तंत्रज्ञानाने गाजवले २०१५ !
By admin | Published: December 27, 2015 01:42 AM2015-12-27T01:42:09+5:302015-12-27T01:42:09+5:30
गॅजेट्स तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात २०१५ सालात नवनवे बदल घडून आले. वेगाने बदलणाऱ्या, तसेच विस्तारणाऱ्या तंत्रज्ञानाच्या क्षितिजावर नवनवीन गॅजेट्स बाजारात आली अन् लोकप्रिय झाली.
‘टेक’मंत्रा : तुषार भामरे
गॅजेट्स तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात २०१५ सालात नवनवे बदल घडून आले. वेगाने बदलणाऱ्या, तसेच विस्तारणाऱ्या तंत्रज्ञानाच्या क्षितिजावर नवनवीन गॅजेट्स बाजारात आली अन् लोकप्रिय झाली. या गॅजेट्समुळे भविष्यातील तंत्रज्ञान कसं असेल, याची प्रचिती तंत्रज्ञानाच्या चाहत्यांना व वापरकर्त्यांना आली. तंत्रज्ञानाच्या वापराने मिळणाऱ्या सोई व बदलणारं जीवनमान पाहून अनेकांना या गॅजेट्सची भुरळ पडली. पाहू या अशाच अनोख्या जीवनमान बदलणाऱ्या गॅजेट्सविषयी.
सॅमसंग १६ टिबी एसएसडी : १६ टिबी म्हणजे १६००० जीबी ! वाचून आश्चर्य वाटेल, परंतु सॅमसंगने चक्क १६ टिबी साठवणूक क्षमतेची एसएसडी (सॉलिड स्टेट ड्राइव्ह/डिस्क) या वर्षी बाजारात आणली आहे. एसएसडी म्हणजेच हार्ड डिस्कची सुधारित आवृत्ती होय. आकारमानात कुठेही तडजोड न करता, उपलब्ध असलेली ही सर्वात जास्त साठवणूक क्षमतेची डिस्क आहे. आयफोनमध्ये या डिस्कच्या तुलनेत २% साठवणूक क्षमता असते. यावरून या एसएसडीच्या साठवणूक क्षमतेची कल्पना यावी.
वन प्लस टू : सिर्फ नाम ही काफी है! मोठ्या तळ्यात आलेल्या या छोट्या माशाने मोठमोठ्या ब्रँडच्या स्मार्टफोन्सना पछाडलं आणि मागेदेखील टाकलं. वन प्लस वन सगळ्यांच्या गळ्यातला ताईत झाल्यानंतर वन प्लस टू च्या आगमनासाठी चाहते डोळे अक्षरश: लावून वाट पाहात होते. या स्मार्टफोनची खासियत म्हणजे बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या महागड्या ब्रँडेड स्मार्टफोनचे कन्फिगरेशन वन प्लस टू मध्ये चक्क निम्म्या किमतीत मिळतात, हाच यांचा युएसपी होता. शिवाय दर्जात कोणतीही तडजोड नाही. वन प्लस वन मिळवण्यासाठी कंपनीचं निमंत्रण नसल्यास हा स्मार्टफोन विकत घेणं अशक्यप्राय होतं. वन प्लस टू च्या बाबतीत मात्र, कंपनीने हा अडसर दूर करत स्मार्टफोन्स सहज उपलब्ध करून दिले आहेत.
गुगलची स्वयंचलित मोटार : मोटारीला चालकाची गरज नसल्यास, तिच्या रूपात काय बदल होऊ शकतात, हे जगाला या वर्षी गुगलच्या स्वयंचलित मोटारीमुळे कळालं. बीटल कारसारख्या बबली लूकमुळे अनेकांची मनं या मोटारीने जिंकली. मुख्य म्हणजे, या कारला स्टिअरिंग व्हिलच नव्हतं. गुगलची अशी मोटार बाजारात आणायची कोणतीही योजना नसली, तरी गुगलचं पुढारलेपण आणि भविष्यत ड्रायव्हिंग टेक्नॉलॉजी कुठपर्यंत मजल मारू शकते, याची झलक गुगलच्या स्वयंचलित मोटारीने जगाला दाखवून दिली.
लाइट एल १६ कॅमेरा : डिएसएलआर आणि पॉइंट शूट कॅमेऱ्यांची जागा आता स्मार्टफोन्सच्या कॅमेऱ्यांनी घेतली असली, तरी छायाचित्रणाच्या जगात सध्या अनोख्या घडामोडी घडताना दिसून येत आहेत. यातलं सर्वात आवर्जून नाव घ्यावं लागेल, ते ‘लाइट एल १६’ कॅमेऱ्याचं. फ्युचरिस्टिक लूक असलेल्या या कॅमेरा गॅजेटमध्ये एकूण १६ कॅमेरे आहेत. प्रत्येक वेळी घेतल्या जाणाऱ्या छायाचित्रासाठी हा कॅमेरा १० लेन्सेस वापरतो. याद्वारे हा कॅमेरा सर्व उच्च प्रतिच्या प्रतिमा एकत्रित करून एक प्रतिमा तयार करतो. यात छायाचित्रकार स्वत: या छायाचित्रांची डेप्थ आॅफ फिल्ड बदलू शकतो, जी इतर प्रकारच्या कॅमेऱ्यांमध्ये सहसा बदलता येत नाही.
सेल्फ बॅलन्सिंग स्कूटर्स : गायक व रॅपर असलेल्या जस्टिन बिबर आणि विझ खलिफा यांना ही स्कूटर वापरताना पाहून, या स्कूटरचे अनेक चाहते तयार झाले. विजेवर चालणारी आणि स्वत:च तोल साधणारी ही ट्रेंडी स्कूटर जगभरात प्रसिद्ध पावली. सुट्टीच्या दिवसात उभ्या-उभ्या टंगळण्यासाठी या स्कूटरला खास पसंती मिळताना दिसून येते.
मायक्रोसॉफ्ट हॉलोलेन्स : तंत्रज्ञानाच्या जगात आभासी दृष्य तंत्रज्ञानावर आधारित बरचसं संशोधन होतंय. त्यावर आधारित विविध कंपन्यांची गेमिंग कन्सोल्स बाजारात उपलब्ध होत आहेत. मायक्रोसॉफ्ट हॉलोलेन्स हे उपकरण आभासी दृष्य तंत्रज्ञानावर आधारलेलं असलं, तरी या उपकरणाने आभासी दृष्य तंत्रज्ञानाची एक नवी दिशा जगाला दाखवली आहे. याला मिक्स रिअॅलिटी म्हणजेच मिश्र आभासी तंत्रज्ञान असंही म्हणता येईल. चष्म्याप्रमाणे दिसणारं हे उपकरण परिधान केल्यास मिश्र आभासी प्रतिमा समोर तत्काळ प्रकट होतात. त्यांचं प्रारूप बनवून या प्रतिमा एखाद्या उत्पादनाच्या रूपात प्रत्यक्ष उतरवतादेखील येतात. विशेषत: विविध क्षेत्रातील तंत्रज्ञ, शल्यविशारद, अंतराळवीर यांच्यासाठी हे तंत्रज्ञान जग बदलणारं असं आहे.