संघाला झाला ओव्हरडोज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 02:25 AM2018-06-09T02:25:10+5:302018-06-09T02:25:10+5:30
८ जून रोजी नागपुरात मोठा भूकंप होऊन प्रचंड राजकीय उलथापालथ होईल अशी हवा तयार झाली होती. देशातील दोन प्रमुख राजकीय पक्षांची अब्रूच जणुकाय डावावर लागलेली.
-दिलीप तिखिले
८ जून रोजी नागपुरात मोठा भूकंप होऊन प्रचंड राजकीय उलथापालथ होईल अशी हवा तयार झाली होती. देशातील दोन प्रमुख राजकीय पक्षांची अब्रूच जणुकाय डावावर लागलेली.
निमित्त होते देशाचे महामहीम राष्टÑपती राहिलेले प्रणवदा यांची नागपुरातील संघ कार्यक्रमाला उपस्थिती.
आपला एक दिग्गज नेता संघाच्या गुहेत शिरतो आहे, हे पाहून काँग्रेसच्या पोटात भीतीने गोळा उठणे स्वाभाविक होते. हा वर्तमान माहोलचाही परिणाम म्हणाना! ‘रात्र वैऱ्याची आहे.’ तिकडे अमितभाई ‘मिशन किडनॅपिंग’ घेऊन देशभर फिरत आहेत. मासे गळाला लावण्यासाठी ‘साम, दाम, दंड, भेद’ ही आयुधे आहेतच. यातल्याच भेद नीतीचा वापर संघाच्या माध्यमातून प्रणवदांवर होऊ शकतो ही काँग्रेसची रास्त भीती. म्हणूनच ‘दा..नका हो जाऊ’ म्हणून त्यांची हर तºहने समजूत घालण्यात आली पण ते बधले नाहीत. पोरीने...शर्मिष्ठानेही समजावले... पापा उधर जाना मत... खतरा है...!
आता माझेच उदाहरण घ्या...तुम्ही तिकडे जाणार म्हटल्यावर मला चक्क भाजपात घेऊन टाकले. प. बंगालमधून तिकीट देण्याची पुडीही सोडली. आता बोला...
पण दा काही बोलले नाही... मला जाऊ दे...बोलू दे... मग बघ...एवढेच म्हणाले.
आता ‘दा’ काही ऐकतच नाही म्हटल्यावर काँग्रेसची तब्येत बिघडली. ‘दा’ नागपुरात पोहचले. सर्व प्रोटोकॉल बाजूला सारुन मोहनराव राजभवनावर स्वागतासाठी गेले, हे पाहिल्यावर तर धडधड आणखीनच वाढली. पुढचा धोका ओळखून पक्षाला आयसीयूत भरती करावे लागले. प्रणवदांच्या प्रत्येक हालचालींवर पक्षाचा पल्स रेट कमी जास्त होत होता.
इकडे ‘दां’नी व्हिजीटर्स बुकात डॉ. हेडगेवारांना ‘देशाचे महान सपूत’ म्हणून श्रद्धांजली अर्पण केली आणि तिकडे आयसीयूत काँग्रेसला चक्क व्हेन्टिलेटरवर घ्यावे लागले.
पुढचे काही मिनिट काही सांगता येत नाही असे डॉक्टरांनीही सांगून टाकले. ‘अब सब कुछ उपरवालेके अर्थात ‘दा’ के हात मे है. असेही ते काहीसे कुजबुजले.
डॉक्टरांच्या प्रार्थनेला अखेर ‘दा’ धावून आले. ध्वजप्रणाम कार्यक्रमात सर्वांनी नमन केले पण प्रणवदांचा हात आडवा छातीपर्यंत गेला नाही. बस्स् हीच मात्रा आयसीयूत कामी आली. हे पाहून तिकडे ५६ इंची छातीचे ठोके वाढले की नाही हे माहीत नाही पण इकडे काँग्रेसच्या छातीतील धडधड कमी झाली. व्हेंटी निघाली. मात्र ‘दा’ आता काय बोलतील ही धाकधुक होतीच. पेशन्ट ‘अंडर आॅब्झर्वेशन’ होता. पण यातूनही काँग्रेस बाहेर पडली. दादांनी संघाच्या गडात संघालाच खरीखोटी सुनावली. देशभक्ती, राजधर्माचे धडेही दिले.
एव्हाना, इकडे संघाच्या गडात चुळबुळ सुरु झाली होती. ‘ये क्या हो रहा’ म्हणत संघसेवक क्षणोक्षणी तोंडाचा आऽऽ वासत होते. खुद्द सरसंघचालक प्रणवजींचा माईक वर खाली करतायंत...‘पाथेय’चा मान अतिथींना देतात... आणि हे काय...संघभूमीवर गांधी, नेहरुंचे नाव...? शीव...शीव... संघनिष्ठांना हे सर्व अनाकलनीय होते. आता तब्येत बिघडण्याची पाळी संघाची होती. काँग्रेस आयसीयूतून बाहेर पडली. त्याच बेडवर संघाला अॅडमिट करावे लागले. डॉक्टरांनी निदान केले ‘ओव्हरडोज’ ...रिअॅक्शन आली...!
(तिरकस)