शिक्षिकेने विणली प्रत्येक विद्यार्थ्याची बाहुली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2021 06:02 AM2021-08-07T06:02:44+5:302021-08-07T06:03:36+5:30
Education News: कोरोनाकाळात शाळा बंद पडल्यावर आपल्या विद्यार्थ्यांच्या आठवणीने अस्वस्थ झालेल्या नेदरलॅण्डस्मधल्या एका शिक्षिकेने काय करावं? - आपल्या वर्गातल्या प्रत्येक मुला-मुलीच्या प्रतिकृती - लोकरीच्या बाहुल्या विणायला घेतल्या. त्यांचं नाव आहे मिस इंगबोर्ग मिन्स्टर- वॅन डर डीन!
कोरोनाकाळात शाळा बंद पडल्यावर आपल्या विद्यार्थ्यांच्या आठवणीने अस्वस्थ झालेल्या नेदरलॅण्डस्मधल्या एका शिक्षिकेने काय करावं? - आपल्या वर्गातल्या प्रत्येक मुला-मुलीच्या प्रतिकृती - लोकरीच्या बाहुल्या विणायला घेतल्या. त्यांचं नाव आहे मिस इंगबोर्ग मिन्स्टर- वॅन डर डीन! सध्या जगभरातल्या शैक्षणिक वर्तुळात त्यांच्या या अफलातून प्रयोगाची चर्चा चालू आहे.
कोरोना महामारीत शाळा नसल्याने सुरुवातीचे काही दिवस मुलांना मौजेचे वाटले तरी, कोरोनामुळे इतके दिवस शाळा बंद असल्यानं केव्हा एकदा शाळेत जातो, दंगामस्ती करतो आणि मित्र-मैत्रिणींना भेटतो असं त्यांना झालं. आता ज्या ज्या ठिकाणी शाळा प्रत्यक्ष सुरू झाली आहे, त्या मुलांकडे पाहिल्यावर, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिल्यावर कळतं की या मुलांनी किती गोष्टी गमावल्या होत्या! ज्यांच्या शाळा अजूनही सुरू होऊ शकलेल्या नाहीत, ती मुलं आता आतुरतेनं आपल्या शाळेची, मित्रांची आणि त्याचबरोबर आपल्या शिक्षकांच्या भेटीचीही आस बाळगून आहेत. बऱ्याच शाळा, शिक्षक आणि मुलं ‘ऑनलाइन’ भेटत असली तरी प्रत्यक्ष भेटीची सर या ऑनलाइन भेटीला नाही.
दुसरीकडे शिक्षकांचीही चांगलीच परवड झाली. आजही अनेक शिक्षक असे आहेत, ज्यांना आपल्या विद्यार्थ्यांना भेटल्याशिवाय, त्यांच्याशी गप्पागोष्टी केल्याशिवाय चैन पडत नाही. शिक्षकांनी नाईलाजानं ऑनलाइन वर्ग घेतले, मुलांना शिकवण्यात, त्यांच्याशी जुळवून घेण्यात अपार कष्ट घेतले, पण त्यांनाही आस होती ती विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष भेटण्याचीच.
काही शिक्षकांनी मात्र आपला एकटेपणा घालवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग, युक्त्या केल्या. नेदरलॅण्डस्च्या प्राथमिक शाळेच्या शिक्षिका मिस इंगबोर्ग मिन्स्टर- वॅन डर डीन त्यापैकीच. कोरोनामुळे शाळा बंद पडल्यावर आणि मुलांशी प्रत्यक्ष संपर्क संपल्यावर त्या अतिशय अस्वस्थ झाल्या. आपल्या वर्गातल्या या मुलांना प्रत्यक्ष आणि तेही रोज आपल्याला कसं भेटता येईल, चोवीस तास ही मुलं आपल्याला डोळ्यासमोर कशी दिसतील, यादृष्टीनं प्रयत्न सुरू केले.
इंग्लंडचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता टॉम डेली सध्या खूप चर्चेत आहे. ऑलिम्पिक सामने पाहत असताना हातात सुया घेऊन एकीकडे तो विणकामही करत होता!.. कोणत्याही ताणापासून मुक्त होण्याचा आणि चित्त एकाग्र करण्याचा हा माझा मार्ग आहे, असं त्यानं जाहीरपणे बोलूनही दाखवलं. इंगबोर्ग मिन्स्टर यांनीही विणकामाचाच आधार घेतला.
आपल्या विद्यार्थ्यांची आठवण म्हणून या शिक्षिकेनं आपल्या वर्गातील मुलांच्या बाहुल्या तयार करायला सुरुवात केली! आश्चर्याची गोष्ट म्हणजे या फक्त बाहुल्या नव्हत्या, तर आपल्या वर्गातल्या प्रत्येक मुलाचं व्यक्तिमत्त्वही त्यात उमटेल, याची पुरेपुर काळजीही त्यांनी घेतली!
हार्लेम येथील ‘डॉ. एच. बाविंक’ या शाळेतील आपल्या वर्गातील प्रत्येक मुलाची छबी त्यात त्यांनी उमटवली. त्या मुला-मुलीचे केस, डोळे, पेहराव.. या प्रत्येक गोष्टीची बारीकसारीक नोंद घेऊन त्यांनी या बाहुल्या तयार केल्या. या मुलांना ओळखणाऱ्या इतर कुणी या बाहुल्या नुसत्या पाहिल्या तरी त्या मुलांची नावं सांगता येतील इतका जिवंतपणा या बाहुल्यांमध्ये होता. या २३ बाहुल्या तयार करताना त्यांना बराच वेळ लागला, पण जणू आपला विद्यार्थी आपण ‘घडवतो’ आहोत, अशी भावना त्यामागे होती. इंगबोर्ग एवढ्यावरच थांबल्या नाहीत, या मुलांप्रमाणे स्वत:चीही एक बाहुली त्यांनी तयार केली. या निर्मितीत त्यांची अस्वस्थता थोडी कमी झाली तरी, मुलांच्या भेटीला त्या आसुसलेल्याच होत्या.
अखेर शाळा सुरू झाल्या. एकेक करत मुलं शाळेत येऊ लागली. विद्यार्थी आणि शिक्षकांच्या या पुनर्भेटीचा आनंद अर्थातच शब्दांत मांडता येणारा नव्हता. आपल्या वर्गातल्या प्रत्येक मुलाला इंगबोर्ग यांनी मग त्यांनी तयार केलेल्या या बाहुल्या भेट दिल्या. बाहुलीतली आपली हुबेहूब प्रतिकृती पाहून मुलंही अतिशय हरखली आणि त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. रडत रडतच आपल्या लाडक्या शिक्षिकेलाही मग ते बिलगले. ही स्मृती त्यांच्या मनातून कधीही पुसली जाणार नाही.
स्वत:च्या ‘प्रतिमेसोबत’ खेळतात मुलं!
बाहुलीतली आपली प्रतिमा (मिनी मी) सोबत घेऊन मुलं आता आनंदानं हुंदडतात. त्यांना घेऊन वर्गातही बसतात! आपल्या वर्गातल्या नव्या मुलांसाठीही इंगबोर्ग मिन्स्टर यांनी आता बाहुल्या विणायला घेतल्या आहेत. त्यांचं पाहून इतर शिक्षकही इंगबोर्ग यांच्या मागे लागले आहेत, आमच्याही वर्गातील मुलांसाठी बाहुल्या तयार करा म्हणून! हे ऐकल्यावर मिस इंगबोर्ग लटक्या रागानं म्हणतात, ‘बाहुल्याच बनवत बसले तर मग मी मुलांना शिकवू केव्हा?..’