त्यांना असू नये? जबाबदारीचे भान सोडून गुरुजी असे सैराटपणे का वागतात? याला शिक्षक नेतेच जबाबदार आहेत, असे म्हणावे लागेल.
आज महाराष्ट्रात सहकार क्षेत्राची वाट अतिशय खडतर झाली आहे. अनेक बँका, पतसंस्था डबघाईला आल्या आहेत. काही बुडाल्या आहेत. याला कारण भ्रष्टाचार, गैरव्यवहारच आहे. त्यामुळे बँकेच्या प्रत्येक नेत्यानी बँकेच्या विकासासाठी व सभासदांच्या हितासाठी एकजुटीने काम करणे गरजेचे आहे. अन्यथा ही बँकही डबघाईस येईल, यात शंका नाही. चर्चा करून प्रश्न सोडविता येतात. सभेत केवळ गोंधळ, हाणामारीने प्रश्न सुटत नसतात. यासाठी गुरुजींनी इतका सैराटपणा करणे योग्य नाही.
- अनिल लगड

Web Title: The teacher also became sarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.