संवाद माध्यमातील दूरसंचार क्रांती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 03:30 AM2019-05-17T03:30:43+5:302019-05-17T03:30:55+5:30
- डॉ. दीपक शिकारपूर (संगणकतज्ज्ञ) १७ मे १८६५ पासून जागतिक दूरसंचार संघ स्थापनेपासून जगभरात १७ मे हा दिवस ‘जागतिक ...
- डॉ. दीपक शिकारपूर
(संगणकतज्ज्ञ)
१७ मे १८६५ पासून जागतिक दूरसंचार संघ स्थापनेपासून जगभरात १७ मे हा दिवस ‘जागतिक दूरसंचार दिवस’ म्हणून साजरा केला जातो. दूरसंचार क्रांती ही जगातील सर्वांत महत्त्वाची आधुनिक तंत्रज्ञान आणि विकासाची क्रांती मानली जाते. टेलिफोनच्या आधी तारेने संदेश दिले जात होते. त्याचा विस्तार करण्यासाठी १७ मे १८६५ रोजी इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियनची स्थापना झाली.
गेल्या पाचपंचवीस वर्षांत विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे जगातील सर्व आर्थिक-सामाजिक-राजकीय चित्रे, धोरणे आणि समीकरणे आरपार बदलली! यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स व उपग्रहीय संवादमाध्यमांचा फार मोठा वाटा आहे. त्यामध्येही सूक्ष्मतंत्रज्ञान (नॅनो टेक्नॉलॉजी), सर्व संगणकीय वैशिष्ट्ये समाविष्ट असलेला सेलफोन आणि इंटरनेट यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यातल्या माणसांचेही जीवनचित्र पूर्णत: वेगळे झाले. दूरसंचार क्षेत्रातील क्रांतीमुळे मानवाने विकासात एक पाऊल आणखी पुढे टाकलेले आहे. काही तांत्रिक बाबी जाणणारे यापर्यंत सीमित असणारे संगणक तंत्रज्ञान आता सर्वमान्य घरोघरी पोहोचले आहे. आज संवादासाठी आपणास फक्त संगणकावरच अवलंबून राहावे लागत नाही. खरे तर सेलफोन आजचा फिरता संगणक बनला असून सेलफोनमार्फत आपण अनेक गोष्टी स्वस्तात सहजपणे आणि आपल्या पसंतीच्या ठिकाणाहून करू शकतो. मोठमोठ्या शहरांत काय, लहान गावांमधूनही डेस्कटॉप कॉम्प्युटर वेगाने दिसेनासा होत आहेच.
मोबाइलच्या आधी सर्वत्र टेलिफोन अर्थात लॅण्डलाइन फोन होते. मोबाइल आल्यानंतरदेखील लॅण्डलाइन अस्तित्वात होतेच. मात्र, मागील पाच ते सात वर्षांत मोबाइल क्षेत्रात ऐतिहासिक क्रांती झाली. या मोबाइल्सने टेलिफोनच काय, तर इंटरनेट व लॅपटॉपचीदेखील जागा घेतली. यामुळे आता लॅण्डलाइन हळूहळू कमी होत चालले आहेत. तंत्रप्रणालींच्या संयोगांमुळे विशेषत: चित्र, ध्वनी आणि माहितीच्या एकत्रित वापरामुळे एकात्मिक माहिती, संवाद आणि करमणुकीचे एक वेगळेच दालन उघडले आहे. ही दूरसंचार क्रांती कामाचा वेग वाढविण्यासाठी तसेच एका व्यक्तीचा दुसºया व्यक्तीशी त्वरित संपर्क होण्यासाठी महत्त्वाचा दुवा ठरला आहे. साधारणत: २५-३० वर्षांपूर्वी दूरध्वनी केवळ उच्चभ्रू लोकांकडे अथवा व्यापारी प्रतिष्ठाने किंवा आस्थापना इथेच आढळत. मात्र, आता सामान्यांतल्या सामान्य व्यक्तीकडेदेखील मोबाइल फोन असल्याचे आढळून येते. दूरसंचार माध्यमांमुळे एक व्यक्ती दुसºया व्यक्तीच्या खूपच जवळ आली असून, हे उपकरण मानवाची नितांत गरज बनली आहे.
