राज ठाकरेंसाठी तीन प्रश्न; ज्याची उत्तरं ठरवतील मनसेचं भवितव्य!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 05:50 AM2020-01-25T05:50:26+5:302020-01-25T11:36:52+5:30
भविष्यात विचारसरणीशी निगडित एखाद्या मुद्द्यावरून शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचे फाटल्यास, शिवसेना पातळ केलेले हिंदुत्व पुन्हा एकदा घट्ट करू शकते. त्या वेळी मनसेची भूमिका काय असेल?
काही वर्षांपूर्वी एका खासगी वाहिनीवर ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ ही मालिका प्रसारित झाली होती. एका उच्चभ्रू कुटुंबातील सदस्यांमधील संघर्ष आणि त्यामधून उद्भवणारे विनोदी प्रसंग, असे त्या मालिकेचे स्वरूप होते. आज अचानक त्या मालिकेची आठवण झाली. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन राजकीय पक्षांनी गुरुवारी मुंबईत आयोजित केलेले दोन स्वतंत्र कार्यक्रम त्यासाठी निमित्त ठरले. यानिमित्ताने ठाकरे कुटुंबातील संघर्ष पुन्हा एकदा अधोरेखित झाला. राज ठाकरे यांनी शिवसेना नेतृत्वावर थेट प्रहार केला नसला तरी, त्या पक्षाच्या मतपेढीवर डल्ला मारण्याचा इरादा नक्कीच उघड केला. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी तर घरातीलच व्यक्तीने विश्वासघात केल्याचे सांगून, थेट राज ठाकरे यांच्यावरच निशाणा साधला. ठाकरे कुटुंबातील या संघर्षाची पहिली ठिणगी बाळासाहेबांच्या हयातीतच पडली होती. पुढे त्या संघर्षातूनच राज ठाकरे यांनी मनसेला जन्म दिला. राजकीय पक्ष म्हणून मनसेला पहिल्याच प्रयत्नात घवघवीत यशही मिळाले होते; मात्र ते वृद्धिंगत करण्यात त्या पक्षाचे नेतृत्व अपयशी ठरले. ठोस दिशा व धोरणांचा अभाव, धरसोड वृत्ती आणि प्रतिक्रियात्मक राजकारण यामुळे मनसेची घसरण झाली, असा निष्कर्ष काढता येतो. राज ठाकरे यांच्या गुरुवारच्या मुंबईतील भाषणातूनही पुन्हा एकदा धरसोड वृत्तीचाच परिचय घडला. मनसेचा प्रतिस्पर्धी क्रमांक एक शिवसेनाच आहे; पण तरीही मनसेची संपूर्ण वाटचाल शिवसेनेच्याच पावलांवर पाऊल ठेवून होत आहे. सातत्याने प्रतिक्रियात्मक राजकारण केल्याचा परिणाम समोर येऊनही, राज ठाकरे पुन्हा एकदा त्याच मार्गाने निघाले असल्याचे त्यांच्या भाषणातून स्पष्ट झाले आहे.
मराठी अस्मितेला हात घालूनच शिवसेनेची सुरुवात झाली होती. त्या मुद्द्यावर बऱ्यापैकी यश मिळाल्यानंतर १९८४ मध्ये देशातील इतर विरोधी पक्षांप्रमाणेच शिवसेनेचीही वाताहत झाली होती. त्यानंतर भारतीय जनता पक्षाने ज्याप्रमाणे रामजन्मभूमी वादाच्या निमित्ताने हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेत, गांधीवादी समाजवाद बासनात गुंडाळून ठेवला, त्याप्रमाणेच शिवसेनेनेही मराठी अस्मिता बाजूला सारून हिंदुत्वाची वाट चोखाळली. त्यातूनच मग भाजप आणि शिवसेनेचे सूर जुळले. मनसेने स्थापनेनंतर शिवसेनेने बाजूला सारलेला मराठी अस्मितेचा मुद्दा हाती घेतला आणि आता पुन्हा एकदा शिवसेनेचे हिंदुत्व पातळ झाल्याचे बघून भगवा झेंडा खांद्यावर घेतला आहे.
नागरिकत्व सुधारणा कायद्याचे समर्थन, पाकिस्तानी व बांगलादेशी मुस्लिमांना देशाबाहेर घालविण्याची मागणी, पक्षाच्या बहुरंगी झेंड्याच्या जागी छत्रपती शिवरायांची राजमुद्रा असलेला भगवा झेंडा, हे सगळे संकेत मनसेची वाटचाल हिंदुत्वाच्या दिशेने सुरू झाल्याचेच द्योतक आहेत. या टप्प्यावर मनसेच्या दृष्टीने तीन महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होतात. पहिला, यानंतर तरी मनसेचा दिशा व धोरणाचा प्रवास थांबणार आहे का? दुसरा, हिंदुत्वाने शिवसेनेला जसे राज्यव्यापी अस्तित्व लाभले तसे ते मनसेला लाभणार आहे का? आणि तिसरा, यानंतर तरी मनसेचे प्रतिक्रियात्मक राजकारण थांबणार आहे का? यापैकी पहिला व तिसरा प्रश्न परस्परांशी निगडित आहे. राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या अनेक वर्षांपासूनच्या ध्येयधोरणांसोबत तडजोड केली असली तरी, गुरुवारच्या छोटेखानी भाषणात, आमचा रंग भगवा आणि अंतरंगही भगवेच असल्याचे त्यांनी ठासून सांगितले. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावूनही शिवसेना हिंदुत्वास सोडचिठ्ठी देण्यास तयार नसल्याचेच त्यांनी स्पष्ट केले. भविष्यात विचारसरणीशी निगडित एखाद्या मुद्द्यावरून शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचे फाटल्यास, शिवसेना पातळ केलेले हिंदुत्व पुन्हा घट्ट करू शकते. त्या वेळी केवळ शिवसेनेच्या विरोधासाठी मनसे हिंदुत्वालाही सोडचिठ्ठी देणार का? शिवसेनेला राज्यव्यापी अस्तित्व लाभण्यात, हिंदुत्वासोबतच भाजपसोबतच्या युतीचाही वाटा होता. भाजप मनसेला ती संधी देईल का? या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरांमध्येच मनसेचे भविष्य दडलेले आहे. आज तरी ती उत्तरे काळाच्या उदरात दडलेली आहेत. ती समोर येतील तेव्हा येतील. तोपर्यंत ठाकरे व्हर्सेस ठाकरे मालिकेचे आणखी काही भाग महाराष्ट्राला बघायला मिळतील, हे निश्चित!