गोल्ड कोस्टमध्ये तेजाळलेली तेजस्विनी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 03:41 AM2018-04-17T03:41:20+5:302018-04-17T03:41:20+5:30
कोल्हापूरची आंतरराष्ट्रीय नेमबाज तेजस्विनी सावंत गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक आणि रौप्यपदक अशी दोन पदके पटकावत ‘सोन्या’सारखी तेजाळली. राष्ट्रकुल स्पर्धेतील आजवरची तिची ही सर्वाेच्च कामगिरी आहे.
- वसंत भोसले
कोल्हापूरची आंतरराष्ट्रीय नेमबाज तेजस्विनी सावंत गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक आणि रौप्यपदक अशी दोन पदके पटकावत ‘सोन्या’सारखी तेजाळली. राष्ट्रकुल स्पर्धेतील आजवरची तिची ही सर्वाेच्च कामगिरी आहे.
आॅस्ट्रेलियातील गोल कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने तिसरा क्रमांक पटकावला आहे. यापूर्वी केलेल्या कामगिरीपेक्षा ही कामगिरी सरस नसली तरी विविध क्रीडा प्रकारांत भारतीय खेळाडू आता चमकू लागले आहेत, ही आनंदाची बाब आहे. शिवाय पुरुषांपेक्षा महिला खेळाडूंचा वाढणारा दबदबा वाखाणण्याजोगा आहे. कुस्ती, बॅडमिंटन, टेबल टेनिस, नेमबाजी, वेटलिफ्टिंग, आदी प्रकारातील कामगिरी जगज्जेता होण्याच्या मार्गावरील आहे.
या स्पर्धेत भारताने २६ सुवर्णपदकांसह ६६ पदके मिळविली. २०१० मध्ये नवी दिल्लीमध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत ३९ सुवर्णपदकांसह १०१ पदके जिंकली होती. मात्र, गोल्ड कोस्टची स्पर्धा विशेष होती. काही क्रीडा प्रकारांत भारत आता वर्चस्व गाजवू लागला आहे. त्यामध्ये वेटलिफ्टिंग, टेबल टेनिस, बॅटमिंटन आणि नेमबाजीचा समावेश आहे. महाराष्ट्राच्या सात खेळाडूंनी सात पदके पटकावली आहेत. त्यापैकी दोन सांघिक आहेत, तर कोल्हापूरची नेमबाजपटूू तेजस्विनी सावंत हिने दोन पदके पटकावली आहेत. आगामी काळात तिचे ध्येय आता विश्वविजेता होण्याचे आणि आॅलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्याचे आहे. तेजस्विनीच्या रूपाने कोल्हापूरच्या क्रीडा संस्कृतीला नवा उजाळा मिळाला आहे. तिच्याच प्रेरणेने नेमबाजीत अनेक मुली तयार होत आहेत. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत क्रिकेटचे नेतृत्व अनुजा पाटील करीत आहे.
तेजस्विनी सावंत हिने नेमबाजीची कारकीर्द आंतरराष्ट्रीय नेमबाज स्वर्गीय जयसिंग कुसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सन १९९९ मध्ये सुरू केली. २००४ मध्ये तिने इस्लामाबाद (पाकिस्तान) येथे झालेल्या साऊथ एशियन गेममध्ये भारतासाठी सुवर्णपदक पटकावले. यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही. तिची कारकीर्द बहरतच गेली. २००६ साली मेलबोर्न येथे झालेल्या राष्टÑकुल स्पर्धेत तिने महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात वैयक्तिक व दुहेरीत सुवर्णपदकाची कमाई केली.
म्युनिच (जर्मनी) येथे २००९ मध्ये झालेल्या ‘आयएसएसएफ विश्वचषक’ नेमबाजी स्पर्धेत तेजस्विनीने ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये कांस्यपदक पटकावले; तर ८ आॅगस्ट २०१० ला यात सुधारणा करीत तिने जर्मनी येथील ‘वर्ल्ड चॅम्पियनशिप’ स्पर्धेत ५० मीटर रायफल प्रोनमध्ये अव्वल कामगिरी करीत विश्वविजेतेपद पटकावले. अशा प्रकारची कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला नेमबाजपटू ठरली. या कामगिरीनंतर तिच्या कामगिरीचा आलेख चढताच राहिला. २०१० मध्येच दिल्ली येथे झालेल्या राष्टÑकुल स्पर्धेमध्ये तिने ५० मीटर रायफल प्रोनमध्ये रौप्यपदक मिळविले. दुहेरीतही तिने कांस्य आणि रौप्यपदकांची कमाई केली. या कामगिरीची दखल घेत राज्य शासनाने तिची क्रीडा खात्याच्या ‘आॅफिसर आॅन स्पेशल ड्युटी’ या वर्ग-१ च्या पदावर नियुक्ती केली. राज्य शासनाने २०१० मध्ये ‘शिवछत्रपती पुरस्कार’ आणि केंद्र सरकारने २०११ मध्ये ‘अर्जुन पुरस्कारा’ने तिला सन्मानित केले आहे.
मध्यंतरी काही काळ तिच्यासाठी खडतर होता. त्याचा काहीसा दबावही तिच्यावर आला. परिणामी, २०१४ च्या राष्टÑकुल स्पर्धा आणि आशियाई स्पर्धांसाठी भारतीय खेळाडूंच्या पथकात ती नव्हती. दरम्यान, सन २०१६ मध्ये तेजस्विनी विवाहबद्ध झाली. यानंतर ती काही काळ नेमबाजीच्या सरावापासून अलिप्त राहिली. पण, नव्या सांसारिक जीवनात रुळल्यानंतर पुन्हा नव्या जोमाने तिने सराव सुरू केला. कठोर मेहनत केली. मनोबल आणि संयम यावर विशेष भर दिला. परिणामी, गोल्ड कोस्ट येथील राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करीत ती सोन्यासारखी तेजाळली.