सांगा... काका कुणाचे?
By सचिन जवळकोटे | Published: March 22, 2018 05:18 AM2018-03-22T05:18:36+5:302018-03-22T19:25:14+5:30
मनोहरपंतांच्या पुस्तक सोहळ्यात म्हणे थोरले काका बारामतीकर चक्क मिलिंदरावांच्या कानात काहीतरी कुजबुजले. तेव्हापासून मिलिंदरावांचे पाय ‘मातोश्री’वर हवेतच. आता ‘सरकारमधील कट्टर विरोधक’ असलेल्या पक्षाचे सचिव झाल्यापासून मिलिंदाला आम्ही पामर राव म्हणून संबोधू लागलेलो.
मनोहरपंतांच्या पुस्तक सोहळ्यात म्हणे थोरले काका बारामतीकर चक्क मिलिंदरावांच्या कानात काहीतरी कुजबुजले. तेव्हापासून मिलिंदरावांचे पाय ‘मातोश्री’वर हवेतच. आता ‘सरकारमधील कट्टर विरोधक’ असलेल्या पक्षाचे सचिव झाल्यापासून मिलिंदाला आम्ही पामर राव म्हणून संबोधू लागलेलो. असो... ‘बारामतीचे काका आपल्याशी किती जवळीक साधू पाहतात,’ याचा किस्सा मिलिंदरावांनी रंगवून सांगताच मनोहरपंतांनाही उचंबळून आलं, ‘काकांचं भलंही सध्याच्या नवीन पंतांशी जमलं नसेल; परंतु माझ्यासारख्या जुन्या पंतांशी त्यांचं नातं नेहमीच आपुलकीचं राहिलेलं,’ हे सांगताना त्यांनी आधुनिक काळातही ‘पहिले पंत... सवाई पंत’ ही पेशवाई परंपरा सुरूच असल्याची आठवण करून दिली.
‘पूर्वीही मनोहरपंत बाळासाहेबांच्या निकट होते, यापेक्षा ते सध्याही काकांच्या जवळ आहेत,’ या जाणिवेनं मिलिंदराव खट्टू झाले. याचवेळी तिथं आलेल्या देवेंद्रपंतांनी विचारलं, ‘मिलिंदा... खूप दिवस झालं, काही वैयक्तिक काम घेऊन आला नाहीत माझ्याकडं? असो... आम्ही ज्यांच्या भरजरी जाकिटाचं चकाकतं बटण धरून सत्ताकारण करतोय, ते आमचे ‘नमो’सुद्धा काकांचंच बोट धरून राजकारणात आलेत बरं का?’
हे ऐकताच ‘उद्धो’ खवळून म्हणाले, ‘भाषणात जरी आम्ही काकांवर टीका करत असलो तरी आतून आम्हीही असतोच त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये.’ तेव्हा ‘कृष्णकुंज’च्या दिशेनं व्यंगात्मक हसण्याचा आवाज आला. काकांच्या महामुलाखतीचा व्हिडीओ किती हिट झाला, हे यू ट्यूबवर पाहत ‘राज’ यांनी डायलॉग टाकला, ‘मी कॉन्टॅक्ट-बिन्टॅक्टमध्ये नसतो. डायरेक्ट भेटत असतो. आता या आठवड्यातही आम्ही तिसऱ्यांदा का चौथ्यांदा भेटतोय.’
हे ऐकून रामदासांना नवे काव्य आठवले, ‘पुढच्या वर्षी ठाकणार, माझ्यासमोर प्रसंग बाका... एकीकडे नमो अन् पंत, दुसरीकडं लाडकेकाका...’ तेव्हा हातातल्या उसाला सदाभाऊ समजत शेट्टींनीही काडकन्ऽऽ कांडकं मोडलं, ‘मीही काकांसोबत राजकारण करणार. आमचीही सलगी वाढलीय बरं का.’
‘आपलीच कशी काकांशी जवळीक,’ हे दाखविण्याची अहमहमिका हळूहळू सर्वपक्षीय नेत्यांमध्ये वाढत चालली. राहुल बाबांचा आदेश असल्यानं इच्छा नसूनही पृथ्वीबाबा कºहाडकर काकांच्या जिव्हाळ्याच्या आठवणी सांगू लागले. सोलापूरच्या सुपुत्रानं तर थेट अनेक दशकांचा इतिहासच उलगडला. ‘बुढ्ढी के बाल विकत मी ज्या गावात मोठा झालो, तिथं काकांचं अन् माझं नातं खूप जवळचं होतं,’ हे ऐकताना विजयदादांनाही अक्षरश: गहिवरून आलं. (...म्हणजे भरून आलं होऽऽ)
सातारा अन् फलटणचे दोन्ही राजेही काकांशी आपली जवळीक दाखविताना त्यांच्या गाडीत सर्वाधिक मिनिटं कोण बसलं, याचा दाखला देऊ लागले. याचवेळी ‘हल्लाबोल’ करून दमलेले अजितदादा समोरून आले. तेव्हा साºयांनीच त्यांना विचारलं, ‘दादाऽऽ दादाऽऽ सांगा काका कुणाचे?’ बहुतांश मंडळींना वाटलं, दादा म्हणतील, ‘माझेच!’... पण हाय, लाडक्या तार्इंकडं तिरका कटाक्ष टाकत दादा ठसक्यात म्हणाले, ‘गेल्या पन्नास वर्षांत मलाच उमजलं नाही, काका नेमके कुणाचे... तिथं तुम्ही सारे किस झाड की पत्ती? चला, लागा कामाला..’
(तिरकस)