आता स्मार्टफोनची लोकप्रियता वाढते आहे (आणि त्यांच्या किमतीही आटोक्यात येऊ लागल्या आहेत). स्मार्टफोनचे चित्र आणि आवाज अतिशय सुस्पष्ट असतो. येत्या दहा वर्षांत स्मार्टफोन किंवा इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक साधनाशी संवाद साधणे अतिशय सुलभ होणार आहे. ‘टचस्क्रीन’ तर बहुतेक ठिकणी आताच पोहोचला आहे; परंतु साधनाशी थेट बोलण्याचे (व्हॉइस कमांड) प्रमाण खूपच वाढणार आहे. विविध अॅप्लिकेशन्स ऊर्फ ‘अॅप्स’द्वारे ते असंख्य कामे सटासट हातावेगळी करू शकतात. आज जगाच्या सात अब्ज लोकसंख्येपैकी ३४% लोक इंटरनेट वापरतात. आज आपल्याकडे ५० कोटी सेलफोनधारक आहेत आणि त्यांची संख्या दरमहा ५० ते ६० लाखांनी वाढते आहे. सध्या प्रत्येकाच्याच हाती स्मार्टफोन दिसू लागल्याने हँडसेटवरून ‘लाइव्ह स्ट्रीमिंग व्हिडीओ’ पाहणाऱ्यांची संख्या विलक्षण वाढणार आहे. या व अशा अनेक सुविधांसाठी ५ जी तंत्र नुकतेच प्रकाशात आले आहे. ५ जी तंत्रामुळे आपण फक्त स्मार्टफोन नव्हे, तर सर्व उपकरणे जोडू शकू. ५ जी मोबाइल नेटवर्कमध्ये खूप जास्त बँडविड्थ उपलब्ध होईल आणि त्यामुळे मोबाइल इंटरनेट अतिशय जलद असल्याचा अनुभव येईल. आज दूरसंचार क्षेत्रातील स्पर्धेत भारत सर्वांत वेगाने आगेकूच करीत आहे. भारताने ४ जी, ५ जी क्रांतीत आपले मानांकन कायम ठेवले असले तरी जपान आणि चीन त्याही पुढे जाण्याचा प्रयत्न करीत आहेत.
‘इंटरनेट आॅफ थिंग्ज’ या संकल्पनेमुळे आता जवळजवळ प्रत्येक इलेक्ट्रॉनिक उपकरण इंटरनेटला जोडले जात आहे. स्मार्टफोनप्रमाणेच इतरही अनेक वस्तू आणि उपकरणे हुशार झाली आहेत व ती इंटरनेट, ब्लूटूथ, निअर फ्रिक्वेन्सी (एनएफ) इ. मार्गांनी परस्परांशी संवाद साधू शकतात. वापरकर्त्याने आपल्या विशिष्ट गरजा एकदा स्मार्ट उपकरणांना सांगितल्या, की ती उपकरणे एकमेकांशी ‘बोलून’ स्वत:च निर्णय घेऊ शकतात. ‘इंटरनेट आॅफ थिंग्ज’ ही संकल्पना, सूक्ष्मसंवेदक आणि बिनतारी नेटवर्क्सचा वापर करून उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील बहुतेक सर्व यंत्रे परस्परांशी थेट संवाद साधतील. त्रिमिती आणि विविध अॅप्समुळे टीव्हीमध्ये फार मोठी क्रांती होईल. टीव्हीदेखील परस्परसंवादी बनेल आणि मुख्य म्हणजे त्यावरील कार्यक्रम, अॅप्सच्या साह्याने, प्रेक्षकाच्या पसंतीनुसार बनवता येतील (कस्टमायझेशन). पुढील-दहा बारा वर्षांत हातात मावणारा स्मार्टफोन इतर अनेक गोष्टी हाताळेल व कालांतराने एका छोट्या चीपद्वारे शरीरात प्रवेश करेल. आधुनिक तंत्रज्ञानाला न घाबरता, त्याच्यापासून दूर न पळता त्याला मित्र मानणे आणि त्याच्याबाबत अधिक माहिती मिळविणे काळाशी सुसंगतच ठरणार आहे.