पाठ्यपुस्तकातील धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 12:05 AM2017-08-03T00:05:31+5:302017-08-03T00:10:59+5:30
सत्तेवर आल्यापासून भारतीय जनता पक्षाला देशातील सगळ्याच गोष्टीत बदल करण्याची घाई झाली आहे. त्याला काहीच हरकत नाही, मात्र हा बदल त्यांना हवा आहे तसा केला जात आहे हे आक्षेपार्ह आहे.
सत्तेवर आल्यापासून भारतीय जनता पक्षाला देशातील सगळ्याच गोष्टीत बदल करण्याची घाई झाली आहे. त्याला काहीच हरकत नाही, मात्र हा बदल त्यांना हवा आहे तसा केला जात आहे हे आक्षेपार्ह आहे. विशेषत: शालेय पाठ्यपुस्तकांमधील बदल तर नक्कीच हरकत घेण्यासारखे आहेत. फार पूर्वीपासून भाजपाची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देशाला जुन्या परमवैभवात नेऊन ठेवण्याची आस लागली आहे. त्याची सुरुवात शालेय वयापासूनच व्हायला हवी असे त्यांना वाटते. त्यामुळेच त्यांनी सत्ता येताक्षणीच पहिले काय केले असेल तर सांस्कृतिक राष्ट्रवाद या त्यांच्या घोषणेला प्रत्यक्षात कसे आणता येईल यावर विचारमंथन सुरू केले. त्यांचा शोध शालेय पाठ्यपुस्तकांपाशी संपला. या पाठ्यपुस्तकांमध्येच बदल केला तर शालेय वयातच मुले त्यांना हव्या असलेल्या तथाकथित सांस्कृतिक राष्ट्रवादाची भक्त होतील असे त्यांना वाटले. पाठ्यपुस्तकातील बदलाचे प्रयत्न त्या हेतूने सुरू आहेत. इतिहास हा त्यांचा आवडीचा विषय. त्यामुळे त्याला प्रथम हात घालण्यात आला. वास्तविक ही पाठ्यपुस्तके तयार करण्याची पूर्वीची पद्धत आदर्श पद्धत होती. त्यात त्या त्या विषयातील तज्ज्ञांची एक समिती, त्यात या तज्ज्ञांशिवाय शास्त्रीयदृष्ट्या मुलांची गरज ओळखणाºयांचाही समावेश असायचा. अतिशय अभ्यासपूूूूर्वक ही पुस्तके तयार व्हायची. त्यामुळेच जुन्या पिढीतील अनेकांना थोरांची ओळख, व्यापारी म्हणून आले अन राज्यकर्ते बनले ही आपल्या इतिहासाच्या पुस्तकातील शीर्षके अजूनही आठवत असतील. विद्यमान सरकार या सगळ्यावर फुली मारून नवा इतिहास मुलांच्या पुस्तकांत आणत आहे. त्यालाही हरकत नाही. स्वातंत्र्यानंतरची भारताची वाटचालही शालेय वयातच मुलांना समजली पाहिजे. त्यातही आणीबाणीसारखे पर्व, बोफोर्स प्रकरण असेल तर त्याची माहिती झालीच पाहिजे, मात्र ती अपुरी व सोयीच्या स्वरुपातील नको. बोफोर्सची सगळी माहिती द्यायची व त्यातून राजीव गांधी निर्दोष मुक्त झाले हे सांगायचेच नाही हा रडीचा डाव झाला. सरकारने आपले हेका सोडावा व पाठ्यपुस्तके निर्दोष कशी होतील याकडे लक्ष द्यावे. त्यांच्यासारखेच तुम्हीही वागत असाल तर त्यांच्यात व तुमच्यात फरक तो काय राहिला?