सांगा कसं जगायचं..
By admin | Published: March 14, 2017 11:38 PM2017-03-14T23:38:43+5:302017-03-14T23:38:43+5:30
मराठवाड्यात पावसाळ्यात साधारण ४२ दिवस पाऊस पडायचा. पुढे काही वर्षे तो ५४ दिवस होऊ लागला. आता तेवढाच पाऊस केवळ २८ ते ३१ दिवसांत पडत आहे.
मराठवाड्यात पावसाळ्यात साधारण ४२ दिवस पाऊस पडायचा. पुढे काही वर्षे तो ५४ दिवस होऊ लागला. आता तेवढाच पाऊस केवळ २८ ते ३१ दिवसांत पडत आहे. पावसाचे हे पाणी एक तर मुरते, वाहून जाते किंवा बाष्पीभवन होते. पाणी मुरण्याचे हे प्रमाण अधिकतर भूभागावरच अवलंबून असते. वाहून जाणाऱ्या पाण्याला अडविण्यासाठी राज्य सरकारने गेल्या वर्षीपासून जलयुक्त शिवार योजना हाती घेतली आहे. त्यामुळे उरला प्रश्न बाष्पीभवनाचा. एका संशोधनानुसार पावसाचे तब्बल ५६ टक्के पाणी हे बाष्पीभवनातून जाते. म्हणजे साधारण आपल्याकडे ६५ लाख लिटर पाऊस पडतो. यातला १८ ते २० लाख लिटर पाऊस बाष्पीभवनातून जातो. वाळवंटात हे प्रमाण ६५ टक्के इतके असते. याचा अर्थ आपण वाळवंटाच्या मार्गानेच जात आहोत.
हे सारे दुष्काळपुराण उगाळण्याचे कारण म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संख्याशास्त्र विभागातील संशोधक विद्यार्थी सत्यवान यशवंत यांनी डॉ. एस.एल. सनान्से यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मराठवाड्यातील पावसाचे संख्याशास्त्रीय विश्लेषण आणि पाऊसमानाचे पीक उत्पादनावर होणारे परिणाम’ यावर संशोधन केले आहे. जून ते आॅक्टोबर या काळातील १९७८-७९ ते २०१४-१५ या ३६ वर्षांच्या पावसाचे विश्लेषण ‘अॅव्हरेज लिकेंज मेथड’ने केले. यासाठी पुण्यातील भारतीय हवामान विभागाचा डाटा वापरला आहे. या संशोधनानुसार मराठवाड्यात सतत चार, सहा, आठ, दहा दिवस दडी मारण्याचे (ड्राय स्पेल) प्रमाण प्रचंड वाढ आहे. याचा गंभीर परिणाम पिकांची वाढ व उत्पादकतेवर होत आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यात सलग चार दिवस पाऊस न पडण्याची शक्यता प्रतिवर्षी ९९ टक्के एवढी, सहा दिवसांची ९६ टक्के, ८ दिवसांची ८६ टक्के, १० दिवस पावसाने दांडी मारण्याची शक्यता ६८ टक्के एवढी आढळून आली आहे. या दडीचा परिणाम प्रत्यक्षात पिकांवर होत आहे. १९७८ ते २०१४ या ३६ वर्षांच्या काळात पिकांच्या उत्पादनात सरासरी ८ टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. लातूर जिल्ह्यात सोयाबीनचे उत्पादन सात टक्क्यांनी घटले आहे. हिंगोलीत ८.२ टक्क्यांनी, परभणीत ५.८ टक्क्यांनी, तर बीड जिल्ह्यात कापसाचे उत्पादन तब्बल ८.६ टक्क्यांनी घटले आहे. हे असेच सुरू राहिले तर दरडोई उत्पन्नाच्या दीड टक्का नुकसान हे शेतीत होऊ शकते. मग एक शेतकरी म्हणून मी काय करायचे?
कविवर्य मंगेश पाडगांवकर म्हणतात,
सांगा कसं जगायचं,
कण्हत कण्हत की गाणं म्हणत...
पेला अर्धा सरला आहे
असंसुद्धा म्हणता येतं
पेला अर्धा भरला आहे
असंसुद्धा म्हणता येतं
सरला आहे म्हणायचं की
भरला आहे म्हणायचं
तुम्हीच ठरवा !
औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबादसारख्या चांगल्या पाऊस होणाऱ्या तालुक्यात आधी एक हजार मि.मी. पाऊस व्हायचा. आता तो ५०० मि.मी.वर आला आहे. याचा अर्थ या तालुक्यावर फार मोठे आकाश कोसळले, असा होत नाही. हा पाऊसदेखील कमी नाही. भारतात वा बाहेर जिथे कोठे या प्रमाणात पाऊस पडतो तेथील जलव्यवस्थापनाचा अभ्यास करून येथील शेतकऱ्यांनी तसा बदल करायला हवा. तसे जलव्यवस्थापन करायला हवे. प्रत्येक जिल्हा-तालुक्याला दुष्काळावर हीच मात्रा लागू पडते. शिवाय बाष्पीभवन रोखण्यासाठी जैविक कुंपण वाढविणे आणि झाडांची मोठ्या प्रमाणात लागवड करणे एवढेच आपल्या हातात आहे. दक्षिण-पश्चिम बाजूला अधिकाधिक झाडे लावून बाष्पीभवन रोखता येऊ शकते. कसदार जमीन परत मिळविण्यासाठी निंदण-खुरपणाच्या पद्धती बदलाव्या लागतील. सरकार काय करेल, याची वाट पाहत बसण्यापेक्षा परिसरात पडणारा पाऊस आणि त्याचे व्यवस्थापन याचा विचार प्रत्येक शेतकऱ्याने केला तरच भविष्यकाळ चांगला आहे. अन्यथा ढगात कितीही गोळ्या घालून पाऊस पाडला तरी तो पाऊस पुरवणी पडणार नाही.
- सुधीर महाजन