पुण्यावर दहशतवादी सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 12:14 AM2018-03-24T00:14:42+5:302018-03-24T00:14:42+5:30

एटीएसने पुण्यात अल्-कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या तीन बांगलादेशी नागरिकांना नुकतेच पकडले अन् पुन्हा एकदा दहशतवाद्यांचे पुणे कनेक्शन उघड झाले. याआधी इंडियन मुजाहिदीन, पाकिस्तानच्या आयएसआयशी संपर्क असणाऱ्यांचे जाळे पुण्यात असल्याचे स्पष्ट झालेले आहे.

 Terrorists in Pune | पुण्यावर दहशतवादी सावट

पुण्यावर दहशतवादी सावट

Next

एटीएसने पुण्यात अल्-कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या तीन बांगलादेशी नागरिकांना नुकतेच पकडले अन् पुन्हा एकदा दहशतवाद्यांचे पुणे कनेक्शन उघड झाले. याआधी इंडियन मुजाहिदीन, पाकिस्तानच्या आयएसआयशी संपर्क असणाऱ्यांचे जाळे पुण्यात असल्याचे स्पष्ट झालेले आहे. विद्येचे माहेरघर, पेन्शनरांचे शहर, सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेल्या पुण्यात गेल्या दोन दशकांत झपाट्याने बदल झाले. १९९२मध्ये मुंबईत साखळी बॉम्बस्फोटांद्वारे पहिले दहशतवादी हल्ले झाले. त्यानंतर स्थलांतरित होणाºया मध्यमवर्गीयांचे शांत शहर असलेल्या पुण्यात स्थायिक होण्याचा कल वाढला. कोथरूडसारखे उपनगर अल्पावधीत वेगाने विकसित होण्याचा विक्रम झाला. मुंबईखालोखाल पुण्यात रोजगारासाठी स्थलांतरितांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली. त्यात परप्रांतीय, बांगलादेशींची संख्या मोठी होती. कालांतराने पुण्याची शांतता धोक्यात आली. २००८मध्ये कोंढवा भागातील एका सदनिकेत मीडिया सेलद्वारे देशभरातील तरुणांची माथी भडकवली जात असल्याचे कारवाईद्वारे उघड झाले. देशभरातील बॉम्बस्फोटांचा सूत्रधार रियाझ भटकळचा पुण्यात वावर असल्याचे या वेळी उघड झाले होते. पुण्यात आणि देशात अनेक ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटांत कोंढव्यातील मोहसीन चौधरीचा हात असल्याचा तपास अद्याप सुरू आहे. २०१०मध्ये जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाने पुणेच नव्हे, तर देश हादरला. त्यात १७ जण ठार, तर ५३ हून अधिक जखमी झाले. यात रियाझ-यासीन भटकळ यांचा हात होता. त्यानंतर जंगली महाराज रस्त्यावर काही अंतराने बॉम्बस्फोट झाले; पण त्यात काही तांत्रिक चूक राहिल्याने ते फसले. अन्यथा, हे शक्तिशाली स्फोट झाले असते तर मोठी जीवित-वित्तहानी झाली असती. त्यानंतर फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात बॉम्बस्फोट घडवला गेला. पुण्यात नक्षलवाद्यांचे स्लीपर सेल असल्याचेही पोलिसांनी याआधी सांगितले आहे. शहरालगतच्या गावांतून नक्षलवादी चळवळीशी संबंधितांना एटीएसने यापूर्वी पकडले होते. आता यात बांगलादेशी घुसखोरांची भर पडली आहे. अटक झालेले तीन बांगलादेशी नागरिक मजूर असल्याचा बहाणा करीत होते; मात्र प्रत्यक्षात दहशतवादी कारवायांसाठी पैसे उभारणे, आवश्यक जाळे तयार करणे ही कामे ते करीत असल्याचा पोलिसांना संशय आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पुण्यात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आव्हान तपास यंत्रणेसमोर आहेच; त्याचबरोबर आपण समस्त सुज्ञ पुणेकरांनी सलोखा राखून सावधता बाळगावी. पुतळे, अस्मिता, जातीय-धर्मीय अभिनिवेश बाजूला ठेवून अहोरात्र जागरूक राहणे, ही काळाची गरज आहे.

Web Title:  Terrorists in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.